सोलापुरातील शेतकऱ्यांची दिवाळी बांधावरच

खरिपात चार एकरांवर उडीद केला, पण शेरभरही झाला नाही. पीक काढणीवेळी पाऊस आला अन् पुरता उडीद खाऊन गेला. दिवाळी कशाची करता अन् काय? तोंडातनंच घास पळवून नेला की ओ, कशाचं काय? दिवाळी वर्षाचा सण म्हणून साजरा केला, आता सगळं रब्बीवर हाय बगा. आता बघू तो आणखी काय-काय परीक्षा घेतोय ते? - चंद्रकांत मसलकर, शेतकरी, सावळेश्‍वर, ता. मोहोळ
चंद्रकांत मसलकर
चंद्रकांत मसलकर

सोलापूर ः जिल्ह्यात यंदा खरिपातील सगळी पिके पाण्याअभावी जळून गेली. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. त्यात परतीच्या पावसाने ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाव साधला, त्यानेही उरले-सुरले नेले. त्यामुळे यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी तशी शिवारात नुसतेच बघण्यात गेली. आता फक्त उरल्या आशा रब्बीवरच आहेत. पण वर्षाचा दिवाळसण कसा-बसा सावरून शेतकरी नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागला आहे.  दिवाळीचा एवढा मोठा सण गेला, पण कुठे मिणमिणत्या पणत्यांचा प्रकाश, ना कुठे खाऊ-मिठाईचा सुवास, शेतकऱ्यांच्या घरादारात आणि अंगणात उदासीचे चित्र राहिले. त्यात यंदा कर्जमाफीची आशा लावलेल्या सरकारकडून दिवाळी संपली, तरी खात्यावर काही जमा झाले नाही, त्यामुळेही एक वेगळीच नाराजी शेतकऱ्यांमध्ये दिसून आली. सोलापूर जिल्हा हा खरिपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पण या हंगामातही उडीद, मूग, भुईमूग, सूर्यफूल अशी पिके घेतली जातात. यंदा सुरवातीला जूनमध्ये जोरदार पाऊस झाला, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला, पण त्यानंतर पावसाने प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची अडचण वाढली. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी भरले, पण तेही पुण्याच्या पाण्यावर, त्यामुळे यंदा जिल्ह्यात हवा तसा पाऊस झाला नाही.  परतीच्या पावसाने दिलासा दिला, पण खरिपातील पिके तो मुळासकट घेऊन गेला. उडीद, सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी झाली होती. मात्र पेरणीनंतर पावसात मोठा खंड पडला. त्यामुळे ऐन वाढीच्या, दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके जळून गेली. ज्या ठिकाणी पिकांनी तग धरले तिथे उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची सारी भिस्त रब्बीच्या उत्पन्नावर आली आहे. दिवाळीसणावर या सगळ्याचे सावट होते. तरीही वर्षाचा सण म्हणून शेतकऱ्यांनी तो साजरा केला. सोलापूरची ओळख असलेली ज्वारीची पेरणी त्यामुळे आता उशिरा होत    आहे.  ऊसक्षेत्र वाढण्याची शक्‍यता परतीच्या पावसामुळे रब्बीच्या ज्वारीसाठी यंदा काहीसा उशीर झाला आहे. पण बहुतांश भागात वाफसा मिळाला असून, आता पेरण्या या आठवड्यात उरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संपूर्ण क्षेत्रावर नाही, पण काही भागांत ज्वारीची पेरणी चांगली होण्याची शक्‍यता आहे. त्याशिवाय उजनी धरणातील शंभर टक्के पाणीसाठ्यामुळे, यंदा भीमा-सीना खोऱ्यांत उसाची लागवड वाढण्याची शक्‍यता आहे. यंदा एक लाखाहून अधिक एकरवर ऊसक्षेत्र वाढण्याची शक्‍यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com