मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी

सौर उर्जा
सौर उर्जा
लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन राज्य शासनाने २० सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांतून ११६ मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. याकरिता जागा संपादित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यामुळे या २० प्रकल्पांमध्ये लातूर जिल्ह्यातील ११ प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित उस्मानाबाद जिल्ह्यात चार, जालना जिल्ह्यात तीन व बीड जिल्ह्यात दोन प्रकल्पांचा समावेश आहे. 
 
राज्यात सध्या विजेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे सौरऊर्जा प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. त्यात मराठवाड्यात दरवर्षी उन्हाची तीव्रता वाढत आहे. लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात उन्हाच्या झळा अधिक आहेत. हे लक्षात घेऊन आता शासनाने मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
 
लातूर जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पांना वातावरण चांगले आहे. याकरिता पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. काही दिवसांपूर्वी श्री. निलंगेकर यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बैठक घेऊन चर्चाही केली होती.
 
श्री. निलंगेकर यांच्या पुढाकारामुळे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे तीन, विळेगाव येथे १५, थोडगा येथे पाच, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे दहा, गुत्ती येथे दहा, निलंगा तालुक्यातील मुदगड एकोजी येथे दोन, औसा तालुक्यातील मंगळूर येथे सहा, कारला येथे दोन, जवळगा पोमादेवी येथे दोन, भादा येथे दोन तर ढाळेगाव येथे तीन मेगावॉटचे सौरऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. 
 
उस्मानाबाद जिल्ह्यातील अनाळा येथे चार व सोनारी येथे आठ (ता. परंडा), डिग्गी (ता. उमरगा) येथे सहा, माडज (ता. लोहारा) येथे पाच, जालना जिल्ह्यातील राजूर येथे आठ, धबाडी येथे पाच, शेपुराबाजार (ता. भोकरदन) येथे पाच तर बीड जिल्ह्यातील कुंभेफळ येथे पाच व चिंचोलीमाळी (ता. केज) येथे दहा मेगा‌वॉटचा सौरऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
 
या वीस सौरऊर्जा प्रकल्पांतून ११६ मेगावॉट विजेची निर्मिती होणार आहे. याकरिता सध्या शासनाकडे ४५२ हेक्टर जागा आहे. आणखी २३३ हेक्टर जागा लागणार आहे. ही जागा तातडीने संपादित करावी, असे आदेश मंगळवारी (ता. १७) महाजेनकोच्या मुख्य अभियंत्यांनी संबंधितांना दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com