परभणी विभागात ‘महाबीज’च्या सोयाबीन बीजोत्पादनाला फटका

सोयाबीन
सोयाबीन
परभणी  ः महाबीजच्या परभणी विभागांतर्गतच्या ६ जिल्ह्यांमध्ये २०१७-१८ मधील खरीप हंगामामध्ये २ लाख ४१ हजार ८१३ क्विंटल बीजोत्पादन झाले आहे. पीक वाढ, परिपक्वतेच्या अवस्थेत आलेला पावसाचा खंड, काढणी काळात पडलेल्या पावसात भिजल्यामुळे नापास बियाण्यांचे प्रमाण वाढले, त्यामुळे यंदा सोयाबीन बीजोत्पादनाला मोठा फटका बसला आहे.
 
२०१७ -१८ मध्ये महाबीजच्या परभणी विभागांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर या सहा जिल्ह्यांमध्ये सोयाबीन, मूग, उडीद, तूर, बाजरी, ज्वारी, कापूस, ज्यूट या पिकांच्या पायाभूत आणि प्रमाणित मिळून एकूण ३४ हजार ५४.५ हेक्टरवर बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आला. बीजोत्पादनाचे ४ लाख ८ हजार ७१३.५ क्विंटल उद्दिष्ट होते.
 
परंतु प्रत्यक्षात २६ हजार २६०.८० हेक्टरवर पेरणी करून १० हजार ४१९ शेतकऱ्यांनी महाबीजकडे नोंदणी केली होती. त्यापैकी ९ हजार ३४१ शेतकऱ्यांच्या २४ हजार ७ हेक्टरवर बीजोत्पादन पीक उभे होते. त्यापासून ३ लाख २८ हजार १५० क्विंटल बीजोत्पादन अपेक्षित होते; परंतु प्रत्यक्षात ४८७२ शेतकऱ्यांनी २ लाख ४१ हजार ८१३ क्विंटल कच्चे बियाणे महाबीजकडे जमा केले आहे.
 
यामध्ये ४६१७ शेतकऱ्यांनी २ लाख ३८ हजार ४४३.९५ क्विंटल सोयाबीन, ४९ शेतकऱ्यांनी ३८७ क्विंटल मूग, १२४ शेतकऱ्यांनी १५५४.७६ क्विंटल उडीद, ७१ शेतकऱ्यांनी १,३९८ क्विंटल तूर, ४ शेतकऱ्यांनी ४.१६ क्विंटल कापूस, ५ शेतकऱ्यांनी ५.५१ क्विंटल बाजरी, २ शेतकऱ्यांनी १५.४० क्विंटल ज्यूटचे बियाणे महाबीजकडे जमा केले आहे.
 
सर्वच पिकांच्या वाढ, परिपक्वेतेच्या अवस्थेत पडलेला पावसाचा दीर्घ खंड, ऐन काढणीच्या वेळी आलेला पाऊस तसेच कीड, रोगाचा बीजोत्पादनाला फटका बसला. पावसात भिजल्यामुळे सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणावर नापास झाल्यामुळे बीजोत्पादनात घट आली, असे सूत्रांनी सांगितले.
 
 
जिल्हानिहाय बीजोत्पादन (क्विंटल)
जिल्हा बीजोत्पादन
परभणी ५६,४२३
हिंगोली १,०५,७९०
नांदेड १०,२५५
लातूर २९,५७०
उस्मानाबाद ३८,४३५
सोलापूर १३३९

 

 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com