सौर कृषिपंप योजना खोळंबली

सौर कृषिपंप योजना खोळंबली
सौर कृषिपंप योजना खोळंबली

जळगाव : सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५० शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात आदिवासी भाग असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून सर्वाधिक ३ हजार ९७३ शेतकऱ्यांनाच समावेश आहे. अंदाजपत्रक देण्यात आलेल्या शेतकऱ्यांमधून १७२ जणांनी कृषिपंपासाठी पैसे जमा केले असले, तरी या शेतकऱ्यांना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतरच सौर कृषिपंप वितरित करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

आचारसंहितेच्या अडचणीमुळे संभाव्य लाभार्थी शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या लाभासाठी महावितरणच्या जळगाव परिमंडळातील ८ हजार ९५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आले. यात आणखी काही शेतकऱ्यांचा सहभाग होऊ शकतो. मात्र, ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी व पंपांचा पुरवठा कमी पडण्याच्या शक्‍यतेने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. 

कृषिपंपांसाठी बारा तासांचे भारनियमन असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अडचणीचे होते. शिवाय त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजबिलाची वसुलीही ‘महावितरण''ला अडचणीची होत आहे. या दोघांवर पर्याय म्हणून ही योजना सुरू केली. त्यास शेतकऱ्यांचा प्रतिसादही चांगला मिळत अाहे. ऑनलाइन अर्ज सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्ज भरण्याची वेबसाइट हॅंग होत असल्याने अनेकांना अर्ज सबमिट करता आले नसल्याच्या तक्रारी आहेत. 

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ८२७, धुळ्यातील ३९५, तर नंदुरबारमधील ३४९ असे एकूण १ हजार ४८१ शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी अंदाजपत्रके देण्यात आली. यातील १७२ जणांनी रक्‍कम अदा केली. ‘महावितरण आपल्या दारी'' या उपक्रमांतर्गत वीजजोडणी घेतलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेत अर्ज करता येईल. ज्या शेतकऱ्यांना केबलद्वारे वीजपुवठा देण्यात आला, अशा शेतकऱ्यांची पायाभूत यंत्रणा उभारून कायमस्वरूपी वीजपुरवठा देण्याबाबत मागणी आली. त्यांनाही या योजनेत ऑनलाइन अर्ज करून सहभागी करण्याचा निर्णय झाला.

सौरपंपाची आधारभूत किंमतही कमी करण्यात आल्याने शेतकऱ्यांवरील भार कमी झाला आहे. यात सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास तीन अश्‍वशक्ती डीसी सौरपंपासाठी १० टक्के म्हणजेच १६ हजार ५६९, तर पाच अश्‍वशक्ती डीसी सौरपंपासाठी २४ हजार ७१० रुपये लाभार्थी हिस्सा भरावा लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com