जालन्यात सोयाबीनची उत्पादकता सर्वात कमी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद (प्रतिनिधी) : पावसाचा टक्‍का समाधानकारक दिसत असला तरी मराठवाड्यातील पिकांवर पावसाच्या खंडाने मोठा आघात केला आहे. त्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीमुळे औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जालना जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता सर्वात आली असून बीड जिल्ह्यात मका आणि बाजरीची उत्पादकता खालावली आहे.

जालना, औरंगाबाद व बीड जिल्ह्यात आजवर अपेक्षित पावसाच्या तुलनेत ९५ टक्‍के पाऊस पडल्याचे दिसत असले तरी जून, जुलै व ऑगस्ट या तीनही महिन्यांत पावसाच्या प्रदीर्घ खंडांनी यंदाच्या खरिपाचे मोठे नुकसान केले. या तीन जिल्ह्यात ३ लाख २० हजार हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी झाली. काही ठिकाणी सुडी लावून ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनी मळणी केली तर काही ठिकाणी अजूनही मळणीचे काम सुरू आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात सोयाबीनची हेक्‍टरी उत्पादकता ८८० किलोग्रॅम आली असून बीड जिल्ह्यात हेक्‍टरी ७५१ किलोग्रॅम तर जालना जिल्ह्यात केवळ ६३५ किलोग्रॅम इतकी आली आहे. केवळ उत्पादकताच कमी आली नसून सोयाबीनचा रंगही परतीच्या पावसाने बिघडवून टाकल्याने उत्पादीत सोयाबीन कवडीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच तीनही जिल्ह्यात मकाची २ लाख ४८ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली. मकाची काढणी पूर्ण झाली असून मळणीचे काम सुरू आहे.

मकाच्या उत्पादकतेत औरंगाबाद जिल्हा आघाडीवर असून हेक्‍टरी २३९१ किलोग्रॅम उत्पादकता आली आहे. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात हेक्‍टरी १६१९ किलोग्रॅम तर बीड जिल्ह्यात केवळ ८९१ किलोग्रॅम प्रतिहेक्‍टर उत्पादकता आली असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

बाजरीच्या उत्पादनातही बीड जिल्ह्यात सर्वात कमी हेक्‍टरी ६०९ किलोग्रॅम उत्पादकता आली आहे. त्यापाठोपाठ जिल्ह्यात हेक्‍टरी ७८२ किलोग्रॅम तर औरंगाबाद जिल्ह्यात बाजरीची सर्वाधिक ९२७ किलोग्रॅम हेक्‍टरी उत्पादकता आली आहे.

जिरायतीत कापसाची एकच वेचणी अपेक्षित यंदा जिरायती कपाशीच्या क्षेत्रात पावसाच्या खंडामुळे पहिल्या वेचणीनंतर अल्प प्रमाणात दुसरी वेचणी होण्याची शक्‍यता आहे. पेरणीनंतर पावसाच्या प्रदीर्घ खंडाने जिरायती कपाशीच्या कायीक वाढीवर थेट परिणाम केला. त्यामुळे १० लाख ४८ हजार हेक्‍टरवरील कपाशीच्या पिकाची वाढच खुंटली. त्याचा थेट परिणाम कापसाच्या उत्पादकतेवर झाला आहे. कापसाची पहिली वेचणी जवळपास अंतिम टप्प्यात असून परतीच्या पावसाने तुरळक प्रमाणात जिरायती कपाशीत आणखी थोडीबहूत कापसाची वेचनी अपेक्षित असल्याचे कृषी विभागाचा अहवाल सांगतो.

बीड जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे कपाशीची समाधानकारक वाढ झाली नसून सप्टेबरमध्ये अनेक ठिकाणी कपाशीवर शेंदरी बोंडअळीचे आक्रमण झाले आहे.  त्यामुळे इतर पिकांबरोबरच कपाशीच्या उत्पादनातही यंदा निम्म्यापेक्षा जास्त फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. १ लाख २३ हजार हेक्‍टरवरील तुरीचे पीक फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. पिकावर झालेला कीड रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com