...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागते

...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागते
...आता बॅंकेसमोरच जीव द्या लागते

यवतमाळ : कर्जाच्या फायलीसाठीच दहा हजार खर्च झाला. लाखाच कर्ज भेटणार हाये. पण, आठ दिवसांपासून नुसत्या फेऱ्याच करायले लावल्या बॅंकेवाल्यानं; पेरणीचे दिस आले; पण हाती पयसा नाई. असंच रायल त बॅंकेसमोरच जीव द्या लागते, अशी उद्विग्नता माळवागद (ता. महागाव, जि. यवतमाळ) येथील सरूबाई गजभार व्यक्‍त करत होत्या. पतीच्या निधनानंतर सरूबाई घरची पाच एकर शेती कसतात. त्यातील उत्पन्नावरच कुटुंबाच्या गरजा भागविण्यासोबतच दोन मुलांच्या शिक्षणाचा भारही त्यांना उचलावा लागतो. यावर्षी खरीप हंगाम सुरू झाल्याने त्यांनी महागाव येथील युनियन बॅंक ऑफ इंडियाकडे एक लाख रुपयांच्या कर्जाचा प्रस्ताव दिला. परंतु, बॅंक व्यवस्थापन आठ दिवसांपासून आज, उद्या पैसे खात्यात जमा करतो, असे सांगून बोळवण करीत असल्याचा त्यांचा आरोप होता. येत्या दोन दिवसांत पैसे जमा झाले नाई त शेती पडीक ठेवण्याची वेळ येईल म्हणून इथीच मरतो, अशी उदविग्नता त्यांनी व्यक्‍त केली. कर्ज प्रकरणाच्या फाईलसाठी दहा हजार रुपयांचा खर्च झाला. एका दिवसाच्या प्रवासावर १०० रुपये खर्च होतो. पैसे जमा करतील या आशेने त्यांच्यासह अनेक खातेदार रात्री बारापर्यंत बॅंकेसमोरच ठाण मांडून असतात, अशी परिस्थिती आहे. धनसिंग जाधव यांना सेट्रंल बॅंकेकडून कर्ज मिळणार आहे. त्यासाठी युनियन बॅंकेकडून त्यांना निलचा दाखला पाहिजे. गेल्या चार दिवसांपासून त्यासाठी त्यांना खेटे घालावे लागले; तरीही दाखला मिळाला नव्हता. प्रशांत जवादे (रा. पोरकी) हे ११ दिवसांपासून पीककर्जासाठी उंबरठे झिजवीत होते. उर्मीला जाधव (रा. बाबासाहेब आंबेडकर नगर, पो. पेढी) यांनी कर्ज प्रकरणाची फाईल तयार करण्यावरच १२ हजार रुपये खर्ची घातले. त्यांना एक लाख रुपयांचे कर्ज मिळणार होते. परंतु बॅंक व्यवस्थापन त्यालाही टाळाटाळ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. बळिराम रोडे यांनीदेखील तशीच आपबिती कथन केली. बापाच्या आजारपणाची आणली फाइल संतोष राठोड यांनी तर त्यांचे वडील नामदेव राठोड यांच्यावरील उपचाराचेच कागदपत्र सोबत आणले होते. कुटुंबाच्या परिस्थितीमुळे पीककर्ज घेऊन त्यातील काही पैसे आजारी वडिलांच्या उपचारावर खर्च करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. बॅंक व्यवस्थापकाला दया येत दवाखान्याचे कागदपत्र पाहून तो लवकर कर्ज देईल, अशी अपेक्षा संतोष राठोड यांना होती. परंतु, बॅंक व्यवस्थापनाकडून कर्ज मंजुरीचा प्रस्ताव रखडतच ठेवण्यात आल्याचे संतोष यांनी खिन्नपणे सांगितले. संतोषची आई विमलबाई राठोड यांच्या नावावर कुटुंबाची शेती आहे. काही एजंट परिसरात असून त्यांच्या माध्यमातून गेल्यास कर्ज प्रकरण लवकर मंजूर होते, असा आरोप संतोष यांनी बोलताना केला. या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनमध्ये सगळ्यांचाच वाटा असल्याचे संतोष यांनी सांगितले. तीन वेळा हरविला सातबारा चिवरण (ता. महागाव) येथील प्रल्हाद भिकारी राठोड यांनी देखील कर्जप्रस्ताव बॅंकेकडे दिला. या प्रस्तावासोबत असलेला सातबारा एक-दोनदा नव्हे तर तीनदा गहाळ करण्यात आला. अशाप्रकारचा त्रास शेतकऱ्यांना दिला जात असल्याचा त्यांना आरोप होता. शाखेचे झाले स्थलांतरण काळी दौलत खान येथील युनियन बॅंकेची शाखा तालुक्‍याचे ठिकाण असलेल्या महागावात आली. त्यामुळे पूर्वी या शाखेशी संलग्न असलेल्या नजीकच्या गावांपासूनचे अंतर वाढले आणि प्रवासासाठी लागणाऱ्या खर्चातही वाढ झाली. बॅंकेच्या परिसरात पीककर्ज मिळेल या आशेने शेतकरी दिवसभर आणि कधीकधी तर रात्री बारापर्यंत थांबून असतात, अशी परिस्थिती अनुभवण्यात आली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com