पवनचक्कीच्या माध्यमातून वीजटंचाईवर मात

पवनचक्कीसाठी शेतकऱ्यांची मागणी वाढत आहे. परंतु सरकारने लवकर अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. त्यामुळे विजेची मोठी बचत होणार असून, शेतकऱ्यांना लागणारी वीज त्यांना स्वतःच्या शेतात उपलब्ध होणार आहे. - गीताराम कदम, संस्थापक, ग्रामीण तंत्रज्ञान संस्था
पवनचक्की
पवनचक्की

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------ दिवसेंदिवसे शेतीसाठी वीजटंचाईची समस्या वाढत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेने पुढाकार घेत टाकाऊ वस्तूंपासून पवनचक्की बनवली आहे. ही पवनचक्की अत्यंत कमी वाऱ्यातही ऊर्जानिर्मिती करत असून त्यावर गेल्या दोन वर्षांपासून तीन अश्वशक्तीचा वीजपंप अहोरात्र सुरू आहे. रोज भासणाऱ्या विजेच्या समस्येवर पवनचक्कीच्या माध्यमातून कायमस्वरूपी पर्याय उपलब्ध झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना वीजटंचाईचा मोठा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. विजेबाबत शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्याचा विचार ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे संस्थापक गीताराम कदम यांच्या मनात आला. त्यासंदर्भात संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी यांना एकत्र आणून पवनचक्कीचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान पवनचक्की बनविण्यासाठी श्री. कदम यांनी स्वतः पुढाकार घेतला. पवनचक्कीसाठी लागणारी पाती टिकाऊ लाकडापासून तयार करून त्यावर इपाॅक्सी कोटिंग केले. विशिष्ठ पद्धतीने चुंबक वापरले असून काॅईलही रेजीन कोटिंगमध्ये बसविल्या. घर्षण पेलण्यासाठी योग्य बेअरिंग तसेच शाफ्ट व इतर फिटिंग तयार केल्या. वाऱ्याचा वेग व दिशा नियंत्रित करणारा टेलपोस्ट बॅलन्सिंग गव्हर्नरही मागे लावला आहे. त्यासाठी साधारपणे दहा ते बारा दिवसाचा कालावधी लागला असून त्याची एक ते दोन प्राथमिक चाचणी घेण्यात आली. प्रत्यक्ष वापरासाठी ही पवनचक्की न्हावरे येथे श्री. कदम यांच्या शेतात साठ फूट उंचीचा टाॅवर उभारून त्यावर बसवली आहे. तयार होणारी ऊर्जा नियमित करून पंपाला पुरविण्यासाठी बहुउद्देशीय कंट्रोलरही बनवून बसविला आहे. शिवाय कंट्रोलरचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून शिकवले जाते. या बहुउद्देशीय कंट्रोलरमध्ये पवनचक्कीच्या माध्यमातून वीजनिर्मिती नियंत्रित करून ती अखंडपणे पुढे सुरक्षितपणे थेट शेतीपंपाला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  आर्थिक गणित  एक किलोवॅट पवनचक्कीसाठी सव्वा लाख, तीन किलो वॅटसाठी अडीच लाख रुपये खर्च येतो. हायब्रीड सोलर यंत्रणेसाठी (पवनचक्की व सोलर पॅनेल) प्रति किलो वॅटला पन्नास हजार रुपये अधिकचा खर्च येतो. हा खर्च दोन ते तीन वर्षाच्या वीजबिलात वसूल होतो. त्यामुळे भविष्यात मोफत वीज मिळू शकणार असून दोन वर्षात जवळपास ८० हजार रुपयांच्या वीजबिलाची बचत केली आहे. दुरुस्तीची कमी गरज  पवनचक्कीत घासणारे भाग तसेच बॅटरी व इन्व्हर्टर नसल्याने देखभाल व दुरुस्तीची गरज कमी आहे. वर्षातून एकदा टर्बाइनच्या बेअरिंगला ग्रीस (वंगण) लावण्याची गरज असते. त्यानुसार त्यांची वेळेवर कामे केली जातात. पाच वर्षातून एकदा पात्यांना गरजेनुसार रंग द्यावा लागणार आहे. 

अनुदानावर उपलब्ध होणार  ग्रामीण संस्थेने दिल्ली येथील भारत सरकारच्या विज्ञान आणि इंडस्ट्रीअल संशोधन विभागाकडे अधिक उत्पादन घेण्याच्या चाचणीसाठी ते पाठवून त्यांची मान्यता घेतली. त्यानंतर भारत सरकारच्या नवीन अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाकडे शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर मान्यता देण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. चालू वर्षात तो मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी अनुदानावर पवनचक्की उपलब्ध होणार आहे.  जीपीएस यंत्रणेचा वापर  पवनचक्कीच्या माध्यमातून रोज ताशी किती वीज तयार होते, याची माहिती प्रत्येक मिनिटाला कळण्यासाठी पवनचक्कीच्या टाॅवरवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. त्यामुळे पवनचक्कीच्या माध्यमातून दर मिनिटाला तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा आणि वाऱ्याचा वेग यांची माहिती तत्काळ मोबाईलवर उपलब्ध होते. यावरून पवनचक्कीची क्षमता लक्षात येण्यास मदत होते. तसेच पवनचक्की चालू आहे की बंद आहे, याची तत्काळ माहिती समजते.  पवनचक्क्यांची विक्री  खडकवासला येथील आलू श्रीवास्तव, कवठेमहांकाळ येथील महादेव शिंदे यांना विक्री केली. याशिवाय घोडगंगा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर लवकरच बसविण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com