शिक्षकी पेशा सांभाळत शेतीत केली सुधारणा

बेलुरा खुर्द (जि. अकोला) ः सोयाबीन पिकाची पाहणी करताना अविनाश देशमुख
बेलुरा खुर्द (जि. अकोला) ः सोयाबीन पिकाची पाहणी करताना अविनाश देशमुख

अविनाश देशमुख हे सध्या सांगोळा (जि. अकोला)  येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शेतीच्या आवडीतून दोन भावांच्या सहकार्याने त्यांनी बेलुरा खुर्द (ता. पातूर, जि. अकोला) गावातील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पारंपरिक पिकांकडून फळबागेकडे त्यांचा प्रवास सुरू झाला आहे. येत्या काळात केळी उत्पादकांचा गट स्थापन करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून अविनाश केशवराव देशमुख हे शिक्षकाची नोकरी सांभाळून कुटुंबाच्या सहकार्याने बेलुरा खुर्द (ता. पातूर, जि. अकोला) येथील वीस एकर शेतीचे व्यवस्थापन करतात. काळानुरूप शेती नियोजनात बदल करीत त्यांनी फळबागेतही पाऊल टाकले. विविध प्रयोग करून शेतीतून उत्पन्न वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अविनाश देशमुख यांना अनंत आणि विनोद हे दोन भाऊ आहेत. सध्या तीनही देशमुख बंधू नोकरीच्या निमित्ताने अकोला आणि खामगाव येथे राहतात. अविनाश यांचे वडील केशवराव देशमुख हे बेलुरा खुर्द भागातील शेतीनिष्ठ पुरस्कार विजेते शेतकरी. त्यांच्या शेतीमधील कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली. सर्व सुरळीत सुरू असतानाच १९९६ मध्ये त्यांचे निधन झाले. यामुळे सुरवातीला शेतीची जबाबदारी मोठा भाऊ अनंत यांनी काही काळ सांभाळली. अनंत यांना नोकरी लागल्यानंतर शेतीची जबाबदारी अविनाश यांच्याकडे आली. या दरम्यान अविनाश हे डी.एड. पदवीपूर्ण करून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. सध्या अविनाश देशमुख हे पातूर तालुक्यातील सांगोळा या गावातील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. मात्र मुलांच्या शिक्षणासाठी ते आता अकोला शहरात स्थायिक झाले. अकोला शहरापासून सांगोळा गावातील शाळा साधारणतः ३५ किलोमीटर आहे, तर बेलुरा गावातील शेती २५ किलोमीटर अंतरावर अाहे. लांबच्या अंतरामुळे देशमुख यांना सुटीच्या दिवशीच शेतीवर जाणे शक्य होते. सध्या अविनाश देशमुख यांच्याकडे सर्व शेती नियोजनाची जबाबदारी आहे. शेतीमधील दैनंदिन कामाच्या नियोजनासाठी दोन कायम स्वरूपी मजूर आहेत. पीक व्यवस्थापनाच्या गरजेनुसार मजूर घेतले जातात.

पिकांचे उत्पादन वाढविण्यावर भर   बेलुरा गावशिवारात वेगवेगळ्या तीन ठिकाणी देशमुख कुटुंबीयांची वीस एकर शेती अाहे. या शेतीत खरिपात सोयाबीन आणि तूर, मूग, उडीद आणि रब्बीत हरभरा, गहू  लागवडीचे नियोजन असते. दरवर्षी जास्तीत जास्त शेणखताचा वापर करत जमिनीचा पोत सुधारण्यावर त्यांनी भर दिला आहे. कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार खतांची मात्रा, वेळेवर कीड, रोगांचे नियंत्रण, काटेकोर पाणी व्यवस्थापन आणि आंतर मशागतीच्या नियोजनातून दर्जेदार पीक उत्पादन घेण्याकडे त्यांचा कल आहे.

  पीक लागवडीबाबत देशमुख म्हणाले की, दरवर्षी दहा एकरांवर सोयाबीन लागवड असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने दरवर्षी बियाणे बदल केला जातो. माती परीक्षणानुसार खतमात्रा दिली जाते. मला एकरी सरासरी ११ क्विंटल उत्पादन मिळते. दोन एकरांवर तूर लागवड असते. याचबरोबरीने दोन एकरांवर मूग, उडदाची लागवड असते. या पिकांचे एकरी पाच क्विंटल उत्पादन मिळते. रब्बी हंगामात पाच एकरांवर हरभरा लागवड असते. एकरी दहा क्विंटल उत्पादन मिळते. दोन एकरांवर गव्हाची लागवड असते. एकरी १७ क्विंटल उत्पादन मिळते. याचबरोबरीने काही क्षेत्रावर ओवा, राजमा पिकांची लागवडदेखील केली जाते.  शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी प्रत्येक क्षेत्रात विहीर खोदली आहे. पाइपलाइन करून संपूर्ण वीस एकरांत पाणी फिरवले आहे. अकरा एकर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. शेती नियोजनात मोठा भाऊ अनंत आणि लहान भाऊ विनोद यांचे चांगले सहकार्य मिळते. त्यामुळे दरवर्षी दर्जेदार पीक उत्पादन घेण्याकडे माझा कल असतो.

शेळीपालनाचे नियोजन  अविनाश देशमुख यांनी येत्या काळात शेळीपालनाचे नियोजन केले आहे. त्यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी ३५ शेळ्या होत्या. या शेळ्यांसाठी त्यांनी अर्धबंदिस्त पद्धतीचा गोठा बांधला होता; परंतू गेल्यावर्षी मजूर टंचाई आणि शेळ्यांना चांगला दर मिळाल्याने त्यांनी सर्व शेळ्या विकून टाकल्या; परंतु आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा नव्याने शेळीपालनाकडे वळण्याचे त्यांनी ठरविले आहे. याचबरोबरीने कडकनाथ कोंबडीपालनाचेही त्यांनी नियोजन केले आहे.

यांत्रिकीकरणावर भर नोकरी सांभाळून शेतीचे व्यवस्थापन मजुरांकडून करून घेताना अलीकडे देशमुख यांनी यंत्रांच्या वापरावर भर दिला आहे.  शेती कामासाठी छोटा ट्रॅक्टर विकत घेतला असून, त्याद्वारे पेरणी, डवरणी व इतर मशागतीची कामे केली जातात. ट्रॅक्टरच्या वापरामुळे वेळेसह मजुरीत बचत होऊ लागली. कृषी विभागाच्या सल्ल्याने नवनवीन जातींची लागवड, पीकव्यवस्थापन ते करीत अाहेत. यातून उत्पादन वाढीला मदत होत आहे.

शेती व्यवस्थापनाची सूत्रे

  •   दरवर्षी नवीन जातींच्या लागवडीवर भर.
  •   कृषी तज्ज्ञांच्या सल्याने खतमात्रा, कीड, रोग नियंत्रणावर भर.
  •   दरवर्षी राज्यातील कृषी विद्यापीठे तसेच कृषी प्रदर्शनांना भेटी देऊन नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेऊन शेतीमध्ये वापर.
  •   परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी, त्यानुसार शेती व्यवस्थापनात बदल.
  •  दरवर्षी भावांच्या मदतीने वर्षभरातील पीक नियोजन आणि व्यवस्थापनाचा आराखडा, त्यानुसार अंमलबजावणी.
  •  शेतीमध्ये तीन गाई, दोन बैलांचे संगोपन. शेतीबांधावर चारा पिकांची लागवड. पशुपालनातून शेणखताची चांगली उपलब्धता.
  •  यांत्रिकीकरण, सेंद्रीय खते, कीडनाशकांच्या वापरावर भर.
  •  येत्या काळात गावामध्ये केळी उत्पादक गटाचे नियोजन. त्यातून गटशेतीला चालना.
  • फळबागेचे नियोजन

  •   सध्या साडेचार एकरांवर कागदी लिंबाची लागवड. त्यामध्ये सोयाबीनचे आंतरपीक. येत्या हंगामापासून फळांच्या उत्पादनाला सुरवात.
  •   फळबागेला ठिबक सिंचनाची सोय.
  •   दोन वर्षांपूर्वीपर्यंत दीड एकरावर केळी लागवडीचे नियोजन; परंतु पाणी कमी पडल्याने केळी लागवड थांबवली. पुढील वर्षी पुन्हा एक एकरावर केळी लागवडीचे नियोजन.
  •   गेल्यावर्षी दोन एकरांवर पपई लागवड, त्यातून दीड लाखाचा नफा.
  •   फळबागेला शेणखत, लेंडी खताचा जास्तीत जास्त वापर.
  •   एकात्मिक पद्धतीने फळबागेचे व्यवस्थापन.
  • -  अविनाश देशमुख, ९६८९९६४२८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com