मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍विंटल ६४ किलो

मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍विंटल ६४ किलो
मराठवाड्यात सोयाबीन पिकले एकरी ३ क्‍विंटल ६४ किलो

औरंगाबाद : मराठवाड्यातील लातूरसह उस्मानाबाद, नांदेड, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांत यंदा सोयाबीनचे एकरी सरासरी उत्पादन केवळ ३ क्‍विंटल ६४ किलो झाले आहे. उडदाची उत्पादकता १ क्‍विंटल १८ किलो, तर मुगाची उत्पादकताही एकरी १ क्‍विंटल १२ किलोपुढे सरकली नाही. त्यातच आधी प्रदीर्घ खंडानंतर परतीच्या पावसाने सोयाबीनचे केलेले नुकसान व मिळत नसलेला हमीभाव यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.  लातूर कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोगावरून लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी व हिंगोली या पाच जिल्ह्यांतील सोयाबीन, उडीद, मूग या पिकांची यंदाची उत्पादकता समोर आली आहे. पाचही जिल्ह्यांत यंदा मुगाच्या पिकाचे १५४० पीक कापणी प्रयोग घेण्याचे नियोजन होते. त्यापैकी १५२५ प्रयोग घेण्यात आले. या प्रयोगामध्ये लातूर कृषी विभागातील मुगाची हेक्‍टरी उत्पादकता २८१ किलोग्रॅम आली आहे. मुगापाठोपाठ पाचही जिल्ह्यांत यंदा उडदाच्या १५०४ पीक कापणी प्रयोगाचे नियोजन होते. त्यापैकी १४८६ प्रयोगाअंती उडदाची हेक्‍टरी उत्पादकता २९५ किलोग्रॅम इतकी आली आहे.  संपूर्ण मराठवाड्यात लातूर कृषी विभागातील हिंगोली जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकता सर्वाधिक आली आहे. हेक्‍टरी ११४५ किलो सोयाबीन हिंगोली जिल्ह्यात पिकल्याचे कापणी प्रयोगाचे आकडे सांगतात, तर त्यापाठोपाठ ११३२ किलो हेक्‍टरी सोयाबीन लातूर जिल्ह्यात पिकले आहे. संपूर्ण लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत हेक्‍टरी सरासरी ९१२ किलो सोयाबीन पिकल्याचे कृषी विभागाच्या पीक कापणी प्रयोग अहवालावरून पुढे आले आहे. संपूर्ण मराठवाड्यात यंदा सोयाबीन, उडीद, मुगाची उत्पादकता काढण्यासाठी जवळपास पाच हजारांवर पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले होते. 

जिल्हानिहाय पिकांची उत्पादकता (उत्पादकता हेक्‍टरी किलोग्रॅममध्ये)

जिल्हा मूग उडीद सोयाबीन 
औरंगाबाद ३१७ ६१८ ८३४
जालना १८५ ३३४ ७४५
बीड २६७ ४०८ ७५१
लातूर ३३० ३४४ ११३२
उस्मानाबाद १९९ २११ ६३१
नांदेड २९२ २६१ ७९५
परभणी २१५ २९१ ८५६
हिंगोली ३६९ ३७० ११४५

कापणी प्रयोग निष्कर्ष औरंगाबाद जिल्ह्यात मूग पीक कापणीचे १९६ प्रयोग घेण्यात आले. त्यानुसार मुगाची हेक्‍टरी उत्पादकता हेक्‍टरी ३१७ किलोग्रॅम आली. त्यापाठोपाठ उडदाच्या ७६ नियोजित प्रयोगांपैकी ६६ प्रयोगांतून हेक्‍टरी उत्पादकता ६१८ किलोग्रॅम, तर सोयाबीनच्या १२७ प्रयोगांतून हेक्‍टरी उत्पादकता ८३४ किलोग्रॅम आली. जालना जिल्ह्यात सोयाबीन हेक्‍टरी ७४५ किलो, बीड जिल्ह्यात हेक्‍टरी ७५१ किलो पिकले.  कपाशीची उत्पादकता अजून बाकी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली व परभणी या पाच जिल्ह्यांत यंदा कपाशीची उत्पादकता काढण्यासाठी १३५४ प्रात्यक्षिकांचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु या नियोजनानुसार अजून एकाही जिल्ह्याकडून कपाशीच्या उत्पादकतेविषयीचा अहवाल विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूरकडे प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com