सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या, रास्ता रोको, बंद

जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या, रास्ता रोको, बंद
जिल्ह्यात ठिकठिकाणी ठिय्या, रास्ता रोको, बंद

सोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला गुरुवारी (ता.९) सोलापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही ठिकाणच्या किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला. सोलापुरात बंदऐवजी रास्ता रोको, ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने घेतला. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठा बंद राहिल्या, तरी अन्य व्यवहार सुरळीत सुरू होते; पण ग्रामीण भागात माढा, पंढरपूर, माळशिरस, बार्शी, करमाळा भागात पूर्णपणे बंदची स्थिती होती. माळशिरस, मोहोळ, उत्तर सोलापुरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्ता रोको करून लक्ष वेधले. जिल्ह्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद राहिली, तर पंढरपूर, बार्शी, अकलूज, माढा भागासह अनेक भागातील इंटरनेट सेवा काही काळ बंद करण्यात आली होती.

सोलापुरात सकाळी अकरा ते दुपारी एक या वेळेत दोन ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. नवी पेठेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये बंदचे वातावरण दिसून आले. नवी पेठेतील दगडफेकीची किरकोळ घटना वगळता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. काही दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली असली तरी शहरातील बाकीचे व्यवहार सुरळीत चालू होते. महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून सोलापूर बस स्थानकातून सोडण्यात आल्या नाहीत. सकाळी साडेअकरा वाजता संभाजी पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी बोटाला कापून घेऊन शंकराच्या पिंडीवर रक्ताचे थेंब टाकून आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधले.

शिवाजी चौकापासून अलीकडे सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून आले. दुपारी एकच्या सुमारास नवी पेठेतील एका दुकानावर किरकोळ दगडफेक झाली. पोलिसांनी लागलीच धाव घेऊन तणावावर नियंत्रण आणले. सोलापुरातील मराठा समाजाने ३० जुलै रोजी बंद पाळल्याने गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नसल्याचे आधीच सांगण्यात आले होते. जुना पूना नाका परिसरातील संभाजी पुतळ्यासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. शाळा चालू होत्या, पण विद्यार्थी न आल्याने मधल्या सुटीनंतर काही शाळा सोडून देण्यात आल्या.

ग्रामीण भागात माढा तालुक्‍यात माढा-शेटफळ रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला. त्याशिवाय माढा, उपळाई बुद्रुक, मोडनिंबमध्ये बंद पाळण्यात आला. कुर्डुत दोन तास रास्ता रोको करण्यात आला. करमाळ्यातील शेटफळमध्ये व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. केममध्ये शांततेत बंद सुरू होता. माळशिरसमध्ये बंदसह रास्ता रोको करण्यात आला. मोहोळला कार्यकर्त्यांनी मुंडण करून सरकारचा निषेध केला. पेनूर, सारोळा, मानेगावातही बंदची स्थिती राहिली. पंढरपूर शहरासह तालुक्‍यातही अनेक गावांत बंद पाळण्यात आला. पंढरपुरात मंदिर परिसरात भाविकांची तुरळक गर्दी राहिली. जिल्ह्यातील एसटी सेवा बंद असल्याने वाहतूकसेवा ठप्प राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com