राज्यातील धरणासाठा ५२.८३ टक्क्यांवर

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : राज्यात रब्बी हंगामात पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. यंदाच्या पावसाळ्यात धरणात १३३८ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. त्यापैकी साडेचार महिन्यांत तब्बल ५७७ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. सध्या धरणांत ७६१ टीएमसी म्हणजेच ५२.८३ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.

यंदा अनेक धरणांनीही तळ गाठल्याचे चित्र होते. परंतु ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील लहान-मोठ्या तीन हजार २४६ प्रकल्पांमध्ये मध्ये १३३८ टीएमसी म्हणजेच ७४.४७ टक्के पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षी या कालावधीत राज्यातील धरणांमध्ये ५० टक्के एवढा पाणीसाठा होता. यंदा दोन टक्के अधिक म्हणजेच ५२ टक्के पाणीसाठा असला तरी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.  

कोकणात ६५ टक्के पाणीसाठा यंदा कोकणातील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला होता. या धरणांमध्ये १२३.४५ टीएमसी म्हणजेच ९४.९० टक्के पाणीसाठा झाला होता. सध्या कोकणात ८१ टीएमसी म्हणजेच ६६ टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या साडेचार महिन्यांत ४२ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला आहे.

मध्य महाराष्ट्रात मुबलक पाणी मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे पुणे विभागातील ७२५ धरणांत ५८९.९० टीएमसी म्हणजेच ८९.२७ टक्के, नाशिक विभागातील ५६१ धरणांत १९७.८१ टीएमसी म्हणजे ८१.९३ टक्के पाणीसाठा झाला होता. सध्या पुणे विभागातील धरणांत ३५७ टीएमसी म्हणजेच ६६ टक्के, तर नाशिक विभागातील धरणांत १२० टीएमसी म्हणजे ५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन्ही विभागांत अधिक पाणीसाठा आहे.

मराठवाड्यात ४७ टक्के पाणीसाठा ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अनेक भागांत जोरदार ते मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे मराठवाड्यातील धरणांत २३२.४८ टीएमसी म्हणजेच ७३.४३ टक्के पाणीसाठा झाला होता. हा पाणीसाठा वर्षभर पुरेल एवढा असला तरी पिण्याच्या पाण्याची चिंता करावी लागणार नसल्याचे समोर आले होते. सध्या १२२ टीएमसी म्हणजेच ४७ टक्के एवढा पाणीसाठा असून आतापर्यंत ११० टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे.

विदर्भात पाणीटंचाईची शक्यता यंदा ऑक्टोबरअखेर नागपूर विभागात १११.२७ टीएमसी म्हणजे ४७.३२ टक्के, अमरावती विभागात ८३.२८ टीएमसी म्हणजेच ७६.२७ टक्के पाणीसाठा झाला होता. मात्र, गेल्या साडेचार महिन्यांत पाण्याचा वापर अधिक झाला आहे. सध्या नागपूर विभागातील धरणांत ३९.७१ तर, अमरावती विभागात ४०.६३ टीएमसी पाणीसाठा आहे. अशा स्थितीत विदर्भात पाणीटंचाई भासण्याची शक्यता आहे.

साडेचार महिन्यांत धरणांतील पाण्याचा झालेला वापर (टीएमसीमध्ये)

विभाग पाणीसाठा (ऑक्टोबरअखेर) पाणीसाठा (१८ फेब्रुवारीपर्यंत) झालेला वापर
पुणे ५८९.९०    ३५७.५२ २३२.३७
औरंगाबाद  २३२.४८    १२२.२९ ११०.१८
नाशिक १९७.८१ १२०.२१ ७७.५९
ठाणे  १२३.४५ ८१.०५  ४२.३९
नागपूर १११.२७  ३९.७१ ७१.५६
अमरावती ८३.२८    ४०.६३     ४२.६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com