साताऱ्यात सोयाबीन खरेदी संथ गतीने

सोयाबीन चाळणी
सोयाबीन चाळणी
सातारा ः शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात नाफेडद्वारे चार केंद्रे सुरू करण्यात आली. मात्र त्यातील कोरेगाव केद्रांचा अपवाद वगळता इतर तीन केंद्रांवर सोयाबीनची खरेदी अत्यंत संथ गतीने सुरू आहे. परिणामी शेतकऱ्यांनी गरजेपोटी आता खासगी व्यापाऱ्यांना सोयाबीन विकण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नाफेडने हमीभाव दरापेक्षा कमी किमतीत सोयाबीन खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्याबरोबरच मुबलक प्रमाणात खरेदी होण्यासाठी यंत्रणा उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे.    
 
जिल्ह्यात खरिप हंगामात ७३ हजार हेक्‍टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. सोयाबीन काढणी अंतिम टप्प्यात आली असून जिल्ह्यात सर्वसाधारण सात लाख क्विंटल उत्पादनाची शक्‍यता आहे. व्यापाऱ्यांकडून कमी दराने सोयाबीनची खरेदी होत असल्याने नाफेडद्वारे जिल्ह्यात चार खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. कोरेगाव खरेदी केंद्राचा अपवाद वगळता इतर तीन खरेदी केंद्रांवर कमालीच्या संथ गतीने सोयबीन खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे.
 
गुरुवारपर्यंत (ता.९) या चार केंद्रांवर अवघी २५६४ क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे. यामध्ये एकट्या कोरेगाव केंद्रावर १४१४.८९ क्विंटल खरेदी झाली आहे. उर्वरित तीन केंद्रवार ११५० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. केंद्रावर सोयाबीनची विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. चांगला दर मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. अनेक केंद्रांवर १५ दिवस होऊन गेले तरी मेसेज येत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.
 
खरेदी केंद्रावर विक्री केल्यानंतर आठ ते १५ दिवसांनी खात्यावर पैसे जमा होत असल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांचा रस्ता धरण्याची वेळ प्रशासनाच्या चुकीमुळे आली आहे. २२०० ते २६०० रुपये क्विंटल प्रमाणे व्यापारी सोयाबीन खरेदी करत असल्याने क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपये तोटा सहन करावा लागत आहे. 
 
केंद्रावर सोयाबीन खरेदीचा ढिसाळपणा सुरू असल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्याला विक्री करत आहेत. या संथ खरेदीचा फायदा व्यापाऱ्यांकडून संधीत करून घेतला जात आहे. गरजेपोटी कमी दराने तसेच माती, निकृष्ट वजनकाटे वापर तसेच रिवाजचा नावाखाली कपात घालत शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून राजरोसपणे हे काम सुरू आहे. 

नाफेड व जिल्हा मार्केटिंग विभागाकडून जलदगतीन सोयाबीन खरेदी करण्यासाठी यंत्रणा वाढविणे गरजेचे आहे. खरेदीसाठी नाव नोंदणी केल्यानंतर आठ दिवसांत सोयाबीनची खरेदी केली जावी. व्यापाऱ्याप्रमाणे सोयाबीनच्या दोन ग्रेड करून खरेदी करण्याची मागणी होत आहे. ए ग्रेड सोयाबीनला २८५० रुपयांचा हमीभाव व २०० रुपये बोनस अशी ३०५० रुपये क्विंटल या प्रमाणे तसेच कमी दर्जाच्या सोयाबीनची २७०० ते २८०० रुपयांनी खरेदी सुरू केली जावी. यामुळे खरेदी केंद्रावर आणलेले सोयाबीन माघारी घेऊन जावे लागणार नाही. दोन ग्रेड केल्यामुळे शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक टाळणे शक्‍य होणार आहे. 

हमीभाव मिळण्यासाठी सोयाबीन दर्जेदार असणे आवश्‍यक असल्याने शेतकऱ्यांना अनेक प्रकारची कष्ट घेत आहेत. केंद्रावर खरेदी झालेले सोयाबीन नाफेडकडे पाठवले जाते. मात्र कऱ्हाड व सातारा केंद्रावर सोयाबीनच्या दोन गाड्या नाफेडकडून अप्रमाणित करण्यात आल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. अप्रमाणित सोयाबीनचे काय करायचे, त्याचे पैसे शेतकऱ्यांना कसे द्यायचे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
 
सोयाबीनची विक्री कशी करावी, हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. सुरवातीच्या काळात जाचक अटी, त्यानंतर नाव नोंदणी करून खरेदी होत नसल्याचा त्रास, अप्रमाणित करण्यात आलेले सोयाबीन, सोयाबीनचे पैसे रोखीत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सोयाबीन घरी ठेवावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण निर्माण होऊ लागला आहे. परिणामी पुढील वर्षी सोयाबीन क्षेत्रात घटीची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com