राज्यात यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस : डॉ. रामचंद्र साबळे

राज्यात यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस
राज्यात यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस

पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (माॅन्सून) हंगामामध्ये (जून ते सप्टेंबर) राज्यात यंदा सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ व राहुरी कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तविला आहे. कोकणात सरासरीच्या तुलनेत १०७ टक्के, पश्‍चिम महाराष्ट्रात १०३ टक्के, उत्तर महाराष्ट्रात १०३ टक्के, मराठवाड्यात १०२ टक्के, पूर्व विदर्भात १०५ टक्के, मध्य विदर्भात १०२ टक्के तर पश्चिम विदर्भात ९६ टक्के पाऊस पडण्याचा डॉ. साबळे यांचा अंदाज आहे. डॉ. साबळे यांच्या स्थानिक ठिकाणच्या पाऊस अंदाजाच्या मॉडेलनुसार संबंधित ठिकाणचे गेल्या तीस वर्षांचे हवामान आणि हवामान केंद्रांनी मार्च, एप्रिल व मे महिन्यात नोंदविलेली हवामान घटक स्थिती विचारात घेऊन हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल व किमान तापमान, सकाळ व दुपारची आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी आदी घटकांच्या नोंदी यात विचारात घेण्यात आल्या आहेत. मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा, कोकण, सह्याद्रीचा घाटमाथा येथे अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच यवतमाळ, सिंदेवाही, मुंबईसह कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे. तर पावसाच्या वितरणातील फरकाबराेबरच पावसात पडणारे खंड आणि कमी कालावधीमध्ये अधिक पाऊस ही या हंगामातील मुख्य वैशिष्ट्य ठरण्याची शक्यता आहे. जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसात पुणे, राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, निफाड, जळगाव, अकोला, सिंदेवाही व परभणी येथे मोठे खंड पडतील. दापोली, पाडेगाव व नागपूर भागात खंडित वृष्टी राहील, अशी माहिती डॉ. साबळे यांनी दिली.

हवामान व पावसानुसार करा पीक नियोजन पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी खरिपाचे नियोजन करताना विशेष काळजी घ्यावी. जमिनीत पुरेसा (६५ मिमी) ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. या अनुषंगाने १० जुलैपर्यंत मूग, मटकी, उडीद, चवळी व त्यानंतरच्या पेरणीसाठी सोयाबीनची निवड करावी लागेल. अांतरपीक लागवड करण्यावर भर द्यावा. पावसाच्या स्थितीनुसार पीक पद्धतीत बदलण्यासाठी सोयाबीन, मका व तूर ही पिके महत्त्वाची आहेत.  सोयाबीनची रुंद वरंबे आणि सरी पद्धतीने लागवड करावी. मध्य व पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याने पाणी निचरा व्यवस्थापनावर अधिक भर द्यावा. त्यासाठी शेताच्या उताराकडील बांधाच्या कोपऱ्यात बांधाची उंची थोडी कमी करून तसेच शेताच्या बाजूने सरी पाडून त्यातून पावसाचे पाणी निचरा होईल, अशी व्यवस्था पेरणीनंतर लगेच करावी.  खरीप पिकांच्या काढणीवेळी पावसाची शक्यता असल्याने पावसात उघडीप असताना ती काढून त्याची मळणी करावी. शेतमाल सुरक्षित स्थळी हलविणे गरजेचे आहे. त्यामुळे नुकसान होणार नाही. कोकणात भात रोपांच्या रोपवाटिका दोन टप्प्यांत कराव्यात. त्यामुळे पावसाच्या प्रमाणानुसार भातरोपांची पुनर्लागवड करणे शक्य होईल. लागवडीच्या वेळी योग्य वयाचे रोप उपलब्ध होतील.  गतवर्षीच्या हंगामाप्रमाणेच यंदाही स्थिती राहणार आहे. त्यामुळे कापसावर गुलाबी बोंड अळी येण्याची शक्यता असल्याने कापसाचे क्षेत्र कमी करावे. तसेच कीडनाशक फवारणी करताना काळजी घ्यावी. यंदाही उसाखालील क्षेत्रात वाढीची शक्यता असून, साखर कारखान्यांनी ऊसतोडणी नियोजन व्यवस्थित राबवणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ घ्यावा. पीक पद्धतीत बदल करताना आपल्याकडील पाऊसमान, पिकांचा कालावधी व पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन पीक पद्धतीत बदल करावा. उदा. घेवडा, धने ही कमी कालवधीची पिके आहे.  या वर्षी वेळेपूर्वी पाऊस येत असल्याने मूग, मटकी, चवळी, तूर ही कडधान्य पिके व सोयाबीनसारख्या तेलबिया पिकाखालील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. शेतकऱ्यांनी हवामान अंदाजचा अभ्यास करून पीक लागवडीचे नियोजन करावे. पावसात पडणारे खंड पाहता सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी ठवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.  उजनी, जायकवाडी यंदाही भरणार  गतवर्षी उजनी, जायकवाडी धरणे भरणार असल्याचा अंदाज दिला होता. उजनी धरण ऑगस्ट महिन्यात तर जायकवाडी सप्टेंबर महिन्यात भरले होते. यंदाही पुणे अाणि नाशिकसह सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडणार असल्याने उजनी, जायकवाडीसह सर्व धरणे भरणार अाहेत. पावसात खंड असला तरी कमी दिवसांत अधिक पाऊस पडणार असल्याने नद्यांना पूर येऊन सर्व धरणांचा पाणीसाठा वाढेल, असे डॉ. साबळे यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com