शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथ

शेतीला कोंबडीपालनाची जोड
शेतीला कोंबडीपालनाची जोड

महिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत गटांच्या माध्यमातून भांडवल उभे राहिल्याने अनेक महिलांनी कुटुंबाचे अर्थकारण बदलले. यापैकी एक आहेत सातारा जिल्ह्यातील भाटमरळी येथील बेबीताई बोडरे. बेबीताईंनी बचत गट, बँकांच्या मदतीच्या जोरावर शेती बागायती करत कुक्कटपालन, शेळीपालनाची जोड दिली आहे.  

सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांचे जाळे मोठ्या प्रमाणात तयार झाले आहे. या बचत गटांना प्रगतीसाठी स्वयंसेवी संस्था तसेच बॅंकांनीही चांगल्या प्रकारे साथ दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी शेती सुधारणा केली, त्याचबरोबरीने पूरक उद्योगातून आर्थिक प्रगतीला हातभार लावला. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना आर्थिक ताकद मिळाली. भाटमरळी (जि. सातारा)  गावातील बेबीताई मल्हारी बोडरे यांनीदेखील बचत गटाच्या साथीने जिरायती शेती बागायती केली. काही वर्षांपूर्वी कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने मोलमजुरी, तसेच कोंबड्यांचे संगोपन करत उदरनिर्वाह सुरू होता. घरची चार एकर शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून. त्यामुळे पीक उत्पादनाची फारशी शाश्वती नव्हती. त्यामुळे कुटुंबातील सर्वांना उदरनिर्वाहासाठी मजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता.

  बचत गटाची मिळाली साथ   सन २००० मध्ये बेबीताई बोडरे यांची अॅवॉर्ड संस्थेच्या सचिव नीलिमा कदम यांची भेट झाली. त्यांनी महिला बचत गटाची संकल्पना समजून सांगत गटात सहभागी होण्याचा सल्ला दिला. गावामध्ये कमल पवार यांच्या अध्यक्षतेखाली जोर्तिलिंग महिला बचत गटाची सुरवात झाली. या गटात बेबीताई सहभागी झाल्या. बचत गटाचे महत्त्व पटल्याने महिलांनी प्रतिमहिना ५० रुपये बचत करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीच्या काळात बचतीसाठी केलेल्या गटातून भांडवलनिर्मिती होण्यास सुरवात झाली. अॅवॉर्ड संस्थेच्या प्रयत्नातून महिला गटाला बँकेकडून कर्ज मिळाले. प्रत्येकीस दहा हजार याप्रमाणे कर्जवाटप करण्यात आले. बेबीताईंनी बचत गटाच्या माध्यमातून मिळालेले दहा हजार रुपये शेती सुधारणेसाठी वापरले. या कर्जाची वेळेत परतफेड केल्याने बेबीताईंची बँकेत पत निर्माण होण्यास मदत झाली. यामुळे बँकेने पुढील कर्जास मान्यता दिली. बचत गटाचे महत्त्व समजल्याने सुजाता अंकुश मदने, लक्ष्मी सूर्यकांत चव्हाण या दोन मुली आणि सून करुणा संतोष बोडरे यांनादेखील बेबीताईंनी बचत गटात सहभागी करून घेतले. याचा मुलींना तसेच कुटुंबास बचतीच्या बरोबरीने भांडवल निर्मितीचा फायदा झाला.  

शेतीमध्ये केली सुधारणा

बेबीताईंची स्वतःची चार एकर शेती असल्याने त्यांचा शेतीविकासाकडे कल होता. सन २०१६ मध्ये त्यांच्या बचत गटास दीड लाखाचे कर्ज मंजूर झाले. या काळात गटातील महिलांना कर्जाची गरज नसल्याने सर्व कर्ज बेबीताईंनी घेतले. या कर्जाच्या वापरातून त्यांनी पहिल्यांदा विहीर खोदली. त्याचबरोबरीने देशी केळी लागवडीचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात त्यांनी २०१६मध्ये वीस गुंठे लागवडीचे नियोजन केले. संस्थेतील तज्ज्ञ तसेच परिसरातील शेतकऱ्यांकडून केळी व्यवस्थापनाची माहिती घेत चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु विक्रीसाठी योग्य बाजारपेठेची माहिती नसल्याने सर्व केळीघडांची विक्री परिसरातील व्यापाऱ्यास केली. या वेळी त्यांच्या लक्षात आले, की देशी केळीला मागणी असतानाही अपेक्षित दर काही मिळाला नाही. पहिल्या बहरात त्यांना केळी विक्रीतून पन्नास हजार रुपये मिळाले. मात्र, दुसऱ्या बहराच्यावेळी त्यांनी बागेतील सर्व केळी सातारा शहरात स्वतः हातविक्री केली. यामुळे प्रतिडझनास ५० रुपये दर मिळाला. कुटुंबातील सर्व सदस्य सातारा शहरातील बाजारपेठेत केळी विक्री करतात. त्याबरोबर बागेत येणाऱ्या ग्राहकास प्राधान्य दिल्याने दर चांगला मिळण्यास मदत झाली. थेट विक्री केल्यामुळे त्यांना दुसऱ्या टप्प्यात खर्च वजा जाता सत्तर हजारांचा नफा मिळाला. केळी पिकातून त्यांना चांगले उत्पादन मिळाल्याने पुढील टप्प्यात त्यांनी एक एकर ऊस आणि अर्धा एकर आले लागवड केली आहे. सध्या अर्ध्या एकरातील आले काढणीस तयार आहे. सध्या दर समाधानकारक असला तरी गणपतीनंतर दर वाढण्याचा अंदाज असल्याने त्यावेळीच विक्री करण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.

कोंबडी, शेळीपालन ठरले फायदेशीर कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी बेबीताईंनी सुरवातीपासून कोंबडीपालनास सुरवात केली होती. बचत गटाच्या माध्यमातून त्यांना कुक्कटपालन तसेच शेळीपालनातील सुधारित व्यवस्थापनाची माहिती मिळाली. यामुळे त्यांनी ७० देशी कोंबड्यांच्या संगोपनास सुरवात केली. कोंबड्यांच्या संगोपनासाठी उपलब्ध साधन सामग्रीतून लहानसे शेड तयार केले. या कोंबड्यांचे योग्य पद्धतीने खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन केल्याने अंड्यांचेही चांगले उत्पादन मिळू लागले. सातारा शहरात देशी कोंबड्यांच्या अंड्यांना मागणी असल्याने तेथील बाजारपेठेत विक्री सुरू केली. सध्या प्रतिअंड्यास सात ते दहा रुपये दर मिळत आहे. दर आठवड्याला दीडशे अंड्यांची विक्री केली जाते. याचबरोबरीने अलीकडे त्यांनी देशी जातींच्या कोंबड्यांच्या बरोबरीने ५० सुधारित जातींच्या कोंबड्यांचे संगोपन सुरू केले आहे. कुक्कुटपालनाच्या बरोबरीने बेबीताईंनी शेळीपालनदेखील सुरू केले. मात्र मध्यंतरीच्या काळात शेळ्या आजारी पडल्याने त्यांनी शेळ्या कमी केल्या. सध्या त्यांच्याकडे दोन गावरान शेळ्या आहेत. मात्र, येत्या काळात दहापर्यंत शेळ्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन त्यांनी केले आहे.  

गटातून झाला फायदा

बचत गटाच्या फायद्याबाबत बेबीताई म्हणाल्या, की मोलमजुरी करून कुटुंब चालवावे लागत असताना बचत गटामुळे शेती विकासासाठी आर्थिक भांडवल मिळाले. शेतीला पूरक उद्योगाची जोड दिली. सध्या सून करुणा आणि सुजाता, लक्ष्मी या दोन्ही मुली बचत गटात कार्यरत असून, शेतीची जबाबदारी त्यांच्याकडे दिली आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांना स्वंतत्र हिस्सा दिला जातो. शेतीच्या नियोजनात पती तसेच मुलगा संतोष यांचीही मदत मिळते. याचबरोबरीने अॅवॉर्ड संस्थेच्या नीलिमा कदम, किरण कदम यांचे मार्गदर्शन मिळते. त्यांच्यामुळे बँकेतून बचत गटाला कर्ज मिळण्यास मदत झाली. बचत गटाला बँक अधिकाऱ्यांनीही सहकार्य केल्याने आमच्या उपक्रमाला चांगली चालना मिळाली आहे.  

- बेबीताई बोडरे, ९५५२२४०७५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com