जलकुंडाने भागेल मराठवाड्याची तहान

मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी ग्रीडद्वारे पाणीपुरवठ्याचे नियोजन शासन करीत आहे. त्यासाठी इस्राईलच्या कंपनीशी करारही करण्यात आला आहे. हे सर्व खटाटोप करण्याएेवजी जलकुंड योजनेद्वारे प्रत्येक गावात पाण्याची चंगळ राहील.
संपादकीय
संपादकीय

पाऊस पडो अथवा न पडो, पिण्याचे पाणी संपणार नाही अशी व्यवस्था विकसित देशांमध्ये केलेली असते. बारमाही वाहणाऱ्या नद्या असतील तर पाण्याचा कायम स्रोत उपलब्ध असतो. इस्राईलच्या उत्तर टोकाला मोठे नैसर्गिक तळे आहे. त्याला ‘सी ऑफ गॅलिली’ म्हणतात. त्या तळ्यातून पूर्ण देशाला पाणीपुरवठा होतो. भौगोलिकदृष्ट्या इस्राईल उत्तर-दक्षिण पसरलेली लांब चिंचोळी पट्टी आहे. उत्तरेत ४५०-५०० मिमी पाऊस पडतो आणि खालचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग निव्वळ वाळवंट आहे. नाही म्हणायला जॉर्डन नदी उत्तर-दक्षिण वाहते; पण ही इतिहास प्रसिद्ध नदी म्हणजे एक छोटा ओहोळ आहे. पाण्याचा एकमेव स्रोत उत्तरेत आणि खाली सर्व वाळवंट. उत्तरेतले पाणी दक्षिण टोकापर्यंत न्यायला त्यांना वॉटर ग्रीड करावी लागली, ते साहजिकच होते. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत पाणी वाहून नेणे हा एकच पर्याय त्यांच्या पुढे होता. ती ग्रीड कायम उत्तम चालेल अशी मजबूत, दीर्घायुषी तयार केली हे त्यांचे तांत्रिक कसब! मराठवाड्यात वर्षानुवर्षे पुरतील असे पाण्याचे नैसर्गिक साठे नाहीत. बारमाही वाहणारी एकही नदी नाही. भूगर्भात कठीण खडक असल्यामुळे तिथेही पाण्याला जागा नाही. मग बेभरवशाचे साठे एकमेकांना जोडून ग्रीड केल्याने पाणी प्रश्‍न सुटणार आहे का? नांदेड शहराला पैनगंगा, कयाधू, पूर्णा, दुधना, गोदावरी आणि तिच्या शेकडो उपनद्यांचे पाणी मिळते. ही प्रचंड मोठी नैसर्गिक ग्रीड आहे. पण नांदेड येईपर्यंत या सर्व नद्यांचे पाणी खूप कमी होते किंवा संपते. नांदेडकडे वाहणाऱ्या एवढ्या नद्या पाहून विष्णूपुरी प्रकल्प उभा राहिला, तो कायम कोरडा राहण्यासाठी. नियोजनकारांनी नद्यांची संख्या मोजली; त्यातले पाणी बघितले नाही. मराठवाड्यातल्या सर्व मोठ्या नद्यांवर धरणे आहेत. धरणांतले पाणी शहरांना पुरवले जाते. शहरे वाढतील तशा पाणीपुरवठ्याच्या विस्तारित योजना तयार होतात. शहरांना धरणांतून पाणीपुरवठा करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. शहराजवळच्या नद्या अडवून जलाशय निर्माण करण्याऐवजी दूरच्या धरणांतले पाणी आणणे फायद्याचे वाटते. ग्रीड करण्यासाठी धरणे जोडावी लागतील; पण सर्वच धरणे तुटीच्या खोऱ्यात असल्यामुळे त्यांना जोडायचा खटाटोप नुसती उठाठेव ठरेल. यावरूनच एक गोष्ट स्पष्ट आहे की मराठवाड्यात वॉटर ग्रीड व्यवहार्य नाही. मराठवाड्यात पाऊसमान चांगले आहे. नद्या, ओढे हजारोंच्या संख्येत आहेत. बहुतेक गावे नद्यांच्या काठावर किंवा थोड्या अंतरावर वसलेली आहेत. १५-२० मीटर खोलीचा भूस्तर झिजलेल्या खडकांचा व सच्छिद्र असल्यामुळे पावसाचे पाणी प्रचंड प्रमाणावर साठवण्याची त्याची क्षमता आहे. हा भूस्तर दरवर्षी पावसाळ्यात कमी अधिक प्रमाणात भरतो. भूसंधारणाची कामे झाल्यास हे नैसर्गिक पुनर्भरण कैक पटींनी वाढते, असा आपला अनुभव आहे. या भूस्तरात विहिरी पाडून ग्रामीण भागात पिण्याचे व सिंचनाचे पाणी मिळवले जाते. भूस्तर सर्व बाजूंनी भेगाळलेला असल्यामुळे भरलेले पाणी उताराच्या दिशेने वाहून जाते. विहिरींच्या उपशामुळे तसेच अंतर्गत प्रवाहामुळे पावसाळ्यानंतर भूजलपातळी खाली खाली जाते. काही ठिकाणी ती विहिरीच्या तळाच्या खाली गेल्यामुळे विहिरी कोरड्या पडतात व त्या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. पावसाळ्यात सर्वत्र उपलब्ध असलेले पाणी साठवून ठेवले तर शहरांना किंवा खेड्यांना पाण्याची कधीच कमतरता भासणार नाही. ग्रामीण भागात शाश्‍वत पाणीपुरवठ्यासाठी जलकुंडांची योजना आम्ही केळकर समितीला सादर केली होती. समितीने सांगोपांग विचार करून गावोगाव जलकुंड निर्माण करण्याची शिफारस केली आहे. कुटुंबाला दिवसभर लागणारे पाणी आपण माठात भरून ठेवतो; मग गावाला लागणारे पाणी जलकुंडात भरून ठेवायला काय हरकत आहे? अगदी साधी आणि जुजबी कल्पना असली तरी आपला महत्त्वाचा असा तहानेचा प्रश्‍न मिटवणारी आहे.  जलकुंडाची कल्पना साधी असली तरी ती उभारण्यात तांत्रिक बारकावे पुष्कळ आहेत. कुंडाची लांबी, रुंदी, खोली नुसत्या क्षमतेवरून न ठरवता आर्थिक निकषसुद्धा लक्षात घ्यावेत. पाझर थांबवण्यासाठी अस्तरीकरणाचा प्रकार ठरवणे; बाष्पीभवन थांबवण्यासाठी छताचा प्रकार ठरवणे, हेसुद्धा संकल्पचित्राचे महत्त्वाचे घटक आहेत. अस्तर आणि छताचे विविध प्रकार असून, प्रकल्पाचे आयुष्यमान, वापरातील सुविधा, बांधकामातील सोपेपण आणि आर्थिक मर्यादेनुसार विशिष्ट प्रकारची निवड करावी लागेल. जलकुंड हे बंद भांड्यासारखे असून, त्यातून पाणी पाझरणार नाही, बाष्पीभवन होणार नाही किंवा धूळ, कचरा, उडत्या पक्ष्यांच्या विष्टेमुळे थोडेही प्रदूषण होणार नाही. भूगर्भातल्या खडकात पाणी कितीही दिवस सुरक्षित राहते, त्याप्रमाणे ते जलकुंडात राहील.  नदी शेजारी मोठ्या साठवण क्षमतेची विहीर बांधून पावसाळ्यात विहिरीचे पाणी उपसून कुंडात भरल्यास कुंडात आयतेच स्वच्छ पाणी भरले जाऊन प्यायच्या पाण्याच्या शुद्धीकरणाचा खर्च कमी होईल. विहिरीचा येवा कमी असल्यास नदी आडवून वाढवता येईल. पावसाळ्यात नदीत पुरेसे पाणी येत नसेल, तर पाणलोटात जल व मृदसंधारण करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे मृद संधारण कामांचा खर्च पाणीपुरवठा योजनांवर टाकायची गरज नाही. विहिरीचा स्रोत संपल्यावर साधारण एप्रिलपासून पुढे जलकुंडातले पाणी वापरावे लागेल. गावाला दीड वर्ष पुरेल एवढा साठा जलकुंडात केल्यास शंभर वर्षांत एक दिवससुद्धा पाण्याचा तुडवडा भासणार नाही. पाण्याचा उपसा व शुद्धीकरणासाठी सौरशक्तीचा वापर केल्यास खर्चात मोठी बचत होईल. अशी सर्व व्यवस्था एकदा उभी केल्यास मराठवाड्यातल्या प्रत्येक गावात जन्मोजन्म पाण्याची चंगळ राहील. शहरांसाठीसुद्धा जलकुंडाचीच संकल्पना राबवता येईल. नदीच्या काठालगत लांब आणि खोल कुंड खोदून कुंडावर सोलर पॅनल बसवल्यास पाण्यावर सावली राहील. खोदकाम कठीण खडकात असल्यामुळे अस्तरीकरणाची गरज पडणार नाही. पुराचे गढूळ पाणी एक दिवस संथ टाक्‍यांत साठवून नंतर कुंडात भरल्यास कुंडात फारसा गाळ येणार नाही. मानशी प्रतिदिन पाण्याची गरज १५० लिटर, १५ महिन्यांत लागणारे पाणी, २० टक्के बाष्पीभवन, २० टक्के पाझर, २० टक्के सिस्टम व्यय व १०० लिटर कारखाने व इतर वापरासाठी असे प्रतिदिन दरडोई ३४० लिटर समजा ३५० लिटर पाणी लागते. त्यावरून लागणारे पाणी व कुंडाचा आकार खालील तक्त्यात दिला आहे.

अ.क्र.   ५० वर्षांनंतरची लोकसंख्या   ४६० दिवसांत लागणारे पाणी घ. मी. ५० मी. खोल व १०० मी. रुंदीच्या कुंडाची लांबी मी.
१,००,०००   १,६१,००,००० ३२२०  
२,००,०००   ३,२२,००,००० ६४४०  
५,००,०००   ८,०५,००,०००   १६,१००  
२०,००,०००    ३२,२०,००,०००   ६४,४००  

शहरांनी त्यांचा हिस्सा काढून घेतल्यावर राहिलेले पाणी सिंचनासाठी बिनधोक वापरता येईल. अशा प्रकारे कुंड खोदण्यासाठी ग्रीडपेक्षा खूप कमी खर्च येईल. बापू अडकिने : ९८२३२०६५२६ (लेखक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com