agriculture news in marathi, On the spot milk report from kolhapur district | Agrowon

लेकरं म्हणत्यात माई जनावरं विकं...
राजकुमार चौगुले
मंगळवार, 8 मे 2018

कोल्हापूर : म्हशी पाळणं परवडत नाही. दिसभर वैरणीसाठी राब राब राबायचं अाणि सांजच्याला एक दोन लिटर दूध पिळायचं, त्यातलं निम्मं डेअरीला वतायचं आणि निम्मं पोळाबाळास्नी द्यायचं. एवढं करूनही अनेक महिनं दुधाचं पैसंच फिटना झाल्यात. दहा इस वरसापूर्वी चार पैक गाठीला राहात हूत पण आता कशाचाच मेळ कशाला नाय.. लेकरं म्हणत्यात माई जनावरं विकं, दुधाचा धंदा परवडत न्हाय. त्यांच पटंत पण सोन्यासारखी जनावरं इकायला जीव धजत न्हाय. उगीच चालतयं तो पर्यंत चालवायचं. शिरोळ तालुक्‍यातील उमळवाड येथील रंजनाकाकूंची ही बोलकी प्रतिक्रिया.

कोल्हापूर : म्हशी पाळणं परवडत नाही. दिसभर वैरणीसाठी राब राब राबायचं अाणि सांजच्याला एक दोन लिटर दूध पिळायचं, त्यातलं निम्मं डेअरीला वतायचं आणि निम्मं पोळाबाळास्नी द्यायचं. एवढं करूनही अनेक महिनं दुधाचं पैसंच फिटना झाल्यात. दहा इस वरसापूर्वी चार पैक गाठीला राहात हूत पण आता कशाचाच मेळ कशाला नाय.. लेकरं म्हणत्यात माई जनावरं विकं, दुधाचा धंदा परवडत न्हाय. त्यांच पटंत पण सोन्यासारखी जनावरं इकायला जीव धजत न्हाय. उगीच चालतयं तो पर्यंत चालवायचं. शिरोळ तालुक्‍यातील उमळवाड येथील रंजनाकाकूंची ही बोलकी प्रतिक्रिया. दूध व्यवसाय परवडतो की नाही या प्रश्‍नावर काकूंनी दिलेली ही प्रातिनिधीक प्रतिक्रिया कोल्हापुरातील दूध उत्पादकांची स्थिती स्पष्ट करते. काकू फोटो काढतो असं म्हणत असताना कशाला बाबा, फुटू? आमचं आमासनी फुरं झालं असं म्हणत ताडताड निघून जाणाऱ्या काकूंकडं पाहिलं की जोडधंदा म्हणून असणाऱ्या या व्यवसायात समाधान किती उरले आहे याची प्रचितीच येते होती.. आज लिटरला इकडं २५ रुपये मिळत असले तरी, ते कितपत परवडणारे आहेत, याचा अभ्यास करावा लागणार आहे...

दररोज सुमारे वीस लाख लिटर दुधाचे संकलन 
कोल्हापूर जिल्हा हा दुधाच्याबाबतीत अग्रेसर गणला जातो. बहुतांशी ठिकाणी बारमाही असणाऱ्या हिरव्या चाऱ्यामुळे हा व्यवसाय करणे शेतकऱ्यांना फायदेशीर असले तरी सध्याची परिस्थिती मात्र त्याला तोट्यात आणत आहे. जिल्ह्यात गोकूळ, वारणा, स्वाभिमानी, शाहू या दूधसंघासह इतर लहान दूध संघाच्या माध्यमातून दररोज सुमारे २० लाख लिटर दुधाचे उत्पादन होते. ११ लाख लिटर दूध कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) संकलित करतो. जिल्ह्यात दूध संकलनाच्या माध्यमातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी दूध धंद्याच्या तोट्याच्या चक्रव्यूहातून उत्पादक बाहेर पडायला तयारच नाही. 

थकबाकीच्या गर्तेत दूध उत्पादक 
साधारणपणे वर्षाला उसाचा पैसा आणि दहा दिवसाला दुधाची रक्कम असे सूत्र जिल्ह्यात शेतकऱ्यांचे आहे. शेतीबरोबर एक दोन जनावरे जगवायची आणि किरकोळ नफा मिळवून घरखर्च चालवायचा हेच सूत्र पशुपालकांचे आहे. बहुतांशी सहकारी संघ मातब्बर आहेत. राजकारणासाठी या संघांचा नेत्यांना चांगला उपयोग होतो. गावागावातील दूध संस्था संघांशी जोडणे व त्यावर राजकारण खेळणे हे अनेक वर्षांपासून सुरू आहे. जिल्ह्यात विविध गावांत विविध दूध संघांच्या सुमारे सात हजारांच्या आसपास दूध संस्था आहेत. एकेका गावात तर पाच ते दहापर्यंत दूध संस्था आहेत. परंतु, या दूध संस्थांमध्ये उत्पादकाला मात्र फारसे समाधान नसल्याचेच चित्र आहे. एकमेकांच्या स्पर्धेतून उभ्या राहिलेल्या संस्था, त्याला राजकारणाच्या किनार हे चित्र गडद असतानाच दुधाला दर नसणे ही एक मोठी समस्या झपाट्याने सामोरी येत आहे. एखाद्या गावातील दूध संस्थेत एक तास जरी घालविला तरी केवळ उत्पादकांच्या थकबाकीच्या चर्चा मनाला अस्वस्थ करतात. दहा दिवसांत पेंड, पशुखाद्याचा खर्च वजा केवळ मीठपाण्यापुरती रक्कम हाताशी धरून बाहेर पडणारी एखादी महिला उत्पादक पाहिले की दूध धंदा खरंच आधार ठरलेला आहे का हा प्रश्‍नच निर्माण होतो. 

जिल्ह्यात कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ हा मातब्बर दूध संघ आहे. हा दूध संघच जवळजवळ ६० टक्के दुधाचे संकलन करतो. दूध दराच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असणाऱ्या या संघाने चार महिन्यांपूर्वी एक पाऊल मागे घेताना गायीच्या दुधात दोन रुपये कमी केले आणि उत्पादकांना दर कपातीचा दणका बसला. त्यांचीच रि ओढत इतरांनीही दुधाच्या दरात कपात केली. यानंतर सुरू झाला तो उत्पादकांच्या अस्वस्थतेचा प्रवास. लिटरला एक दोन रुपये जसे कट्टाकट्टी राहायचे. ती रक्कमच वजा होऊ लागल्याने या व्यवसायात उत्पादकांची कुचंबना होऊ लागली आहे. 

माझ्याकडे दुधाच्या सोळा गायी आहेत. रोज दोन रुपये कमी झाल्याने माझा स्वत:चाच तोटा दिवसाला सहाशे रुपयांपर्यंत होत आहे. दुग्ध विक्रीतून नफा मिळविणे अशक्‍य झाल्याने मी यापासून खवा, पनीर तयार करून विक्रीचा प्रयत्न करणार आहे. अन्यथा हा धंदाच बंद करावा लागेल अशी परिस्थिती आहे. आता जनावरांसाठी टॅगिंग सुविधा शासनाने सुरू केली आहे. शासनाने अनुदान संघांना न देता या टॅगिंगच्या माध्यमातून उत्पादकांच्या खात्यावर जमा करावे. कोणत्याही परिस्थिती संघांपेक्षा उत्पादकांनाच थेट फायदा होण्यासाठी मदत करणे गरजेची आहे.
- भरत वरेकर, 
उदगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर 

माझी तीन जनावरे आहेत. दुधासाठी इतकी परिस्थिती कधीच आली नव्हती. प्रत्येक वर्षी वाढणारे पशुखाद्याचे दर, वाढता उत्पादन खर्च याचा मेळच लागत नसल्याची स्थिती आहे. फक्त घरी दूध खायला मिळते, हाच काय तो नफा. पण फक्त घरी दूध खायला मिळते म्हणून हा तोट्यातील व्यवसाय किती दिवस करणार. वरूनच कितीजरी प्रयत्न केले तरी जोपर्यंत उत्पादन खर्च कमी करण्यासाठी कोणी प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत आमच्यासारखे अल्पभूधारक दुग्ध उत्पादक भरडलेच जाणार आहेत. 
- बळिराम नावले, 
वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर 

दूध उत्पादनातून मिळणारी सगळी रक्कम पशुखाद्यालाच जाते. माझ्याकडे सात गायी व पाच म्हैशी दुधाच्या आहेत. दूध न देणारीपण जनावरे आहेत. त्यांनाही पालनपोषण करायला पशुखाद्य व चारा द्यावा लागतो. एखादी गाय अथवा म्हैस दुधाची नसेल तर ती व्यायला येऊ पर्यंतचा खर्चही मोठा असतो. यामुळे व्यवसाय परवडत नसल्याचा माझा अनुभव आहे. आम्ही कर्ज काढून हा व्यवसाय सुरू केला आहे. पण व्यवसाय सुरू करून अनेक वर्षे झाली असली तरी फक्त व्याजच कमी झाले आहे. अद्यापही मुद्दल कमी होण्यास तयार नाही. येणारे पैसे व्याजापोटीच जात असल्याने प्रचंड अस्वस्थता आहे. 
- युवराज ठोमके, 
चिंचवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर 

आमचे दररोजचे चाळीस लिटर दूध असते. पण, दूध संघांनी लिटरला दोन रुपयांची कपात केल्याने दररोज ऐंशी रुपयांचा तोटा होत आहे. नियोजन केल्यास दूध धंदा फायदेशीर होत असला तरी गेल्या काही वर्षांत हा दुधाचा व्यवसाय वाढविणे अशक्‍य झाले आहे. यामुळे आम्ही नवीन गायी घेणेच बंद केले आहे. दुधाचे दर वाढले की पशुखाद्यचे दरही वाढतात. पण, दुधाचे दर कमी झाले की पशुखाद्याची किंमत कमी होत नाही. यामुळे या व्यवसायातील समाधानच निघून गेले आहे. दूध व्यवसाय वाढविण्यापेक्षा आहे हाच व्यवसाय कसा टिकवावा याचीच चिंता आम्हाला लागलेली असते.
- शकुंतला पाटील,
निमशिरगाव, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर  

 

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...
प्रतिकूलतेतून प्रगती घडवत आले पिकात...वांगी (जि. सांगली) येथील एडके कुटुंबाने अत्यंत...
दूध का दूध... देशातील दूध न दुग्धजन्य पदार्थांमध्ये ६८ टक्के...
पीककर्ज वितरणातील दोष व्हावे दूर पूर्वी जेमतेम तग धरून चालणाऱ्या शेती व्यवसायाने...
पाऊस बरा, मात्र दीर्घ खंड अन् कीडरोगाने...जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस पडला खरा; मात्र...
अन्न प्रक्रिया प्रकल्पांसाठी...औरंगाबाद : शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या...
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात थंडी वाढलीपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून थंडीने...
साखर कारखान्यांनी सह-उत्पादनांवर सक्षम...मुंबई  ः देशांतर्गत साखर उद्योग संकटात आहे....
राज्यात ९१ कारखान्यांची धुराडी पेटली;...पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत ९१...