जोरदार पावसामुळे उसाच्या लागवडीला वेग

जोरदार पावसामुळे उसाच्या लागवडीला वेग
जोरदार पावसामुळे उसाच्या लागवडीला वेग

पुणे ः जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांनी उसाच्या उशिराने लागवडी सुरू केल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून चांगल्या झालेल्या पावसामुळे अाडसाली उसाच्या लागवडीला वेग आला आहे. आत्तापर्यंत विभागात आडसाली उसाच्या ६२ हजार १४ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात अधिक चांगला पाऊस झाल्यास या ऊस लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ होईल.  

पुणे विभागात मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी अशा काही धरणांमुळे पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. यंदा ही धरणे भरत आली आहे. मात्र, इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी उसाच्या लागवडी करतात. जूनमध्ये दहा ते वीस, जुलै महिन्यात पावसाचा चांगलाच खंड पडला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाएेवजी सोयाबीन, तूर, मूग आदी कमी पाण्याच्या पिकांवर भर दिला आहे. त्यामुळे ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र आहे. चांगला पाऊस झाल्यास ऊस लागवडी याच काळात एक लाखाहून अधिक क्षेत्रावर होतात. सुरवातीच्या काळात कमी झालेल्या पावसामुळे उसाच्या क्षेत्रात घट झाल्याची स्थिती आहे.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्व हंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यात आडसाली उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी तीन लाख ७३ हजार १२९ हेक्टर क्षेत्र आहे.

विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पाथर्डी, राहाता या तालुक्यांत बऱ्यापैकी लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर, हवेली, जुन्नर, पुरंदर या तालुक्यांत लागवडी झाल्या आहेत. मुळशी, भोर, मावळ, वेल्हे, खेड, आंबेगाव या तालुक्यात अजूनही उसाच्या लागवडी झालेल्या नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, माळशिरस, पंढरपूर, करमाळा, दक्षिण सोलापूर या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत. तर उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा, सांगोला ही तालुके ऊस लागवडीपासून दूर असल्याचे चित्र आहे.

जिल्हानिहाय आडसाली उसाच्या झालेल्या लागवडी (क्षेत्र, हेक्टरमध्ये)
जिल्हा  सरासरी क्षेत्र अाडसाली ऊस लागवड टक्के
नगर १,०४,३३७ ३३,०६२ ३२
पुणे  १,२४,७५१ २१,७०४ १७
सोलापूर १,४४,०४१ ७२४८
एकूण  ३,७३,१२९ ६२,०१४ १७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com