थेट भाजीपाला विक्रीने शेतीला दिली नवी दिशा

सोलापूर शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करताना सौ. अनिता खेडे.
सोलापूर शहरातील आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करताना सौ. अनिता खेडे.

बोरामणी (जि. सोलापूर) येथील सौ. अनिता सिद्धेश्‍वर खेडे यांनी स्वतःच्या शेतीबरोबरीने काही शेती भागाने घेत वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन केले आहे. सोलापूर शहराच्या विविध भागांत भरणाऱ्या आठवडा बाजारात त्या उत्पादित भाजीपाल्याची थेट ग्राहकांना विक्री करतात. महिला शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून सुधारित तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सोलापूर शहरापासून अवघ्या बारा किलोमीटरवरील बोरामणी हे गाव अनेक वर्षांपासून भाजीपाला व फळभाज्याच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या गावातून रोज पुणे, मुंबई आणि हैदराबाद बाजारपेठेत पडवळ, दोडका याच बरोबरीने विविध प्रकारचा भाजीपाला मोठ्या प्रमाणात पाठविला जातो. या गावापासून सोलापूर मार्केटही आठ किलोमीटरवर आहे. या गावातील छोटे-मोठे शेतकरी बाजारपेठेचा अंदाज घेत भाजीपाला लागवडीकडे वळले आहेत.या गावामध्ये सौ. अनिता सिद्धेश्‍वर खेडे यांची दीड एकर शेती आहे. एकट्या बोरामणी गावातून रोज पाच ते सात वाहने मोठ्या शहराकडे भाजीपाला घेऊन जातात. या सगळ्या गर्दीत आपला निभाव कसा लागणार?, शिवाय वाहतूक खर्च, मिळणारा दर, याचा विचार करून सौ. अनिताताई यांनी आपल्या शेतातील भाजीपाल्याची स्वतःच विक्री करण्याचे ठरविले. अनिताताई नववीपर्यंत शिकल्या आहेत. त्यांना भाजीपाल्यातील चढ-उताराचा चांगला अंदाज आहे. त्यांची स्वतःची दीड एकर आणि भागाने घेतलेली पाच एकर शेती आहे. या शेतीमध्ये भेंडी, वांगी, गवार, टोमॅटो, काकडी आणि शेपू, मेथी, कोथिंबीर अशी लागवड त्या करतात. वर्षभर बाजारपेठेचा अंदाज घेत विविध भाजीपाल्याचे त्या उत्पादन घेतात. दोन वर्षांपूर्वी पणन विभागाच्या वतीने आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) माध्यमातून शहरी ग्राहकांसाठी शहराच्या विविध भागांत संत सावता माळी आठवडे बाजार संकल्पना राबवण्याचा निर्णय झाला. या बाजारात थेट भाजीपाला विकण्याची संधी त्यांना मिळाली. अनिताताई या प्रभुलिंग महिला शेतकरी बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. या गटाच्या माध्यमातून त्या सातत्याने भाजीपाला विक्री वाढविण्यासाठी धडपड करत असतात. याच बरोबरीने अनिताताई यशस्विनी ॲग्रो फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या संचालिका आहेत. या कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे आणि आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे यांनी अनिताताईंना भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसाठी प्रोत्साहन दिले. दोन वर्षांपूर्वी आठवडे बाजारातून त्यांच्या भाजीपाला विक्री व्यवसायाचा थाटात प्रारंभही झाला.

सौ. अनिताताईंचे पती सिद्धेश्‍वर हे भाजीपाला लागवड आणि व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळतात. अनिताताईंना दोन मुले आहेत. त्यांच्या सोबत सासू-सासरेही राहतात. मध्यंतरी त्यांचे दीर वारले. त्यांच्या तीन मुली आणि मोठ्या जाऊबाई असे दहा माणसांचे त्यांचे एकत्रित कुटुंब आहे. घराचा सर्व डोलारा अनिताताई सांभाळतात. त्यांच्या शेतीमध्ये विहीर तसेच कूपनलिका आहे.

जेमतेम पाणी असल्याने भाजीपाला लागवडीवर त्यांचा भर असतो. उत्पन्नाचा अन्य मोठा स्रोत नसल्याने शेतीशिवाय दुसऱ्याची शेतीही त्या भागाने करतात. या शेतीमध्येही त्यांनी भाजीपाला लागवडीवरच भर दिला आहे. याच शेतीच्या बळावर अनिताताईंनी काही वर्षांपूर्वी जाऊबाईंच्या एका मुलीचे लग्न चांगल्या पद्धतीने केले.

वर्षभर भाजीपाला लागवडीचे नियोजन सोलापूर मार्केट जवळ असल्याने अनिताताई भाजीपाला लागवडीशिवाय दुसऱ्या कोणत्याही पिकांचा विचार करत नाहीत. बाजारपेठेचा अभ्यास करत वर्षभर आलटून पालटून विविध भाजीपाला पिकांची लागवड करतात. भाजीपाल्याला दर मिळो अथवा न मिळो, पण भाजीपाल्यातील सातत्यामुळे त्यांना एकावेळेस चांगला दर मिळतोच आणि तोट्यातील अंतर भरून निघते. विशेषतः काकडी, भेंडी, टोमॅटो, गवार या भाज्यांच्या लागवडीवर त्यांचा सर्वाधिक भर आहे. साधारणपणे या भाज्यांना मागणी चांगली असते आणि दरही फार काळ पडत नाहीत असा त्यांचा अनुभव आहे.

थेट विक्री ठरतेय फायद्याची दोन वर्षांपूर्वी सोलापुरात आरटीओ कार्यालयाशेजारी पहिल्यांदा आठवडे बाजार सुरू झाला. थेट शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रवेश असल्याने शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्रीची संधी अनिताताईंना मिळाली. अडत, हमालीचा खर्चही वाचला. आठवड्यातून एक दिवस दर गुरुवारी हा बाजार भरू लागला. या बाजारात त्यांचा पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद मिळाला. आज शहरातील विविध भागांत पाच ठिकाणी हा बाजार वेगवेगळ्या दिवशी भरतो आहे. साहजिकच, त्यांना भाजीपाला कमी पडू लागला, तेव्हा त्यांच्या बचत गटातील अन्य महिला शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून त्या विकू लागल्या. यातून त्यांनी उत्पन्नाचा स्रोत वाढला आहे.

ग्राहकांचा चांगला प्रतिसाद शेतकरी गटासाठी ‘आत्मा`ने आठवडे बाजार ही संकल्पना मांडली. या अंतर्गत शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला विक्रीसाठी मोक्‍याच्या जागेची उपलब्धता करून देण्यासह टेंट, वजनकाटे सवलतीमध्ये शेतकऱ्यांना पुरवण्यात आले. त्यामुळे मालाची सुरक्षितता आणि योग्य व्यवहारही होऊ लागले. ग्राहकांनाही ताजा शेतीमाल योग्य किमतीत मिळू लागला आहे. सोलापूर शहरात सकाळी आठ ते दोन या कालावधीत  आरटीओ कार्यालय परिसर (गुरुवार), अरविंदधाम (शुक्रवार), कर्णिकनगर (शनिवार), अंत्रोळीकरनगर (रविवार) आणि केशवनगर( सोमवार) असे पाच दिवस बाजार भरतात. सोलापूर शहरात मंगळवार आणि बुधवार वगळता इतर सर्व दिवस बाजार भरतो. त्यामुळे पाचही दिवसांत भाजीपाल्याची चांगली खरेदी-विक्री होते. बाजाराच्या प्रत्येक दिवशी भेंडी, टोमॅटो, वांगी आदी फळभाज्या प्रत्येकी २० ते ३० किलो आणि पालेभाज्यांची १०० ते १५० पेंढ्यांपर्यंत विक्री होते. अनिताताई स्वतःच्या शेतातील भाजीपाल्यासह बचत गटातील महिला शेतकऱ्यांकडील भाज्या खरेदी करून बाजारात विक्री करतात. व्यवस्थापनाचा सर्व खर्च वजा जाता त्यांना महिन्याकाठी ८ ते १० हजार रुपये मिळतात.

-  सौ. अनिता खेडे, ९९२१९५६५२४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com