आर्द्रता वाढल्याने साठविलेल्या हरभऱ्याला भुंगा

आर्द्रता वाढल्याने साठविलेल्या हरभऱ्याला भुंगा
आर्द्रता वाढल्याने साठविलेल्या हरभऱ्याला भुंगा

कळंब, जि. उस्मानाबाद ः शासकीय हमी भाव खरेदी केंद्र बंद झाले आहे, तर हरभरा विक्रीसाठी खरेदी-विक्री संघाकडे दिलेली कागदपत्रे गहाळ झाली आहेत. वातावरणातील आर्द्रता वाढल्याने साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला भुंगा लागला आहे. खरेदी केलेल्या हरभऱ्याची दमडीही शेतकऱ्यांना मिळाली नाही. अशा एक ना अनेक समस्यांनी शेतकरी त्रस्त झाले आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने एक हजार रुपये क्विंटलला अनुदान देण्याचे निश्‍चित केले आहे; पण ते अनुदानाचे निकष कसे असणार हे मात्र गुलदस्त्यात असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी कोंडीत सापडले आहेत. येथील नाफेडच्या शासकीय हमी केंद्राला मुदत संपल्याने टाळे लागले होते. सात ते आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी हरभरा ऑनलाइन नोंदणीसाठी खरेदी-विक्री संघाच्या यंत्रणेकडे कागदपत्रे दिली होती. त्यांपैकी साडेतीन हजार शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी खरेदी-विक्री संघाकडे आढळून येत आहे. त्यापैकी साडेतीनशे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली आहे. ऑनलाइन नोंदणी केलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडे पुढे अनेक प्रश्‍न आहेत. शासकीय हमी केंद्राची मुदत शासनाकडून वाढवून मिळेल, या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी आज, उद्या ऑनलाइन नोंदणी करता येईल असे नियोजन केले होते. काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणीसाठी खरेदी-विक्री संघाच्या यंत्रणेकडे कागदपत्रे सुपूर्द केली होती. मात्र, कागदपत्रे गहाळ झाली असल्याच्या संबंधित यंत्रणेच्या उत्तराने शेतकरी संतप्त झाले आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचाही नाफेडच्या ढिसाळ नियोजनामुळे हरभरा खरेदी होऊ शकला नाही. लाखो क्विंटल हरभरा शेतकऱ्यांच्या घरात विक्रीअभावी पडून आहे. हवामानात बदल झाल्यामुळे साठवून ठेवलेल्या हरभऱ्याला भुंगा लागला आहे. त्यामुळे खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी संकाटात सापडले आहेत. ९० टक्के हरभरा शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे.  ऑनलाइन नोंदणी असलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलला हजार  रुपये अनुदान देण्याचे शासनाने निश्‍चित  केले आहे. मात्र, हे अनुदान कोणत्या निकषाने शेतकऱ्यांना मिळणार हे मात्र गुलदस्त्यात असल्याने शेतकरी कोंडीत सापडले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com