अन्यथा करा माझ्या घरासमोर उपोषण: सहकारमंत्री देशमुख

अन्यथा करा माझ्या घरासमोर उपोषण: सहकारमंत्री देशमुख
अन्यथा करा माझ्या घरासमोर उपोषण: सहकारमंत्री देशमुख

सोलापूर : विकास सोसायटीकडे आमचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. अनेकवेळा सोसायटीच्या सचिवांकडे त्याची मागणी करूनही आम्हाला ते दिले जात नाहीत. अगोदर थकबाकीची रक्कम भरा, मग तुमचे शेअर्स तुम्हाला परत दिले जातील, असे आम्हाला सांगितले जाते, अशी तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी चक्क त्यांच्या घरासमोर उपोषण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. 

जिल्ह्यातील विकास सोसायट्यांकडे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेअर्स आहेत. शेतकऱ्यांनी मागणी करूनही ती रक्कम त्यांना परत दिली जात नाही. याबाबत कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील शेतकऱ्यांनी सहकारमंत्री देशमुख यांच्याकडे तक्रार केली. त्या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना आपल्या घरासमोर उपोषण करण्याचे आवाहन केले. शेतकरी कर्जमाफीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे सात-बारा उतारे कोरे होणार आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांनी विकास सोसायट्यांकडे शेअर्सच्या रकमेची मागणी करावी. कर्ज माफ झाल्यानंतरही त्यांनी शेअर्सची रक्कम न दिल्यास उपोषण करण्याचा सल्ला सहकारमंत्र्यांनी दिला. शेअर्सचे पैसे बिनव्याजी वापरतात व त्याचे व्याज मात्र शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा झाला आहे. या वेळी सहकारमंत्र्यांसोबत भाजप तालुकाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, जिल्हा परिषदेतील पक्षनेते आनंद तानवडे, नगरसेवक महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, प्रभाकर मजगे, अप्पासाहेब पाटील, व्यंकट मोरे, केशव मोरे, राहुल काळे, आबा महाराज कुरनूरकर, हरी पवार, बालाजी मोरे, विक्रम शिंदे, राजकुमार झिंगाडे, काशिनाथ काळे, श्‍याम चेंडके, रवी सलगरे उपस्थित होते. सुरवातीला सहकारमंत्र्यांचा सत्कार झाला. 

त्या शेतकऱ्यांना भविष्यात फायदा  ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहे, त्या शेतकऱ्यांना भविष्यात फायदा होणार आहे. सध्याच्या 25 हजार रुपयांच्या माफीबरोबरच भविष्यात त्या शेतकऱ्यांना शासनाच्या योजना प्राधान्याने दिल्या जातील, असेही सहकारमंत्री देशमुख यांनी सांगितले.

सहकारमंत्र्यांनी जाणून घेतल्या अडचणी  सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज कुरनूर (ता. अक्कलकोट) येथील महा-ई-सेवा केंद्राला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरताना कोणत्या अडचणी येतात, याची माहिती संबंधित ऑपरेटर व शेतकऱ्यांकडून घेतली. 

सरकारने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरण्याचा निर्णय घेतला आहे. तो अर्ज भरण्यासाठी केंद्रावर सहकुटुंब यावे लागते. एक अर्ज भरण्यासाठी दिवसाच्यावेळी अर्धा ते एक तास लागतो. तर तोच अर्ज रात्रीच्यावेळी भरला तर पाच-दहा मिनिटांत भरून पूर्ण होतो, असे तेथील ऑपरेटरने सहकारमंत्री देशमुख यांना सांगितले. ज्या शेतकऱ्यांची संयुक्त कर्जखाती आहेत, त्यासंदर्भातही माहिती भरताना अडचणी येत असल्याचे सहकारमंत्र्यांना सांगण्यात आले. या गावामध्ये 225 कर्जदार खातेदार आहेत, त्यापैकी 143 जणांची माहिती भरून पूर्ण झाली आहे. 79 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. एकरकमी परतफेड या योजनेमध्ये 63 शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती विकास सोसायटीच्या सचिवांनी दिली. शेतकऱ्यांना अर्ज भरताना काही अडचणी आल्यास जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन सहकारमंत्री देशमुख यांनी केले. 

अडीच कोटींचा फायदा  येथील काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता कर्जमाफीचा जवळपास अडीच कोटी रुपयांचा फायदा या गावाला होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याचे अर्ज भरण्याला प्राधान्य असल्याचे दिसून आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com