दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटका

दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटका
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटका

पुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात दुग्ध क्षेत्राला २८०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे बाजारभाव सावरण्याची शक्यता नसल्याने तोटा आणखी वाढेल, असा इशारा डेअरी उद्योगाने दिला आहे.  देशातील दूध पावडर लोण्याच्या साठ्यामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. देशात सध्या तीन लाख टन दूध भुकटी विक्रीअभावी पडून आहे. लोण्याचे साठेदेखील एक लाख टनाच्या आसपास पोचलेले आहेत. ‘‘दूध पावडर (भुकटी) व बटरचा (लोणी) साठा विकून डेअरी उद्योगाकडे पुरेसा पैसा येत नाही तोपर्यंत दुधाचे दर शेतकऱ्यांना वाढवून मिळण्याची शक्यता वाटत नाही,’’ असे दुग्ध प्रक्रिया उद्योगातील सूत्रांचे म्हणणे आहे.  राज्यात खासगी दुधाच्या बाजारपेठेवरील घडामोडींवर सहकारी दूध संघांचे दर ठरतात. शासनाने प्रतिलिटर २७ रुपये दर शेतकऱ्यांना देण्याचे बंधन घातले असले तरी सध्या खासगी व सहकारी संघांकडून दुधाला १८ ते २४ रुपये दर दिला जात आहे. ‘‘पुणे जिल्हा सहकारी दूध संघ यापूर्वी २२.४० रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करीत होता. त्यात आता एक रुपयाने कपात करण्यात आली आहे. खासगी डेअरीचालकांनी देखील एक रुपया प्रतिलिटरने भाव कमी केले असून १८ ते १९ रुपयांनी दूध खरेदी सुरू केली आहे,’’ अशी माहिती महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली. ‘‘दुध पावडरची निर्यात ठप्प असल्यामुळे राज्यात सध्या ३० हजार टन दूध भुकटीचा साठा पडून आहे. लोण्याचा साठादेखील १० हजार टनाच्या आसपास पोचला आहे. दूध डेअऱ्यांचे कोट्यवधी रुपये भुकटी व लोण्याच्या स्टॉकमध्ये अडकल्यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयादेखील वाढवून देणे अवघड आहे,’’ असे स्पष्ट मत सूत्रांनी व्यक्त केले. गायीच्या १०० लिटर दुधाची खरेदी झाल्यानंतर त्यापासून लोणी व पावडर तयार केल्यास प्रतिलिटर १० रुपये ६९ पैसे तोटा होतो आहे. म्हशीचे १०० लिटर दूध खरेदी केल्यास लोणी व पावडर तयार करून हाच तोटा ६ रुपये ९८ पैसे इतका होतो. दूध पावडरचा तीन लाख टनाचा साठा बघता पावडरमध्ये सरासरी भाव बघता १८०० कोटी रुपये तोटा आतापर्यंत झालेला आहे. लोण्याचे एक लाख टनाचे साठे बघता बाजारातील सरासरी किंमत बघता ८०० कोटींचा तोटा झालेला आहे.  राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात चांगला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाचा उल्लेख केला जात होता. तथापि, डेअरी उद्योगाला सतत होत असलेल्या तोट्यामुळे दूधधंद्याविषयी नकारात्मक भावना शेतकऱ्यांमध्ये तयार होत आहे. यासाठी केंद्र सरकारने ७५ टक्के अनुदान व राज्य सरकारने २५ टक्के वाटा उचलून दुधाला हमीदर द्यावा, असा उपाय डेअरी उद्योगाने सुचविला आहे.   ‘‘शालेय पोषण आहारात दूध पावडरचा वापर, बफर स्टॉक अशा माध्यमातून देखील शासनाला या व्यवसायाला टेकू द्यावा लागेल. आम्ही सुचवित असलेल्या उपायांवर वेळीच धोरणात्मक बदल न झाल्यास पुढील वर्षी दूध खरेदीचा गंभीर प्रश्न तयार होईल,’’ असा इशारा सहकारी दूध संघांनी दिला आहे.  शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले ६० टक्क्यांपेक्षा जास्त दूध पावडर व प्रक्रियेसाठीच वापरले जाते. पावडरला भाव नसल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला दर कमी मिळतो. त्यामुळे राज्यात सध्या सहकारी दूध संघ व खासगी डेअरीमालक एकत्र येऊन राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.  ‘‘दुग्ध क्षेत्रातील समस्या सरकार ऐकून घेण्यास तयार नाही. त्यामुळे आम्ही आता माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाच साकडे घालणार आहोत. कर्नाटक, आंध्र, गोवा, राजस्थान, छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान मिळत असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर अन्याय करू नये, अशी विनंती करणारे शिष्टमंडळ श्री. पवार यांच्या माध्यमातून पंतप्रधानांकडे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com