जुन्नर तालुक्‍यातून फलोत्पादन अभियानासाठी सर्वाधिक अर्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः एकात्मिक फलोत्पादन अभियानातील (एनएचएम) घटकांच्या अनुदानाचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून ३० जूनपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. यंदा या अभियानासाठी जिल्ह्यातून १३ हजार ६०८ अर्ज दाखल झाले असून, जुन्नर तालुक्‍यातून सर्वाधिक २९९२ अर्ज आले आहेत. शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सर्व तालुका व जिल्हास्तरीय सोडत पुढील आठवड्यात होणार आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना २०१८-१९ मध्ये राबविण्यात येत आहे. यातून अनुदानावर सुमारे २९ विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. लाभार्थी निवडण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. त्यासाठी २० जून ही अंतिम मुदत होती. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने अनेक शेतकरी त्यात व्यग्र होते; तसेच ग्रामीण भागातील इंटरनेट सुविधेतील अडचणी, ऑनलाइनमधील त्रुटी अशा विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी वेळ लागत होता. परिणामी, अनेक शेतकरी या अभियानातील घटाकापासून वंचित राहणार होते. त्यामुळे या योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

त्याची दखल घेत अर्जासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सध्या आलेल्या या अर्जाची जिल्हा व तालुका पातळीवरून छाननी सुरू आहे. यंदा या योजनेअंतर्गत हरितगृह, शेडनेट, शेततळे अस्तरीकरण, हरितगृहातील उच्च दर्जाचे लागवड साहित्य, फुले व भाजीपाला, ट्रॅक्‍टर, पॉवर टिलर, शीतगृह, रायपनिंग चेंबर, रेफर व्हॅन, पीकसंरक्षण साहित्य, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ उभारणी, मधुमक्षिकापालन या घटकांकरिता अनुदान दिले जाणार आहे; तसेच सामूहिक शेततळे या घटकाकरिता फक्त अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. शेतकऱ्यांना या घटकाअंतर्गत ६०० ते एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.  

अभियानासाठी आलेल्या तालुकानिहाय अर्जाची संख्या
तालुका  आलेले अर्ज
आंबेगाव  १६२७
बारामती   ९८६
भोर १७४
दौंड   ६९३
हवेली  ४७६
इंदापूर २७६२
जुन्नर २९९२
मुळशी १२७
पुरंदर ८५९
खेड ३३४
शिरूर २२९७
वडगाव मावळ २५१
वेल्हा  ३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com