नुकसानीचे पंचनामे तातडीने करा : कृषिमंत्री फुंडकर

नुकसानीचे पंचनामे तातडीने करा : कृषिमंत्री फुंडकर
नुकसानीचे पंचनामे तातडीने करा : कृषिमंत्री फुंडकर

अकोला : राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग, तसेच धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे शेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने करावेत. जिल्हा प्रशासनाने विमा कंपन्यांची बैठक घेऊन गावनिहाय आकडेवारी त्यांना उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिले.  राज्यातील ज्या भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली त्याचा आढावा कृषिमंत्र्यांनी घेतला. त्यांनी कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार यांच्याशी दूरध्वनीवरून राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानाबाबत चर्चा केली. ज्या गावांमध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामाच्या उभ्या पिकाचे तसेच काढणीपश्चात मळणीसाठी ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले आहे, त्याबाबत माहिती त्वरित विमा कंपन्यांना कळवावी. यासाठी जिल्हाधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता.१२) संबंधीत विमा कंपन्यांची बैठक घ्यावी व त्यांना झालेल्या नुकसानाबाबत गावनिहाय शेतकऱ्यांची माहिती द्यावी. त्याचबरोबर पुढील दोन ते तीन दिवसातील माहितीही इमेल द्वारे देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून संबंधित विमा कंपनीला बाधित शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध करून देता येईल. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे तलाठी, ग्रामसेवक, सहायक कृषी अधिकारी यांनी देखील पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर करून मदतीबाबत प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागाकडे सादर करावा, अशा सुचना कृषिमंत्र्यांनी प्रशासनाला केल्या आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांत व धुळे येथे गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com