सोलापूर झेडपी सदस्यांची दुष्काळापेक्षा टक्केवारीवरच चर्चा

सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांना दुष्काळापेक्षा टक्केवारीतच रस
सोलापूर जिल्हा परिषद सदस्यांना दुष्काळापेक्षा टक्केवारीतच रस

सोलापूर : दुष्काळाच्या दाहकतेत जिल्हा पुरता होरपळून निघाला आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मात्र एकाही सदस्याला दुष्काळ महत्त्वाचा वाटला नाही. पण, त्यापेक्षा आरोग्य विभागातील कामे, कराटे प्रशिक्षण आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या टक्केवारीवर सर्वाधिक चर्चा रंगली. किंबहुना अनेक सदस्यांनी त्यातच आपल्याला अधिक रस असल्याचे दाखवत त्यावर आणखीनच कडी केली.   

जिल्हा परिषदेची मे महिन्यातील तहकूब सर्वसाधारण सभा सोमवारी (ता. २४) झाली. उपाध्यक्ष शिवानंद पाटील अध्यक्षस्थानी होते. बांधकाम सभापती विजय डोंगरे, कृषी सभापती मल्लिकार्जून पाटील, महिला बालकल्याण सभापती रजनी देशमुख, समाजकल्याण सभापती शीला शिवशरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड या वेळी उपस्थित होते. 

या सभेलाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे गैरहजर होते. लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे अर्थसंकल्प प्रशासनाने मांडला. पण, सदस्यांना विश्वासात न घेतल्याने काही सदस्यांनी गोंधळ घातला. पण, दुष्काळासारखा विषय या सभेत कोणालाही महत्त्वाचा वाटला नाही. आजही जिल्ह्यात जवळपास १०० हून अधिक जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. साडेतीनशेहून अधिक पाण्याचे टँकर सुरू आहेत, यावर कोणीच काही बोलले नाही. पण, त्या उलट ग्रामीण भागात कराटे प्रशिक्षणामध्ये खातेप्रमुखांनी टक्केवारी घेतल्याचा आरोप झाला. 

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामावरूनही सदस्यांनी जोरदार प्रहार केला. यामध्ये खातेप्रमुख टक्केवारी घेत असल्याचा आरोप प्रा. सुभाष माने यांच्यासह काही सदस्यांनी केला. आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक बसविण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. बायोमेट्रिक खरेदीतील गैरप्रकाराची चौकशीची मागणी अरुण तोडकर यांनी केली. त्यावर डॅा. भारुड हेही हतबल असल्याचे दिसले. 

दोन तास गोंधळाचे जिल्ह्यातील शाळांना व्यावसायिक दराने वीजबिल दिले जाते. ४७ लाखांची वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे ४०० शाळांमधील वीजपुरवठा बंद असल्याचा प्रश्नही तोडकर यांनी उपस्थित केला. बजेटवरील चर्चाही दूरच राहिली. पण, यासारख्या अनेक विषयांवर सदस्य नुसताच गोंधळ घालत असल्याचे चित्र होते. पहिले दोन तास फक्त गोंधळातच गेले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com