तीन जिल्ह्यांत १७४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

पाणीटंचाई
पाणीटंचाई

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा घटत आहे. त्यामुळे पाणीटंचाई उद्भभवलेल्या गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यांची संख्या वाढत आहे. सध्या या तीन जिल्ह्यांतील ११२ गावे आणि ५१ वाड्या-तांड्यांना १७४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाणीपुरवठा तसेच टॅंकरसाठी ९७६ गावे, ६९ वाड्यांवरील १२१५ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. परंतु पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे अनेक प्रकल्प अजून कोरडेच आहेत. मृत पाणीसाठ्यातील घट सुरूच आहे. विहिरी, बोअरची पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे पाणीटंचाई उद्भवणाऱ्या गावे, वाड्यांच्या संख्येत पावसाळ्याच्या तोंडावर वाढ होत आहे.

नांदेड जिल्ह्यातील ६५ गावे आणि ३४ वाड्यांना ११ शासकीय आणि १०१ खाजगी अशा एकूण ११२ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक ३३ टॅंकर सुरू असून ९ गावे आणि २० तांड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. नांदेड तालुक्यात १६, अर्धापूर, उमरी, देगलूर तालुक्यात प्रत्येकी १, भोकर, हिमायतनगरमध्ये प्रत्येकी ३, हदगावमध्ये ६, नायगावमध्ये ९, कंधारमध्ये ७, लोहामध्ये १३, किनवटमध्ये ११, माहूर तालुक्यात ८ टॅंकर सुरू आहेत. पाणीटंचाई उद्भवेलेल्या गावांमध्ये तसेच पाणीपुरवठा करणा-या टॅंकरसाठी ६६६ गावे आणि ६९ वाड्यावरील ८५२ विहिरी बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातील नऊ लघू तलाव कोरडे पडले आहेत. नऊ तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. केवळ चार तलावांमध्ये ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही घट सुरूच आहे. सध्या जिल्ह्यातील ४२ हजार १४९ लोकसंख्या टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. २९ गावे १३ वाड्यांना ९ शासकीय आणि ३३ खासगी असे एकूण ४२ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पालम तालुक्यात सर्वाधिक १५ टॅंकर सुरू आहेत. गंगाखेडमध्ये १०, पूर्णामध्ये ८, सेलूमध्ये ४, जिंतूरमध्ये ५ टॅंकर सुरू आहेत. एकूण १८७ गावांतील २०४ विहिरी, बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील २५ हजारांवर लोकसंख्येसाठी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १८ गावे आणि ४ वाड्यावर २० टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. १२३ गावांतील १५९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com