सोयाबीनची विक्रमी आयात होण्याची चिन्हे

सोयाबीनची विक्रमी आयात होण्याची चिन्हे
सोयाबीनची विक्रमी आयात होण्याची चिन्हे

पुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे यंदा देशात मोठा साठा असूनही सोयाबीनची विक्रमी आयात होण्याची शक्यता आहे. यंदा सुमारे १ लाख टन सोयाबीन आयात करण्याचे करार झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. देशातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत (८३ ते ८५ लाख टन) आयातीचा आकडा नगण्य असल्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात मोठी पडझड होण्याची शक्यता नाही. परंतु आगामी काळात सोयाबीनचे दर वाढणार नाहीत, यावर या आयातीमुळे शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यंदा आफ्रिकी देशांतून सुमारे एक लाख टन सोयाबीन आयात करण्याचे करार भारतीय आयातदारांनी केले आहेत. गेल्या वर्षीही सोयाबीनची आयात झाली होती; परंतु त्याचे प्रमाण अगदीच कमी होते. यंदा मात्र डिसेंबरपासूनच आयातीचा वेग वाढला आहे. देशात यंदा पहिल्यांदाच एक लाख टन सोयाबीन आयातीचा टप्पा गाठला जाण्याची चिन्हे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा प्रति टन ४१० ते ५३० अमेरिकी डॉलर या दराने सोयाबीन आयातीचे व्यवहार झाले आहेत. देशात मात्र सोयाबीनला प्रति टन ५६१ ते ५६५ अमेरिकी डॉलर इतका दर आहे. देशात सोयाबीनचा मोठा साठा उपलब्ध आहे; परंतु आंतरराष्ट्रीय बाजारात स्वस्तात सोयाबीन उपलब्ध झाले असल्यामुळे आयातीकडे कल वाढला आहे. भारतात केवळ नॉन जीएम सोयाबीन आयातीला परवानगी आहे. देशात यंदा ८३ ते ८५ लाख टन सोयाबीन उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सुमारे ११० लाख टन उत्पादन झाले होते. देशातील एकूण उत्पादनाच्या तुलनेत सोयाबीन आयातीचे प्रमाण एक टक्क्याच्या आसपास राहणार आहे. त्यामुळे या आयातीमुळे देशातील सोयाबीनच्या दरात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. परंतु या घडामोडीमुळे बाजाराचा कल स्पष्ट झाला असून सोयाबीनच्या दर आगामी काळात वाढण्याची शक्यता नाही, याचे हे स्पष्ट संकेत आहेत असे सूत्रांनी सांगितले. `परदेशात स्वस्तात सोयाबीन उपलब्ध असल्यामुळे यंदा मोठी आयात झाली आहे. ही आयात आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन आयातीवरही याचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे,` असे शेतमाल बाजार विश्लेषक सुरेश मंत्री यांनी सांगितले.

अर्जेन्टिनामध्ये प्रतिकूल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीनचे दर वाढण्याला पाठबळ मिळेल, असे आडाखे बांधले जात होते. परंतु ब्राझिल या प्रमुख सोयाबीन उत्पादक देशामध्ये पीक चांगले असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनचा पुरवठा चांगला राहील. परिणामी सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता मावळली आहे, असे मंत्री यांनी स्पष्ट केले. भारतात आगामी मॉन्सूनचे चित्र कसे राहते, यावरही सोयाबीनच्या दरात सुधारणा होणार किंवा नाही, हे बऱ्याच अंशी अवलंबून आहे. परंतु आगामी मॉन्सूनविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग आणि खासगी हवामानविषयक संस्था यांचे परस्परविरोधी अंदाज आल्यामुळे त्या मुद्याचाही बाजारावर फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही, असे मंत्री म्हणाले.

सध्या बाजारात सोयाबीनचे दर ३६५० ते ३८०० रुपये क्विंटल असून सोयाबीनच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता नाही; त्यामुळे या दरपातळीला सोयाबीन विकून टाकणे फायदेशीर ठरेल, असे मंत्री म्हणाले. लातूर येथील व्यापाऱ्यांनीही या निरीक्षणाला दुजोरा दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com