नगर जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाट

जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाट
जिल्हा परिषदेत दलालांचा सुळसुळाट

नगर ः जिल्हा परिषदेत आता पहिल्यासारखी स्थिती नाही. येथे प्रत्येक विभागात दलालाचा सुळसुळाट झाला आहे. पैसे घेतल्याशिवाय कामे होत नाहीत. फायली पुढे सरकत नाहीत, असा गंभीर आरोप जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे सदस्य संदेश कार्ले यानी केला. दलालाचा आपल्याला अनेक वेळा अनुभव आल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. 

जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कार्ले यांनी येथे सुरू असलेल्या कामांबाबत नाराजी व्यक्त करत अधिकारी आणि कर्मचारी कशाप्रमाणे लोकांकडून पैसे उकळतात याचा पाढाच वाचला. जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्री घुले, सभापती कैलास वाकचौरे, उमेश परहर, अनुराधा नागवडे, अजय फटांगरे यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके उपस्थित होते.

‘जिल्हा परिषदेत दलालाची चलती आहे, पैसे दिल्याशिवाय एकही काम होत नाही, फायली पुढे सरकत नाहीत.’ असा जाहीर आरोप संदेश कार्ले यांनी केल्यानंतर उपस्थित चांगलेच अवाक झाले. जिल्हा परिषदेतील शिक्षण, आरोग्य, बांधकाम, लेखा व वित्त विभाग, कृषी, पशुसंवर्धन, महिला बालकल्याण असा कोणताच विभाग नाही की तेथे विनापैशाचे काम होते. 

सध्याच्या प्रलंबित फायली पाहिल्या तरी पैसे दिले नाहीत अशाच लोकांच्या फायली लटकून ठेवलेल्या आहेत. आमच्या एका कार्यकर्त्यांचे कामाबाबत आम्ही बोलूनही ते झाले नाही. मात्र, तीन हजार रुपये दिल्यावर मात्र सहजपणे काम झाले. त्यामुळे येथे दलालाची चलती असल्याचा आरोप केला. कार्ले यांच्या आरोपानंतर विखे यांनी खुलासा केला. मात्र, अन्य पदाधिकारी काहीच बोलले नाही. सुधारणा झाली नाही तर शिवसेना गंभीर होईल असेही कार्ले म्हणाले. जिल्हा परिषदेत बांधकाम विभाग आणि लेखा व वित्त विभागात पैशाशिवाय कामे होत नसल्याचा आधीच आरोप होत होता. कार्ले यांच्या बोलण्याने त्याला अधिक पुष्टी मिळाली आहे.

जिल्हा परिषदेला इतिहास आहे. येथे सामान्य माणसांना आधार देण्याचे काम व्हायचे, आता मात्र परिस्थिती उलटी झाली आहे. पैसे घेतल्याशिवाय कोणत्याच विभागात काम होत नाही. परिस्थिती सुधारणे गरजेचे आहे. जर लोकांची लूट थांबली नाही तर शिवसेना आपली स्टाईल दाखवेल. - संदेश कार्ले, सदस्य, जिल्हा परिषद, नगर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com