राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक, बोरॉनची कमतरता...
राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक, बोरॉनची कमतरता...

राज्यातील जमिनीत जस्त, लोह, गंधक, बोरॉनची कमतरता...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागातील अखिल भारतीय समन्वयित सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्ये संशोधन प्रकल्पांतर्गत जिल्हानिहाय जमिनींचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यांमधून जागतिक स्थळ प्रणालीचा वापर करून मातीचे नमुने गोळा करण्यात आले. त्याची तपासणी करून सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांच्या सद्यःस्थितीची माहिती जमा झाली. भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करून राज्यातील जिल्हानिहाय सुपीकतेचे नकाशे भोपाळ येथील भारतीय मृदा विज्ञान संस्थेच्या मदतीने तयार करण्यात आले. त्याचा हा सारांश...

राज्यातील जमिनी

  • राज्यात प्रामुख्याने काळी कसदार जमीन आढळते. विदर्भ, मराठवाड्यात जमिनीच्या उतारानुसार काळ्या जमिनी या उथळ, मध्यम खोल आणि खोल अशा प्रकारच्या आहेत.
  • कोकणात जास्त पावसाच्या प्रदेशात लाल तांबडी जमीन आहे. या जमिनी आम्लयुक्त असून उत्तम निचऱ्याच्या आहेत.
  • पश्चिम महाराष्टात अत्यंत उथळ, मध्यम ते खोल काळ्या जमिनी आहेत.
  • काळ्या जमिनी विम्लमय, सुपीक असून त्यांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली आहे. परंतु त्यांची खोली कमी जास्त असल्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेमध्ये फरक दिसतो.
  • नत्र :   राज्यातील जमिनीत नत्राची कमतरता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सेंद्रिय कर्ब कमी (०.५ टक्क्यापेक्षा कमी) आहे. सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढवून जमिनीची नत्राचा पुरवठा करण्याची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. स्फुरद : राज्यातील जमिनीत याचे प्रमाण मध्यम ते कमी आहे. पालाश : कोकण विभागात याचे प्रमाण मध्यम आहे. राज्याच्या इतर भागांतील काळ्या जमिनीत याचे प्रमाण जास्त ते अति जास्त आहे.

    माती तपासणीतून पुढे आलेले निष्कर्ष  विदर्भातील जमिनी :   गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची कमतरता २५.७ टक्के मातीच्या नमुन्यात आढळली. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त ४९ टक्के, लोह १८ टक्के आणि बोरॉनची २० टक्के मातीच्या नमुन्यात कमतरता आढळली. मराठवाड्यातील जमिनी :  गंधकाची २९.४ टक्के नमुन्यामध्ये, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त ५१.५ टक्के, लोह १९.७ टक्के आणि बोरॉन २६.२ टक्के नमुन्यामध्ये कमतरता आढळली. कोकणातील जमिनी :  अतिपावसाच्या लाल जमिनीमध्ये गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची ४०.४ टक्के मातीच्या नमुन्यात कमतरता आढळली. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉनची ५८.७ टक्के, जस्ताची २९.८ टक्के नमुन्यात कमतरता दिसून आली. पश्चिम महाराष्ट्रातील जमिनी :  गंधकाची कमतरता १४.३ टक्के, तर सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त २०.७ टक्के, लोह २८.२ टक्के, बोरॉनची ५०.३ टक्के नमुन्यात कमतरता दिसून आली. राज्यात गंधक या दुय्यम अन्नद्रव्याची कमतरता २८.५ टक्के मातीच्या नमुन्यात दिसून आली. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये जस्त ३७.८ टक्के , लोह १६.५ टक्के, बोरॉन ३६ टक्के नमुन्यात कमतरता दिसून आली.

    महत्त्वाचे मुद्दे  

  • महाराष्ट्रातील जमिनीत उपलब्ध गंधक कमी ते मध्यम प्रमाणात.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या बाबतीत जस्ताची कमतरता सर्वात जास्त, त्यानंतर लोहाची कमतरता.
  • मुख्यत: हलक्या व तांबड्या जमिनीत बोरॉनची कमतरता.
  • जमीन आरोग्य व सुपीकता टिकविण्यासाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन  

  • सेंद्रिय खते जसे शेणखत, कंपोस्ट, काडीकचरा, गांडूळ खत इत्यादी आणि हिरवळीचे खत जसे बोरू, धैंचा, गिरिपुष्प इत्यादींचा शेतात नियमित वापर करावा.
  • अन्नद्रव्यांची कमतरता असलेल्या जमिनीत पिकांना संतुलित प्रमाणात व शिफारशीप्रमाणे अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा.
  • पिकांना चांगल्या प्रकारे अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊन जमिनीचे रासायनिक, भौतिक व जैविक गुणधर्म टिकवून ठेवण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापन पद्धतीचा वापर नियमितपणे करावा.
  • दरवर्षी पिकांची फेरपालट करावी.
  • जमिनीच्या प्रकारानुसार (हलकी, मध्यम व भारी) पिके घ्यावीत, जेणेकरून जास्त उत्पादन मिळेल.    
  • जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी नियोजन   अ)  दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन : गंधक : गंधकाची कमतरता असलेल्या जमिनीमध्ये विविध पिकांच्या शिफारशीनुसार (प्रतिहेक्टरी ३० ते  ४० किलो गंधक) जिप्सम किंवा बेन्टोनाईट-गंधक यामधून द्यावा. स्फुरद पुरवठा करण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेटचा नियमित वापर करावा. सेंद्रिय खते (शेणखत, कंपोस्ट इत्यादी) पीकफेरपालट, शेतावरील काडीकचरा यांचा नियमित वापर करावा.

    जस्त :

  • कमतरता असल्यास शिफारशीनुसार (झिंक सल्फेट २० ते २५ किलाे प्रतिहेक्टरी) जस्तयुक्त खतांचा तृणधान्य, तेलवर्गीय व भाजीपाला पिकांना तीन वर्षांतून एकदाच वापर करावा.
  • झिंक कोटेड युरिया व मिश्रखतांचा वापर करावा.
  • सेंद्रिय खते, हिरवळीचे खते यांचा नियमित वापर करावा.
  • झिंक सल्फेट (०.५ टक्के) किंवा झिंक इडीटीए (०.२५ टक्के) यांची पिकांच्या आवश्‍यकतेनुसार फवारणी करावी.
  • लोह :

  • सेंद्रिय खते, हिरवळीची खते व कंपोस्ट खतांचा नियमित वापर करावा.
  • लोह सल्फेट (हिराकस) (१ टक्के) किंवा लोह ईडीटीए (०.५० टक्के) याची फवारणी करावी.
  • बोरॉन :  सेंद्रिय खतांचा शेतात नियमित वापर.  बोरोनेटेड मिश्रखत/बोरोनेटेड युरियाचा वापर जमिनीतून करावा.  कमतरता असलेल्या जमिनीत बोरॅक्स प्रतिहेक्टरी ३ ते ५ किलोपर्यंत वापर करावा.

    संपर्क :  डॉ. राजेंद्र काटकर, ९४२२९३७५२३ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग,  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com