राज्याच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला घरघर

पाडेगावच्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रात मनुष्यबळाच्या काही समस्या आहेत. शास्त्रज्ञांच्या रिक्त जागा भरण्यासाठी आधी परवानगी नव्हती. राज्य शासनाने परवानगी दिल्यामुळे आता विद्यापीठाच्या स्तरावर भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या संशोधन केंद्रात लवकरच मनुष्यबळ वाढेल. - डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक,महात्मा फुले कृषी विद्यापीठ
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव

पुणे : देशाच्या साखर उद्योगाला संशोधनातून बळकटी देणाऱ्या महाराष्ट्रातील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राला घरघर लागल्याची खंत शास्त्रज्ञ वर्गात आहे. या केंद्रातील महत्त्वाची पदे रिक्त ठेवण्यात आल्यामुळे संशोधनाची गती थांबल्याचे दिसून येते.  राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधनात अग्रस्थानी राहिलेल्या पाडेगाव केंद्राची स्थापना १९३२ मध्ये झाली. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठापेक्षाही मोठा वारसा लाभलेल्या या संशोधन केंद्रासाठी ३०० कर्मचारी संख्या मंजूर आहे. प्रत्यक्षात शास्त्रज्ञांची अनेक पदे भरलेली नाहीत. एकूण १४५ पदे रिक्त असून, काही जण सोयीसाठी चक्क विद्यापीठात कामे करत वेतन मात्र पाडेगाव संशोधन केंद्राचे घेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  कृषी विद्यापीठातील प्राध्यापक श्रेणीतील विशेषज्ञाच्या नेतृत्वाखाली पाडेगाव संशोधन केंद्राचे कामकाज चालते. मात्र कृषी वनस्पतिशास्त्रासाठी अद्यापही प्राध्यापक दर्जाचा शास्त्रज्ञ नियुक्त केलेला नाही. शास्त्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे त्याचा परिणाम थेट संशोधनावर होतो आहे. ‘‘संशोधनाची क्रिया अखंड व पुर्ण क्षमतेने सुरू राहिली तरच संशोधन केंद्राच्या हाती चांगले वाण लागते. मात्र पाडेगाव केंद्रात सध्या ऊस शरीरक्रिया शास्त्रज्ञ आणि सूक्ष्म जीवविकृती शास्त्रज्ञ नाही. मृद्पदार्थ-विज्ञान शास्त्रज्ञदेखील उपलब्ध नाही. ऊस रोगशास्त्रज्ञ आणि कीटकशास्त्रज्ञाचे पद देखील रिक्त आहे. जीवरसायन शास्त्रज्ञाचे एक पद भरले असले तरी संबंधित शास्त्रज्ञ मात्र राहुरी विद्यापीठात काम करतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले. पाडेगाव केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहायकाच्या सहापैकी दोन जागा रिक्त आहेत. १५ कनिष्ठ सहायकांपैकी ९ जागा रिक्त असून, उपलब्ध सहायकांपैकी काही जण राहुरी विद्यापीठात काम करतात. २६ कृषी सहायकांपैकी चार पदे रिक्त असून, काही जण विद्यापीठातून कामे करीत असल्याचे दिसून येते. केंद्राच्या आवारातील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, काही प्रयोगशाळादेखील धूळ खात पडल्या आहेत.  मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचा केवळ संशोधन विभागच नाही तर आस्थापना विभागदेखील कमकुवत ठेवण्यात आलेला आहे. या विभागाला लिपिक देण्यात न आल्यामुळे केंद्रातील शास्त्रज्ञांना संशोधन सोडून आस्थापनाविषयक कामांमध्ये वेळ घालवावा लागतो.  राज्यात १०० हेक्टरवर बीजोत्पादनाचा प्रयोग घेणाऱ्या पाडेगाव संशोधन केंद्रामुळे १०००१ आणि २६५ अशा जाती शेतकऱ्यांना मिळालेल्या आहेत. त्यामुळे उत्पादकता वाढून गाळपात किमान पाच हजार कोटींची उलाढाल वाढल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. ‘‘पाडेगाव संशोधन केंद्रातील संशोधनाची परंपरा गौरवशाली राहिल्यामुळे येथून दोन शास्त्रज्ञ पुढे कुलगुरू झाले. याशिवाय ‘व्हीएसआय’चा एक महासंचालकदेखील या संशोधन केंद्रात शास्त्रज्ञपदी कार्यरत होता. ही परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी केंद्राच्या समस्यांकडे राज्य सरकारनेच लक्ष द्यावे. अन्यथा, या संशोधन केंद्राचे संशोधन पूर्णतः बंद पडू शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.  मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या बळकटीकरणासाठी काय हवे

  • महत्त्वाची सर्व पदे भरण्याची आवश्यकता
  • विशेषज्ञाचे अधिकार वाढविण्याची गरज 
  • निवासस्थाने व प्रयोगशाळांची देखभाल 
  • केंद्राच्या नावाखाली इतरत्र कामे करणाऱ्यांना परत बोलावणे
  • ऊस ठिबक तंत्र विकासासाठी स्वतंत्र प्रकल्प हवा  
  • अनुदान तुटपुंजे असून ते वाढविण्याची गरज       
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com