एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ

 एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ
एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांसाठी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी शुक्रवारी (ता. १) भरघोस वेतनवाढ जाहीर केली. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुमारे ३२ ते ४८ टक्के इतकी वाढ होणार आहे. राज्यातील १ लाख ५ हजार ६७९ एसटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या समानीकरणासह एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सावित्रीबाई जोतिबा फुले शिष्यवृत्ती योजना तसेच कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण अग्रीम योजनाही यावेळी जाहीर करण्यात आली. ​ सह्याद्री राज्य अतिथीगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेस खासदार अरविंद सावंत, आमदार भाई जगताप, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल उपस्थित होते. मंत्री रावते म्हणाले, की वेतन करार करण्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त संघटनेशी मागील कित्येक दिवसांपासून वाटाघाटी करीत आहोत. पण महामंडळाने सूचविलेल्या चांगल्या प्रस्तावांनाही संघटनांनी नकार दिला. मागील सरकारच्या काळात १५ वर्षात वेतन करार करताना एसटी कर्मचाऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. त्या अन्यायाचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री रावते म्हणाले, की एसटी महामंडळामध्ये कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर होता. समान काम करूनही त्यांना असमान वेतन मिळत होते. कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरील अन्याय दूर करून त्यांचा कनिष्ठ वेतनश्रेणीचा कालावधी ३ वर्षावरून १ वर्षावर आणला, आणि आता तोही रद्द करण्यात आला आहे. या वेतनवाढीत कनिष्ठ वेतनश्रेणीवर अनुक्रमे ३ व ५ वर्षे काम केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी भरघोस वेतनवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार या कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता किमान २ हजार ५८१ रुपये ते कमाल ९ हजार १०५ रुपये इतकी वाढ होणार आहे. नियमित वेतनश्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात आता ३ हजार ६९२ रुपये ते १२ हजार ०७१ रुपये इतकी वाढ होईल, अशी माहिती त्यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध भत्त्यांमध्येही भरघोस वाढ जाहीर केली. त्याचा आर्थिक भार प्रतिवर्षी २५० कोटी रुपये इतका आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता (४२ दिवसांसाठी) आता १८० रुपयांवरून १ हजार २०० रुपये इतका वाढविण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com