आले तर येईल उभ्या उभ्या...

फवारणी करताना बाळासाहेब काळे यांच्या बागेत ट्रॅक्टर रुतून बसला होता. तर, मजूर टंचाईने मंगला ताईंची अधिकच धांदल वाढली आहे.
फवारणी करताना बाळासाहेब काळे यांच्या बागेत ट्रॅक्टर रुतून बसला होता. तर, मजूर टंचाईने मंगला ताईंची अधिकच धांदल वाढली आहे.

दिवाळीबाई तुझं दिवाळं काढील चोळी अंजिरी फाडील, गाय खुट्याची सोडील... बहिणींना मूळ लावायला जायचंय, पण द्राक्षावर डाऊनीचं सावट...छाटणीनंतर...पावसाच्या तडाख्यानंतरही वेलीवर नुकतेच बाहेर आलेले इवलेसे घड पाहून मन हरखून गेलंय...आधी फवारणी करू...मग बहिणीकडं जाऊ, असं ठरवलेलं... पण दोन गल्ल्यांत कसा तरी ट्रॅक्‍टर फिरला...अन जो रुतून बसला तो काही केल्या निघेना...वडील, भाऊ, भावजयी सगळ्यांचा आटापिटा सुरू झाला...हे मागील तीन दिवसांपासून रोज सुरू आहे. रोज ट्रॅक्‍टर काढतोय...गाळात रुततोय...पुन्हा आटापिटा सुरूच राहतो...बाग अत्यंत संवेदनशील अवस्थेत...आता धावपळ नाही केली तर वर्षभराचं पीक हातातून जाईल ही भीती...कामाच्या वेळी लाईट गेलेली...ऐन दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशीच विंचुरी गवळी (ता. जि. नाशिक) येथील दत्तात्रय काळे यांच्या बागेतलं सकाळी साडेदहा, अकराच्या दरम्यानचं दृश्य. बहिणीच्या शेतशिवारातही तीच लढाई..."आले तर येईल उभ्या उभ्या...नाही तर दोन चार दिवसांनी येईल''...बहिणीचं उत्तर काळीज चिरून जाणारं... फवारणी करताना ट्रॅक्‍टर रुतलाय..मागच्या पुढच्या सगळ्याच चाकांना मातीचं भलंमोठं पेंडकावन चिकटून बसलंय..चालवणारा गडी गियरसारखे गियर बदलतोय..उलटा रेस करतोय..चाक जागीच फिरतंय..घुर्रर्रर्र...आवाजानं नुस्ता ट्रॅक्‍टरच नाही, वेलीचे बाबूं अन तारही हादरतेय..नुस्ता आटापिटा..तब्बल तासाभराच्या हातघाईच्या लढाईनंतर ट्रॅक्‍टर चिखलाच्या दलदलीतून बाहेर निघालाय..दूरवर जाताना चारी चाकांना जणू दुसरं मातीचं चाक उगवून आलेलं.

बहिणीच्या शेतातही तीच लढाई सबंध द्राक्षपट्ट्यातली दिवाळी अशीच गाळात रुतलेली.. सलग नऊ दिवस पाऊस रोज धुवांधार कोसळत राहिला..पीक वाचविण्याची लढाई शिवारात सुरू असताना दिवाळी कधी आली ते कळलंही नाही..पाऊस उघडल्यावर तर अधिकच कामांची धामधूम सुरू झालेली..लक्ष्मीपूजन, पाडवा तर यातच जाणार..भाऊबीजेला तरी उसंत मिळेल की नाही सांगता येत नव्हते..बहिणींना मूळ लावायला जाताच आलं नाही..दिवस मावळतीला त्यांना फोन करून सांगताना, बोलताना कंठ दाटून आलेला..बहिणीच्या शेतशिवारातही तीच लढाई.."आले तर येईल उभ्या उभ्या..नाही तर दोन चार दिवसांनी येईल''..बहिणीचं उत्तर काळीज चिरून जाणारं..

मेळ बसता बसेना.. "सकाळी उजाडल्यापासूनच पंडितराव काळे यांच्या घरातली माणसं बागेत काम करताहेत..एकाच वेळी फवारणी, छाटणीच्या काड्या गोळा करणं..पाण्याने आच्छादलेल्या द्राक्षाच्या फांद्या हाताने हलवून त्यातील पाणी काढून देणं ही कामं सुरू आहे. मध्येच लाईट जाते. तेव्हा सगळं काम खोळंबतं..मजूर नसल्यानं हाल सुरू आहेत..खूप खर्च वाढलाय..औषधं सगळी उधारीत घ्यावी लागत आहेत. रोज फवारणी करावी लागत आहे..पोरांना दिवाळीच्या सुट्या लागल्यात. त्यांचाही शेतीच्या कामांना उपयोग होतोय..बाकी दिवाळीचं घर कसं आवरायचं? फराळ कसा करायचा? हे प्रश्‍न तर घरातल्या बायांसमोर आ वासून उभे आहेत..असंख्य प्रश्‍नांनी धास्तावलेल्या घरातील बाया घरात अन बाहेर दोन्हीकडंही मेळ बसविण्याची कसरत करताहेत... मजूर दिवाळीत सुटीवर गेलेत.. खूप म्हणजे खूप पाऊस..पावसात बाग वाचल म्हणून वाटत नव्हतं..पण अजूनही चांगला बहर दिसू लागलाय..आज डिपिंग करायची होती. पण मान्संच नाहीयेत. दिवाळीला गावाला परत गेलेत..आम्ही दोघंच नवरा बायको गनपंपानं जीए फवारतोय..बागेच्या कडेला टाकीतील फवारणीचं द्रावण ढवळताना मंगला निमसे सांगत होत्या. दिवाळी सुरू झालीय..पण शेतकऱ्याची अडचण वाढलीय..मजूर सुट्टीवर निघून गेलेत...जीएची फवारणी खरंतर आधुनिक स्प्रेयरने केली जाते. ते पुरवणारी यंत्रणाही आहे. पण त्याचं भाडंही परवडणारं नाहीय..एक एकर द्राक्षबाग जगविण्यासाठी दोघं पती पत्नी धडपडताहेत..द्राक्षपिकासोबत पंधरा वीस गुंठे क्षेत्रावर शेपू, कांदापात, मेथी असा भाजीपाला केला जातो. हा भाजीपाला शहरा लगतच्या भाजीबाजारात विक्री केला जातो. यंदाही त्यांनी मागील महिन्यात बेणं टाकलं होतं. शेतात गच्च पाणी साचलंय. पण सततच्या पावसाने बीज उतरण्याआधीच सडून गेलंय. मागच्या दिवाळीला भाजीपाल्यानं द्राक्षाच्या मजुरीचा खर्च भागवला होता. हे सांगताना मंगलाताईंच्या बोलण्यातली खंत लपत नाही..  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com