सोयाबीन खरेदी केंद्रे नावालाच

लातूर जिल्ह्यात एका महिन्यात या दहा खरेदी केंद्रांवर २२४ शेतकऱ्यांची ४४५ क्विंटल मूग, ४२४ शेतकऱ्यांची एक हजार ५१० क्विंटल उडीद व पाच शेतकऱ्यांची ८० क्विंटल सोयाबीन खरेदी केली आहे. जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. त्यांना एसएमएसही पाठवले आहेत; परंतु ओलावा जास्त असल्याने शेतकरी मालच आणत नाहीत. -वाय. ई. सुमठाणे , जिल्हा मार्केटिंग अधिकारी.
सोयाबीन खरेदी केंद्रे नावालाच
सोयाबीन खरेदी केंद्रे नावालाच

लातूर : राज्य शासनाने गाजावाजा करत सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू केली. त्याच्या मोठ मोठ्या जाहिरातीही केल्या जात आहेत; परंतु शासनाच्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांचा या खरेदी केंद्रांवर भरोसाच राहिलेला दिसत नाही. यामुळे शेतकरी हमीभावापेक्षा कमी भावाने बाजारात सोयाबीनची विक्री करत आहेत. लातूर जिल्ह्यात तर ही केंद्रे नावालाच सुरू केली आहेत. जिल्ह्यातील दहा खरेदी केंद्रांवर एक महिन्यात पाच शेतकऱ्यांची केवळ ८० क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे, तर एकट्या लातूर बाजार समितीच्या अडत बाजारात एका महिन्यात सव्वाचार लाख क्विंटलचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले आहेत. शासनाने ओलाव्याची अट शिथिल केली, तर ही खरेदी वाढून शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडणार आहेत.

जिल्ह्यात खरिपात चार लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. त्यात या वर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले; पण अडत बाजारात मात्र भाव पडलेले आहेत. राज्य शासनाच्या वतीने हमीभावाने खरेदी करण्यासाठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात १२ आक्टोबरपासून लातूर व उदगीर येथे खरेदी केंद्रे सुरू झाली.

त्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असे एकूण दहा खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली. याकरिता पहिल्यांदा शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणी करावी लागत आहे. त्यात तलाठी पीकपेरा प्रमाणपत्र देत नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. १२ टक्के ओलावा असेल, तरच या खरेदी केंद्रांवर सोयाबीनची खरेदी केली जात आहे; पण परतीच्या पावसामुळे सोयाबीनमध्ये थोडा जास्त ओलावा आहे. त्यामुळे असे सोयाबीन परत पाठवले जात आहे. त्याचा परिणाम शेतकरी या खरेदी केंद्राकडे येतच नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १२ आक्टोबर ते १२ नोव्हेंबर या एका महिन्यात जिल्ह्यात उदगीर येथील खरेदी केंद्रांवर पाच क्विंटल, अहमदपूरमध्ये ४१ क्विंटल व औसा येथे ३४ क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. एकट्या लातूर बाजार समितीच्या अडत बाजारात या एका महिन्यात सव्वाचार लाख क्विंटल सोयाबीनची खरेदी विक्री झाली आहे. यावरून सोयाबीन खरेदी केंद्रे नावालाच असून, यावर शेतकऱ्यांचा भरोसाच नाय असे चित्र सध्या लातूर जिल्ह्यात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com