वादळ, गारपिटीने वऱ्हाडात कोट्यवधींचे नुकसान

संग्रामपूर तालुक्‍यात टरबूज फळे अशी तडकली.
संग्रामपूर तालुक्‍यात टरबूज फळे अशी तडकली.

अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये रविवारी (ता. ११) सकाळी गारपीट, वादळी पावसामुळे पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. गहू, हरभरा, संत्रा, केळी, टोमॅटो, बीजोत्पादन प्लॉटचे अतोनात नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात गारपिटीच्या तडाख्याने वृद्धेचा मृत्यू झाला, तर बुलडाणा जिल्ह्यातील लाडणापूर भागात तूर काढण्याचे काम करीत असलेले शेतमजूर जखमी झाले.  

याच भागातील आदिवासी क्षेत्रात वादळामुळे घरांवरील टिनपत्रे उडून गेले. या नुकसानीची पाहणी करून तातडीने पंचनामा करण्याचे आदेश कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यंत्रणांना दिले आहेत. रविवारी सकाळी वऱ्हाडात ठिकठिकाणी गारपीट झाली. पाच ते दहा मिनीटापर्यंत बोराच्या आकारापेक्षा अधिक मोठ्या गारा पडल्या.

चिखली तालुक्‍यात गारांमुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. सोबतच भाजीपाला, शेडनेटची तुटून गारांचा खच पडला होता. संग्रामपूर तालुक्‍यात सातपुड्याला लागून असलेल्या टुनकी, लाडणापूर, संग्रामपूर, वानखेड, वरवट बकाल या भागात गारपिट झाल्याने कांदा, भाजीपाला, संत्रा बागांचे प्रचंड नुकसान झाले. तालुका कृषी अधिकारी नितीन सवडतकर यांनी तातडीने अधिकाऱ्यांसह शेतांना भेटी दिल्या.

बुलडाणा जिल्ह्यात खामगाव, देऊळगावराजा, नांदुरा, मेहकर तालुक्‍यांमध्ये जोरदार गारपीट झाली. खामगाव तालुक्‍यात आमदार आकाश फुंडकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठिकठिकाणी पाहणी केली. अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे सुरू करण्याबाबत आदेश दिले. अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा तालुक्‍यांत गारपीट झाली. तेल्हारा तालुक्‍यात दानापूर, हिवरखेड भागांत बोराच्या आकारपेक्षा मोठी गार पडली.

अकोट तालुक्‍यात बोर्डी व इतर गावांना वादळी वारा व गारांचा तडाखा बसला. यात केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले. इतर भागातही जोरदार पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड, वाशीम या तालुक्‍यांत ठिकठिकाणी गारपीट झाली. रिसोड तालुक्‍यातील जोगेश्‍वरी, महागाव, वाकद, गोहगाव, गोभर्णा, भापूर, वाडीवाकद, गणेशपूर, तपोवन, नेतन्सा, केनवड, कळमगव्हाण, बोरखेडी, मोप, चाकोली, मोरगव्हाणवाडी, भर जहॉँगीर, आसोला, मोहनाबंदी, या ठिकाणी गारपीट होऊन गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले.

महागाव येथे यमुनाबाई रामभाऊ हुंबाड (वय ७२) या गोपालेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या असता रस्त्यात त्यांना गारा व पावसाचा मार बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. तर जागेश्‍वरी येथील ज्ञानेश्‍वर पिसळ, नारायण वाळूकर, वैभव मोटे यांच्या कुटुंबातील सदस्यांना गारांचा मार बसला. त्यांना वाशीम ग्रामीण रुग्णालयात उपचार दिले जात आहेत.

कोट्यवधींचे नुकसान २०१४ नंतरची ही मोठी गारपीट ठरली. या आपत्तीमुळे हातातोंडाशी आलेल्या गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. इतर पिकांनाही फटका बसला. यामुळे कोट्यवधींच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज आहे.

गारपीट झालेले तालुके चिखली, संग्रामपूर, नांदुरा, देऊळगावराजा, शेगाव, मेहकर, रिसोड, वाशीम, अकोट, मालेगाव.

नुकसान झालेली पिके कांदा, गहू, हरभरा, टरबूज, टोमॅटो, मिरची, संत्रा, केळी, आंबा, भाजीपाला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com