शालेय विद्यार्थ्यांना दूध पावडर देण्याचा निर्णय

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना आता माध्यान्ह भोजनासोबत दूध पावडरचे एक पाकीट दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला २०० ग्रॅमचे दूध पावडरचे पाकीट एका महिन्यासाठी दिले जाणार आहे. तीन महिने हा प्रयोग करण्यात येणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला तीन महिन्यांत ६०० ग्रॅम दूध पावडर मिळणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.

राज्यात निर्माण झालेल्या दूधदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अनुदानासोबत शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या पोषण आहारात दुधाचा आणि दूध भुकटीचा समावेश केल्याची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरच्या किमती कमी झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने सरकारने हा निर्णय घेतला होता. राज्यात सुमारे ३० हजार टन पावडर शिल्लक आहे.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग आदी विविध विभागांकडून पोषण आहार योजना राबविली जाते. या योजनांच्या माध्यमातून पोषण आहार म्हणून दूध अथवा दुधाची भुकटी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार दूध पावडर योजना पहिल्यांदा तीन महिन्यांसाठी राबवण्यात येणार असून, या दूध पावडरच्या वितरणासाठी शाळांना प्रत्येक महिन्यातील एक दिवस ठरवावा अशा सूचना या निर्णयानुसार देण्यात आल्या आहेत. याच दिवशी शाळेतील समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना दूध पावडरच्या पाकिटांचे वितरण करण्यात येणार असून दूध पावडरपासून कशाप्रकारे दूध बनवायचे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.

या योजनेसाठी प्राथमिक शिक्षण संचालक राज्य समन्वयक म्हणून काम कऱणार आहेत. तर ही योजना लागू करण्यासाठी सरकारने राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. नऊ सदस्यांच्या या समितीत वित्त विभाग, शिक्षण विभाग, नियोजन विभाग, उद्योग विभाग, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास विभागातील वरिष्ठ सचिवांचा समावेश आहे.  सुमारे साडेसात हजार टन पावडर योजनेसाठी वापरली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com