सोयाबीनमधील मंदीची कारणे

सोयाबीनमधील मंदीची कारणे
सोयाबीनमधील मंदीची कारणे

जगात सलग तिसऱ्या वर्षी सोयाबीनचे उच्चांकी उत्पादन अपेक्षित आहे. अमेरिकी कृषी खात्याने ९ नोव्हेंबरला जारी केलेल्या अहवालात २०१७-१८ मध्ये जगात ३४.८ कोटी टन उत्पादनाचे अनुमान आहे. नुकतेच अमेरिकेतील सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. या वर्षी अमेरिकेत विक्रमी १२ कोटी टन उत्पादनाचे अनुमान आहे. मागील दोन वर्षांत अनुक्रमे ११.६ कोटी टन, १०.६ कोटी टन असे उत्पादन अमेरिकेत झाले आहे. अमेरिकेच्या खालोखाल लॅटिन अमेरिकेतील-ब्राझीलमध्ये १०.८ कोटी टन, तर अर्जेंटिनात ५.७ कोटी टन उत्पादनाचा अंदाज आहे. हे तीन देश मिळून जगातील ८२ टक्के सोयाबीन पिकवतात आणि स्वाभाविकपणे जगाच्या बाजारातील दरही नियंत्रित करतात. भारतात सरकारी आणि खासगी अनुमानाचा मध्य काढला तर यंदा सुमारे एक कोटी टन सोयाबीन उत्पादन अपेक्षित आहे.  मंदीची पार्श्वभूमी  अमेरिकेत २०१२-१३ मध्ये ५२ वर्षांतील सर्वांत मोठा दुष्काळ पडला होता. त्या वेळी आजच्या तुलनेत अमेरिकेतील आणि जगातील उत्पादन आणि शिल्लक साठ्यांच्या आकड्यावर नजर मारल्यास आजच्या मंदीमागील नेमके कारण स्पष्ट होईल. २०१२-१३ मध्ये जागतिक उत्पादन २६.७ कोटी टन होते. आजचे जागतिक उत्पादन त्या तुलनेत ३० टक्के अधिक आहे. या वाढीत प्रामुख्याने अमेरिकेचा वाटा आहे. २०१२-१३ मध्ये अमेरिकी उत्पादन ८ कोटी टनांपर्यंत घटले होते. या तुलनेत आजचे अमेरिकेचे उत्पादन ५० टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत शिल्लक साठ्यांतील वाढही लक्षणीय आहे. उत्पादन आणि शिल्लक साठ्यांचे प्रतिबिंब बाजारावर पडते. पुढील वर्षी एकूण जागतिक उत्पादनाच्या सुमारे २८ टक्के जुना माल शिल्लक राहणार आहे.  सोयाबीन हे प्रामुख्याने ''मिल क्रॉप'' आहे. तेल निघाल्यानंतर उरणाऱ्या सोयामिलच्या भावानुसार सोयाबीनचा भाव ठरतो. अर्जेंटिना हा जगातील सर्वांत मोठा सोयामिल निर्यातदार आहे. अमेरिकेतील उत्पादनघटीमुळे २०१२ मध्ये अर्जेंटिनातील सोयामिल ५५० डॉलर प्रतिटनापर्यंत पोचले होते. आशिया डिलिव्हरीसाठी ते ६०० डॉलर प्रतिटन होते. आज वर उल्लेख केलेल्या जागतिक उत्पादनवाढीमुळे अर्जेंटिनातील दर ३५० डॉलर प्रतिटनापर्यंत घटले आहेत. म्हणजे जवळपास निम्म्यापर्यंत कमी झाले आहे. सध्या जागतिक सोयाबीनचा बाजार २०१०-११ च्या पातळीपर्यंत घटला आहे, तो या जागतिक उत्पादनवाढीमुळेच. आता २०१२-१३ मध्ये भारतात सोयाबीनचा बाजारभाव ४८०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत का पोचला होता, याचा उलगडा होईल. जागतिक तेजीचा भारतीय सोयाबीन आणि सोयामिल बाजाराला अभूतपूर्व फायदा झाला. याच दरम्यान, अण्वस्त्रप्रश्नी निर्बंधांमुळे अमेरिका खंडातून इराणला होणारी सोयामिल निर्यात पूर्णपणे थांबली. भारताखेरीज अन्य पर्याय इराणपुढे नव्हता. भारतीय निर्यातदारांनी ८०० डॉलर प्रतिटनापर्यंत मोठा प्रीमियम घेऊन इराणला सोयामिल विकले होते. त्या वेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ५२ रु. होता. त्यानुसार ४१ हजार रु. प्रतिटनापर्यंत सोयामिलचे दर वाढले होते. भारतात सोयामिलपेक्षा सुमारे पंधरा टक्के प्रीमियमवर सोयाबीनचा दर चालतो. म्हणूनच, त्या वेळी सोयाबीनचे दरही ४८०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत पोचले होते. यामुळे २०१२-१३ मध्ये भारतातून ऐतिहासिक ४८ लाख टन सोयामिल निर्यात झाले होते. आजघडीला जागतिक मंदीमुळे २३ हजार प्रतिटनापर्यंत (३५३ डॉलर प्रतिटन) भारतीय सोयामिलचे दर खाली आले आहेत. अर्जेंटिना व भारतीय सोयामिलचा आग्नेय आशियाई व सार्क देशांतील सोयामिलचा पोच दर आता जवळपास सारखाच झाला आहे. गेल्या पाच वर्षांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य २५ टक्क्यांनी घटले. रुपयाचे मूल्य घटले की शेतीमाल निर्यातीला फायदा होतो. एवढाच काय तो आधार सोयाबीनला मिळाला आहे. सरकारी अनास्थेचे बळी भारतात सोयाबीनमधील मंदी जागतिक कारणामुळे असली तरी किमान आधारभूत किमतीच्या खाली दर जाण्यास सर्वस्वी सरकारी अनास्था जबाबदार आहे. सोयाबीनचा हंगाम सुरू होण्याच्या सहा महिने आधीच जागतिक मंदी स्पष्ट दिसत होती. एकीकडे सोयातेलाची वार्षिक आयात विक्रमी ५० लाख टनांवर पोचली असताना, दुसरीकडे सोयामिल निर्यात जवळपास ठप्प झाली. स्वस्त सोयातेलावर आयातकर वाढवणे आणि सोयामिलसाठी दहा टक्के निर्यात अनुदान देणे याबद्दल काहीही हालचाल झाली नाही. (सोयातेलावर आयातकर वाढवण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला. पण आता खूप उशीर झाला आहे.) शिवाय सगळ्यात मोठ्या उत्पादक राज्याने - मध्य प्रदेशने - भावातर योजनेसारखी चांगली संकल्पना चुकीच्या पद्धतीने राबवली. त्यामुळे देशभरातील सोयाबीनचे बाजारभाव आणखी मंदीत गेले आहेत. (लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com