बीजी - ३ चे घोडे अडले कुठे?

अमेरिकेत २०१४ पासून बोलगार्ड-३ (बीजी-३) बियाणे लागवडीसाठी वितरित करण्यात येते. बीजी-३ पिकात नियमितपणे बोंड अळ्यांच्या संख्येची मोजदाद (स्काउटिंग) होते. अळ्यांची संख्या ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास कीटकनाशकांची कमीत कमी फवारणी केली जाते.
संपादकीय
संपादकीय

आगामी हंगाम धोक्‍याचा सन २०१७ च्या खरीप हंगामात गुलाबी बोंड अळीच्या उद्रेकामुळे कपाशीचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. २०१८ च्या येणाऱ्या खरीप हंगामात गुलाबी आणि इतर बोंड अळ्यांचा कपाशीवरील उद्रेक आणखी वाढू शकतो. बोलगार्ड-१ (बीजी-१) वाणांमधील ‘क्राय१ एसी’ आणि बोलगार्ड-२ (बीजी-२) वाणांमधील ‘क्राय १ एसी + क्राय २ एबी’ या जनुकांच्या विरुद्ध बोंडअळ्यांमध्ये आनुवंशिक प्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे. तेव्हा प्रतिकारशक्ती निर्माण झालेल्या अळ्यांची पुढील पिढी येत्या खरीप हंगामातील कापूस पिकावर अधिक प्रखरपणे आणि लवकर हल्ला चढवू शकते. तथापि, शेतकऱ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे.

देशी कपाशीचा वाढवा पेरा  बोंड अळ्यांच्या पुनरुत्पत्तीत खंड पाडण्यासाठी येत्या खरिपात अमेरिकन कपाशीचे पीक न घेणे उत्तम. त्यासाठी इतर पीक पद्धतींचा विचार करून शेतकऱ्यांना वेळीच सल्ला दिला पाहिजे. देशी कपाशीचा पेरा वाढविण्याकडेही लक्ष दिले पाहिजे. त्या दृष्टीने बियाण्याची उपलब्धता केली पाहिजे. अमेरिकन कपाशीची लागवड केली तर एकात्मिक कीड नियंत्रणाची मोहीम नेटाने राबविली पाहिजे.

बियाणे संघटनेचा ‘यू’टर्न राष्ट्रीय बियाणे संघटनेने ४ जानेवारी, २०१८ रोजी जाहीर केले होते, की यंदा त्यांच्यातर्फे बीटी कापूस बियाणे विकले जाणार नाही. तथापि, १४ जानेवारी २०१८ रोजी या संघटनेने पुनः जाहीर केले, की केवळ शेतकऱ्यांच्या हिताचा (?) विचार करून कंपन्यांकडील बीटी बियाणे विकण्याचे त्यांनी आता ठरविले आहे. बोंड अळ्यांमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झालेली असताना आणि गेल्या हंगामात बीटी कपाशीचे अतोनात नुकसान झालेले असताना बीजी-१ किंवा बीजी-२ बियाणे पुनः येत्या खरिपात लागवड करून काय परिस्थिती उद्भवेल याची कल्पना करायला हवी. 

बीजी - ३ चे काय झाले? वास्तविक २००९ ते २०१२ या काळात बोंड अळ्यांमध्ये (गुलाबी बोंडअळीसह) बीजी-१ आणि बीजी-२ विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लगेचच बीजी-३ (क्राय १ एसी + क्राय २ एबी + व्हीप ३ ए अशी तीन जनुकेयुक्त) वाणांच्या भारतात चाचण्या घेण्यासंबंधीची हालचाल कंपन्यांनी करायला हवी होती. असे झाले असते तर अमेरिका, ऑस्ट्रेलियाप्रमाणे २०१४ मध्ये भारतातील शेतकऱ्यांनासुद्धा बीजी-३ बियाणे उपलब्ध  झाले असते. त्यामुळे त्यांचे बोंड अळ्यांच्या हल्ल्यापासून होणारे नुकसान झाले नसते पण बीजी-३ चे घोडे कुठे अडले, ते कळत नाही.

अमेरिकेत बीजी-३चे ही काटेकोर नियोजन अमेरिकेतील ॲरिझोना राज्यात गुलाबी बोंड अळीमध्ये बीटी जनुकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे २००९ मध्ये नरवंधत्व तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्रतिकारक्षम अळ्यांचे तीन वर्षांत नियंत्रण करण्यात आले. प्रयोगशाळेत बोंड अळीचे वंध्यत्व असलेले नर निर्माण करून जोपासले जातात. वंधत्व असलेले वाण कापसाच्या शेतात सोडल्यानंतर प्रतिकारशक्ती असलेल्या माद्यांशी त्यांचे मिलन होऊन पुढील पिढीचे पुनरुत्पादन होत नाही. अमेरिकेत २०१४ पासून बीजी-३ बियाणे लागवडीसाठी वितरित करण्यात येते. बीजी-३ कापसाच्या पिकात नियमितपणे बोंड अळ्यांच्या संख्येची मोजदाद होते. अळ्यांची संख्या ठराविक मर्यादेपेक्षा वाढल्यास कीटकनाशकाची फवारणी (कमीत कमी) केली जाते. बीजी-३ मध्येसुद्धा गुलाबी बोंड अळीचे १०० टक्के नियंत्रण करण्याची क्षमता नाही. म्हणूनच बोंड अळीत प्रतिकारशक्ती (बीटी जनुकांविरुद्ध) विकसित होऊ नये यासाठीचे व्यवस्थापन काटेकोरपणे तेथे केले जाते. त्यासाठी रेफ्यूजी बियाण्याची लागवड २० ते ५० टक्के क्षेत्रावर केली जाते. पिकामध्ये कामगंध सापळ्यांचासुद्धा वापर केला जातो. कापूस वेचणीनंतर उर्वरित बोंडे व काडीकचरा नष्ट केला जातो. ऑस्ट्रेलियातसुद्धा या सर्व बाबी कटाक्षाने पाळल्या जातात. त्यामुळे तेथे बोंड अळ्यांची प्रतिकारशक्ती विकसित होण्याची समस्या गेल्या २० वर्षांत उद्भवली नाही. या दोन्ही देशांत सरळ कापूस वाणांची लागवड केली जाते. 

चीनमध्ये एफ-२ रेफ्युजीच्या भूमिकेत   चीनमध्ये रेफ्यूजी बियाणे लावले जात नाही, त्यामुळे तेथेसुद्धा बोंड अळीमध्ये बीटी जनुकाविरुद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. चीनमध्ये सरळ बीटी वाणांची लागवड केली जाते. परंतु, आता बोंड अळ्यांच्या प्रतिकारशक्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून बीटी बियाण्याबरोबर (सरळ वाण) बीटी संकरित बियाण्याचे एफ-२ बियाणे (दुसरी पिढी) सुद्धा विशिष्ट प्रमाणात लावले जाते. एफ-२ बियाण्यांत २५ टक्के बियाणे नॉन बीटी असते. ते रेफ्यूजीची भूमिका निभावते. चीनमध्ये आर.एन.ए.- आय + बीटी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेण्याच्या संशोधनावर काम चालू आहे. आर.एन.ए. रेणूच्या माध्यमातून कापसाच्या जनुक संरचनेत अपेक्षित बदल घडवून आणण्याचे तंत्रज्ञानसुद्धा बोंड अळ्यांच्या नियंत्रणासाठी इतरत्र प्रगतीपथावर आहे. भारतातील जैवतंत्रज्ञान संशोधकांनी अशा प्रकारचे संशोधन करण्याचे मनावर घेतले तर बोंड अळ्यांच्या नियंत्रणाचा मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो.

आगामी हंगामात कापसाचे काय? नवीन संशोधन उपलब्ध होईपर्यंत कापूस लागवडीसंबंधी पुढील धोरण असावे असे वाटते. - आयसीएआर आणि कृषी विद्यापीठांमार्फत बीटी वाणांच्या कठोर चाचण्या घेण्याच्या पद्धतीचा अवलंब करावा. बीटी जनुकांबरोबरच अशा वाणांमध्ये रसशोषक कीटक आणि रोगांविरुद्ध सहनशीलता असणे आवश्‍यक आहे. सर्व चाचण्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी एका कंपनीच्या एक किंवा दोन संकरित/ सरळ वाणांची शिफारस व वितरण करावे. - कोरडवाहू व बागायती लागवडीसाठी वेगळ्या वाणांची शिफारस करावी. - रेफ्यूजी (नॉन-बीटी) बियाण्याची लागवड सक्तीची करावी.

- बीटी बियाण्यातच नॉन-बीटी बियाण्याचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण करावे. - बियाणे शुद्धता पडताळून पाहणे सक्तीचे करावे. - कापूस पीक पद्धतीत पिकांची फेरपालट करण्याकडे कटाक्ष असावा. = देशी कापसाची लागवड कमीत कमी २०-२५ टक्के क्षेत्रात केली जावी. त्यासाठी देशी कापसाचीसुद्धा हमीभावाने खरेदी करण्याचे धोरण ठरवावे लागेल.  -  कापूस उद्योग, संशोधन संस्था, बियाणे कंपन्या आणि शासन यांनी एकत्र येऊन कापूस वाण, त्यांच्या क्षेत्राचे प्रमाण, गुणवत्ता यासंबंधीचे धोरण नियमितपणे ठरविणे गरजेचे आहे. - एकात्मिक कीड नियंत्रण मोहीम सर्वत्र कटाक्षाने राबविली पाहिजे. त्यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. रासायनिक कीटकनाशकांचे गुणनियंत्रण अत्यावश्‍यक आहे. अमेरिकेत आणि ऑस्ट्रेलियात कापूस लागवडीमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर ९० टक्‍क्‍यांनी कमी झाला आहे.  डॉ. योगेंद्र  नेरकर : ७७०९५६८८१९ (लेखक महात्मा फुले कृषी  विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com