सोयाबीन अनुदान खात्यावर जमा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी : २०१६ मध्ये बाजार भावात घसरण झाल्यामुळे १ ऑक्‍टोंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेले प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे बुधवार (ता. ६) पर्यंत परभणी जिल्ह्यातील १० हजार ४३२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ५६ लाख ९७ हजार ३६५ रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.

अद्याप ५ हजार १३६ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. बाजार समित्यांकडून अनुदानाचे धनादेश जमा करूनही बॅंकांकडून खात्यावर रक्कम जमा करण्याचे काम अतिशय संथ गतीने केले जात असल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे.

दरम्यान, बॅंक खाते क्रमांक, आयएफएससी क्रमांक आदी मधील चुकांच्या दुरुस्तीसाठी संबंधित तालुक्‍याच्या सहायक निबंधक कार्यालयाशी लाभार्थी शेतकऱ्यांनी संपर्क करणे आवश्‍यक आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

१ ऑक्‍टोबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत जिल्ह्यातील ११ कृषी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्री केलेल्या शेतकऱ्यांपैकी १५ हजार ५६८ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून, त्यांच्या खात्यावर २०० रुपये प्रतिक्विंटल या प्रमाणे २५ क्विंटलच्या मर्यादेत अनुदानाची रक्कम जमा करण्यात येत आहे.

त्यासाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडे प्राप्त झालेली ५ कोटी २६ लाख ७५ हजार ३४० रुपये रक्कम संबंधित बाजार समित्यांकडे जमा करण्यात आल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या मराठी भाषेतील याद्या बॅंकाकडे पाठविण्यात आल्या. परंतु बॅंकांनी इंग्रजी भाषेतील याद्या मागितल्यामुळे बाजार समित्यांनी परत इंग्रजी भाषेतील याद्या तसेच अनुदान रकमेचा धनादेश बॅंकाकडे जमा केले आहेत.

मात्र अनेक बॅंका दिवसभरात जेमतेम १०० ते २०० शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करत आहेत. बुधवार (ता. ६) पर्यंत परभणी बाजार समिती अंतर्गंतच्या २ हजार ४८४ शेतकऱ्यांपैकी १ हजार ४७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ लाख ६४ हजार ३८ रुपये अनुदान जमा करण्यात आले आहे.

जिंतूरमध्ये २ हजार ८४० पैकी २ हजार ५८९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ९० लाख १५ लाख ५७६ रुपये, बोरीमध्ये सर्व १ हजार ५६२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ४७ लाख २ हजार ५७२ रुपये, सेलूमध्ये २ हजार ६१९ पैकी १ हजार २४६ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३७ लाख ६६ हजार ३१४ रुपये, मानवतमध्ये १ हजार ७४७ पैकी ४०३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १० लाख ७१ हजार ९५४ रुपये, पाथरीमध्ये १ हजार ४३ पैकी ३९ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ लाख २२ हजार २०० रुपये, सोनपेठमध्ये ३२९ पैकी ३२८ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२ लाख १४ हजार २२२ रुपये, गंगाखेड मध्ये ५०४ पैकी ५०३ शेतकऱ्यांच्या खात्यावर १५ लाख ९७ हजार ३६४ रुपये, पालम मध्ये १३५ पैकी १३४ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ लाख २६ हजार ७८६ रुपये, पूर्णामध्ये १ हजार ३८२ पैकी १ हजार ३६५ शेतकऱ्यांच्या ५० लाख २२ हजार ८९५ रुपये, असे एकूण १० हजार ४३२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३ कोटी ५६ लाख ९७ हजार ३६५ रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे.

अद्याप ५ हजार १३६ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ६९ लाख ७७ हजार ९७५ रुपये अनुदाम जमा करण्यात आलेले नाही. बॅंकाकडून खात्यावर जमा करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com