पीक कापणी
पीक कापणी

'पीककापणी प्रयोगात सांख्यिकी करतात हेराफेरी'

पुणे  : कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी कार्यालयाच्या अखत्यारीत पीकविम्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पीक कापणी प्रयोगात हेराफेरी केली जात असल्याचे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पत्रव्यवहारातून स्पष्ट केले आहे. परभणीतील शेतकऱ्यांनी कृषी आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. परभणी तालुक्यात पीकविम्याच्या कामात घोळ झालेला असून, कृषी विभागाच्या सांख्यिकी विभागाकडून कंपन्यांना पाठीशी घातले जात आहे, असा आरोप करीत दोन आठवड्यांपूर्वी परभणी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाबाबत आयुक्तालयाला निवेदनदेखील दिले होते.  परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान देण्याची वेळ येऊ नये म्हणून विमा कंपनीने सांख्यिकी यंत्रणेला हाताशी धरून थेट पीककापणी प्रयोगच रद्द केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे.  दरम्यान, परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाने कृषी विभागाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे, की शेतकरी प्रतिनिधींनी पीककापणी प्रयोगाबाबत नोंदविलेल्या आक्षेपानुसार पडताळणी करण्यात आलेली आहे. ज्या प्रयोगात खाडाखोड आहे, तसेच पीककापणी प्रयोगात समिती सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत, छायाचित्रे नाहीत, अशा सर्व प्रयोगांची आकडेवारी रद्द करण्यात आलेली आहे.   ‘‘चुकीची सर्व आकडेवारी रद्द करण्यात आलेली असून, सुधारित संकलन पाठविण्यात आलेले आहे. तसेच, सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयबीन पिकासाठी विमा निश्चित करण्यासाठी गंखाखेड तालुक्यातील प्रत्यक्ष पीकविमा उत्पन्न गृहीत धरणे उचित राहील,’’ असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.  मुख्य सांख्यिकी कार्यालयाने कंपन्यांची दलाली करण्यासाठी सोनपेठ तालुक्याच्या आकडेवारीऐवजी चुकीच्या तालुक्यातील आकडेवारीला मान्यता दिल्याचा गंभीर आक्षेप या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. आकडेवारी उपलब्ध नसेल तर गंखाखेडची माहिती वापरा, अशी शेतकऱ्यांची मागणी असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, सांख्यिकी विभागाने ही प्रक्रिया दाबून ठेवली व हा प्रश्न आणखी चिघळवत ठेवला, असा आरोप शेतकऱ्यांचा आहे.  पत्रव्यवहाराचा अभ्यास करणार दरम्यान, कंपन्यांना हाताशी धरून राज्यात अनेक भागांत पीककापणी प्रयोगात कंपन्यांनी हेराफेरी केल्याचा आमचा संशय आहे. कृषी आयुक्तांवर आमचा विश्वास आहे. मात्र, त्यांचीदेखील दिशाभूल केली जात आहे. सांख्यिकी विभाग ही माहिती दडवत असला, तरी आम्ही सर्व पत्रव्यवहाराचा अभ्यास करणार आहोत, असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.  'तुमच्या चुकांमुळे उपोषणाची वेळ' सांख्यिकी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना चर्चेला बोलावून तुम्ही मला टार्गेट का करता, असा प्रश्न विचारला. यामुळे शेतकरी संतप्त झाले. तुमच्याशी आमचे भांडण नाही. पण कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिकीची खुर्ची आमच्या नजरेत एक बदनाम खुर्ची आहे. कारण शेतकरी आत्महत्येची आकडेवारी आणि पीकविम्याच्या भरपाईशी सांख्यिकी कार्यालयाचा संबंध असतो. तुमच्या चुकांमुळेच आम्हा शेतकऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ येते, असे उत्तर शेतकरी माउली कदम यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com