राज्यातील जमिनीत सूक्ष्म, दुय्यम मूलद्रव्यांची कमतरता

शेतकऱ्यांमध्ये माती परीक्षणाविषयी जनजागृती करून जमिनीच्या आरोग्याविषयी काळजी घेणे, पर्यायाने पाणी, वनस्पती व मानवी जीवन, निसर्ग, पर्यावरण प्रदूषणापासून वाचेल. दिवसेंदिवस कर्ब कमी होत आहे. त्यासाठी सेंद्रिय स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्याची गरज आहे. - डाॅ. अनिल दुरगुडे , मृदा शास्त्रज्ञ, मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग.
मृदा तपासणी
मृदा तपासणी

पुणे : राज्यातील २०१०-११ ते २०१४-१५ या कालावधीतील अहवालानुसार राज्यातील मृद नमुन्यावर आधारित सर्वसाधारण अन्नद्रव्यामध्ये नत्राचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे आढळून आलेले आहे. तसेच स्फुरद या अन्नद्रव्याचे प्रमाण कमी, तर पालाशचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून आले आहे. सूक्ष्म मूलद्रव्यांचा विचार केल्यास जमिनित लोह व जस्त या दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आज (ता. ५) जागतिक मृदा दिनानिमित्त सरकारने विविध उपक्रम आयोजित केले आहेत.  शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्याची माहिती व्हावी, या उद्देशाने केंद्र शासनामार्फत राज्यात मृद आरोग्यपत्रिका वाटपाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. येत्या दोन वर्षांत (२०१७-१८ आणि २०१८-१९) शेतकऱ्यांना ६८ लाख ४९ हजार जमीन आरोग्यपत्रिका वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.   राज्यातील जमिनीतील सूक्ष्म मूलद्रव्यांचा विचार केल्यास जमिनीत लोह व जस्त या दोन सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता वाढली आहे. यामध्ये सर्वांत जास्त जस्त व लोह या सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता औरंगाबाद विभागात आढळून येते. त्याखालोखाल नागपूर व पुणे विभागात कमतरता आहे. लोह या सूक्ष्म मुलद्रव्याची सर्वांत जास्त कमतरता जालना जिल्ह्यातील जमिनीत आहे. तर जस्त या सूक्ष्म मूलद्रव्याची सर्वांत जास्त कमतरता अकोला जिल्ह्यात आढळते. सर्वसाधारण व सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता जाणून घेण्यासाठी शेतजमिनीचे माती परीक्षण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी राज्य व केंद्र शासन मृद आरोग्यपत्रिका योजना राबवत आहे. मृद आरोग्य योजनेअंतर्गत वहितीखालील जिरायत क्षेत्रामधून दहा हेक्टर क्षेत्रास एक मृद नमुना व बागायत क्षेत्रामधून अडीच हेक्टर क्षेत्रास एक मृद नमुना घेऊन त्यांचे प्रमुख व सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी मृद चाचणी प्रयोग शाळेत विश्लेषण करण्यात येते. केंद्र शासनामार्फत राज्यात २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षे कालावधीच्या पहिल्या टप्प्यात २३ लाख ४७ हजार मृद नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, १२९.७७ लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्यपत्रिका वितरित करण्यात आलेल्या आहेत. यंदापासून राज्यात मृद आरोग्यपत्रिका योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. यंदा ११ लाख ७४ हजार माती नमुने तपासणीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आतापर्यंत १४ लाख ७४ हजार (१२६ टक्के) मातीचे नमुने काढण्यात आले आहेत. त्यापैकी आठ लाख ६० हजार (७३ टक्के) नमुन्याची तपासणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ६८ लाख ४९ हजार जमीन आरोग्यपत्रिका वितरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी आठ लाख ८१ हजार जमीन आरोग्यपत्रिकाचे वितरण केले आहे. आज होणार आरोग्यपत्रिकांचे वितरण आज पाच डिसेंबरला जागतिक मृदा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यात जिल्हा, तालुका स्तरांवर पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्राम स्तरावर स्थानिक व्यक्तीच्या हस्ते शेतकऱ्यांना मृद आरोग्यपत्रिकेचे वितरण करण्याचे प्रस्तावित आहे. जमिनीच्या आरोग्याबाबत कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना खतांच्या संतुलित वापराबाबत आणि माती परीक्षणाची जागृती केली जाणार आहे. तसेच दहा लाख २७ हजार लाख मृद आरोग्यपत्रिकेचे वितरण केले जाणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com