खामगावात सोयाबीन वधारले

खामगावात सोयाबीन वधारले

अकोला ः नोव्हेंबरच्या सुरवातीला कमी असलेला सोयाबीनचा दर या महिन्यात शेवटच्या टप्प्यात सुधारला. सध्या वऱ्हाडातील मोठी बाजारपेठ असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर टिकून अाहेत. २५०० ते २९०० दरम्यान सोयाबीन विकली जात अाहे. सोबतच सोयाबीनच्या अावकेत सुधारणा होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात अाले. सोयाबीनचा हंगाम सुरू झाल्यानंतर दर कमी होते. नोव्हेंबरच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीन दरांमध्ये १५० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली. ही वाढ अद्यापही बाजारात कायम अाहे. बाजारात २२ नोव्हेंबरला सोयाबीन २४०० ते २८२५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान विकले गेले. त्यानंतर २ डिसेंबरला सोयाबीनला २५०० ते २९१० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. गेल्या अाठवड्यात १२ हजार क्विंटलच्या अात असलेली अावक शनिवारी सुमारे १६ हजार क्विंटलपर्यंत पोचली होती. १५९०२ क्विंटल सोयाबीनची विक्री झाली. दरात झालेली सुधारणा गेले अाठ ते दहा दिवस टिकून राहली अाहे.  कापसाचे दर मात्र काहीसे स्थीर झाले अाहेत. खामगावमध्ये कापूस ४३२० ते ४५५० रुपये प्रतिक्विंटल या दरम्यान विकत अाहे. कापसाच्या अावकेचा विचार केला तर चारशे ते सव्वाचारशे क्विंटलदरम्यान विक्रीसाठी येत अाहे. कापसाचा हंगाम बोंड अळीमुळे वाया गेला अाहे. दिवसेंदिवस कापसाचा दर्जा खालावत असल्याने भावामध्ये वाढीची शक्यता सध्या तितकीशी दिसत नसल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे आहे.  तुरीची अावक १०० ते १५० क्विंटलदरम्यान होत असून, दर ३२००ते ३९२५ दरम्यान मिळाले. सध्या विक्रीसाठी येत असलेली तूर ही गेल्या हंगामातील अाहे. नवीन तुरीचा हंगाम येत्या महिनाभरात सुरू होईल. तोपर्यंत हे दर टिकतील. अावक वाढल्यानंतर त्यात चढ किंवा उतार किती राहू शकतो, याबाबत मात्र व्यापारी सूत्रांनी बोलण्यास नकार दिला. मुगाची अावक तीनशे क्विंटलपेक्षा अधिक सुरू अाहे. मुगाला ३६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल यादरम्यान दर मिळत अाहेत. गेल्या अाठवड्यात असलेला हा दर अाठवडा समाप्तीला अाला असता ३५०० ते ५१०० असा झाला. अावकही तीनशे क्विंटलपेक्षा जास्त म्हणजे ३१७ पोते झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com