agriculture news in marathi, success story of Dr.Prashant Rajput,Virwade,Dit.Ja;gaon | Agrowon

रुग्णसेवेसह शेतीतही जपले वेगळेपण
चंद्रकांत जाधव
रविवार, 23 डिसेंबर 2018

मुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जयेंद्रसिंग राजपूत यांनी विरवाडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारित तंत्राने केळी आणि हळद लागवड यशस्वी केली. मुंबईमध्ये हळद पावडर, सेंद्रीय ज्वारीसाठी ग्राहक तयार केले. वैद्यकीयपेशा सांभाळून पीक उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरावर त्यांनी भर दिला आहे.

मुंबई येथील प्रसिद्ध किडनीविकार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जयेंद्रसिंग राजपूत यांनी विरवाडे (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील वडिलोपार्जित शेतीमध्ये सुधारित तंत्राने केळी आणि हळद लागवड यशस्वी केली. मुंबईमध्ये हळद पावडर, सेंद्रीय ज्वारीसाठी ग्राहक तयार केले. वैद्यकीयपेशा सांभाळून पीक उत्पादन वाढीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरावर त्यांनी भर दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील विरवाडे (ता. चोपडा) गावामध्ये डॉ. प्रशांत राजपूत यांची वडिलोपार्जित ३६ एकर शेती आहे. गावशिवारातील जमीन हलकी, काळी कसदार स्वरूपाची असून केळी लागवड मोठ्या प्रमाणात आहे. सध्या डॉ. राजपूत हे मुंबई येथे कार्यरत असून निष्णात किडनी तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. शालेय शिक्षणापासून डॉ. राजपूत घरापासून दूरच होते. महाविद्यालयातील सुट्यांमध्ये त्यांना घरच्या शेतीवर जायला मिळायचे. डॉ. राजपूत यांचे वडील जयेंद्रसिंग हे प्रयोगशील शेतकरी. सुटीच्या काळात डॉ. प्रशांत वडिलांच्याबरोबरीने शेतीवर जाऊन केळी लागवडीतील प्रयोग, ठिबक सिंचन, उत्पादन आणि बाजारपेठेबाबत चर्चा करायचे. जयेंद्रसिंग हे केळी आणि हंगामी पिकांच्या उत्पादनात अग्रेसर होते. शेतीमध्ये ते वेगवेगळे प्रयोग करायचे. १९९० मध्ये त्यांनी केळीसाठी अमेरिकेतील कंपनीकडून ठिबक संच मागवला होता. या दरम्यानच्या काळात सिंचन तंत्रज्ञानासंबंधीच्या कंपनीतील तज्ज्ञांशी जयेंद्रसिंग यांची पीक व्यवस्थापनाविषयी चर्चा सुरू झाली. डॉ. प्रशांत घरात एकटे असल्याने वडिलांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी आली.

शेतीमध्ये केले बदल 
शेतीची जबाबदारी आल्यानंतर मुंबई येथे राहात असलेल्या डॉ. प्रशांत राजपूत यांनी ३६ एकर क्षेत्रांतील पीक लागवड आणि व्यवस्थापनाचे नियोजन केले. यासाठी चुलतभाऊ नितीन राजपूत यांची चांगली मदत झाली. डॉ. प्रशांत यांची आई विजयाबाई या विरवाडे येथेच राहतात. मुंबईमधील वैद्यकीय व्यवसायामुळे डॉ. प्रशांत यांना वारंवार गावी येणे जमत नसल्याने त्यांनी संपूर्ण शेतीच्या नियोजनासाठी आठ सालगडी आणि एक चालक नेमला. डॉ. राजपूत यांच्या शेतीमध्ये शाश्वत सिंचनासाठी दोन कूपनलिका आहेत.   

डॉ. प्रशांत हे महिन्यातून एकदा मुंबईहून जळगाव शहरातील एका रुग्णालयात किडनी विकार असलेले रुग्ण तपासणीसाठी येतात. याच दरम्यान केळी तज्ज्ञ के. बी. पाटील हे एका रुग्णास तपासणीसाठी डॉ. राजपूत यांच्याकडे घेऊन आले होते. या संपर्कातून डॉ. राजपूत यांनी केळी पिकातील सुधारित तंत्र, व्यवस्थापनाची माहिती घेण्यास सुरवात केली. 

शेतीसाठी क्लास 
केळी तज्ज्ञ के. बी. पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे डॉ. प्रशांत यांचा केळीच्या सुधारित लागवडीबाबत रस वाढला. ज्या दिवशी डॉ. प्रशांत जळगाव शहरात रुग्ण तपासणीसाठी येतात तेव्हा ते खास दोन तासांचा वेगळा वेळ ठेऊन के. बी. पाटील यांच्याकडे नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी जातात. गेल्या पाच वर्षांपासून त्यांचा दर महिन्याला दोन तासांचा शेतीविषयक क्लास सुरू आहे. 

मुंबईत घरून रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी डॉ. प्रशांत यांना एक तास लागतो. या प्रवासादरम्यान व्हिडिओ कॉलिंगद्वारे श्री. पाटील तसेच केळीमधील प्रयोगशील शेतकऱ्यांची ते संपर्क साधतात. केळीसंबंधी काही छायाचित्रे असली तर ती त्यांना पाठवून अधिक माहिती घेतात. याचबरोबरीने स्वतःच्या केळी बागेत तज्ज्ञ तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांना बोलावून त्यांच्याकडून पीक व्यवस्थापनातील सुधारणा समाजावून घेतात. वनस्पतीशास्त्र व इतर बाबींविषयी ऑक्‍सफर्ड, पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचे अभ्यासक्रम, इक्वेडोर, फिलीपीन्समधील केळी लागवड तंत्र, इस्त्राईलमधील पाणी व्यवस्थापन, पॅकेजिंग, विक्री व्यवस्थापनातील तांत्रिक माहिती इंटरनेटवरून घेतात. 

सालगड्यांना दिले प्रशिक्षण 
डॉ. राजपूत यांनी सालगड्यांना विविध पिकांतील सुधारित लागवड, खत, पाणी व्यवस्थापनासंबंधीचे तंत्रज्ञान अवगत व्हावे, यासाठी तांदलवाडी (ता. रावेर) येथील प्रशांत महाजन आणि रावेरमधील शेतकरी विशाल अग्रवाल यांच्याकडे प्रशिक्षणाला पाठविले होते. त्याचा शेती नियोजनात फायदा होत आहे. शेतीमधील प्रत्येक जमा-खर्चाचा हिशेब मांडल्यामुळे पुढील वर्षातील नियोजन करणे त्यांना सोपे जाते.

सुधारित तंत्राचा अवलंब 
 डॉ. राजपूत यांनी २०१६ पासून पीक व्यवस्थापनामध्ये बदलास सुरवात केली. महिन्यातून दोनवेळा ते गावी येतात. सालगडी आणि तज्ज्ञांशी चर्चाकरून पुढील पंधरा दिवसांचे नियोजन ठरविले जाते. सध्या राजपूत यांच्याकडे दहा एकर केळी, दहा एकर हळद, चार एकर कापूस आणि इतर हंगामी पिकांची लागवड आहे. दोन एकर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने ज्वारीचे उत्पादन घेतात. विविध पिकांना सेंंद्रिय खते, किडनाशकांच्या वापरावर त्यांनी भर दिला आहे. गेल्या सहा वर्षांपासून दैनिक ॲग्रोवनमधील माहितीचा पीक व्यवस्थापनामध्ये अवलंब केल्याने पीक उत्पादनात चांगली वाढ मिळाली आहे.

केळी 

 • मे, जूनमध्ये पाच बाय साडेपाच फूट अंतरात उतिसंवर्धित रोपांची लागवड.
 • माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खतांचा वापर. दीड फूट उंच गादीवाफा. मल्‍चिंगमुळे वाफसा कायम. पाण्याचा नियंत्रित वापर. ठिबकमधून जिवामृताचा वापर.
 • घडासाठी स्कर्टिंग बॅग. करपा रोग नियंत्रणासाठी शिफारशीनुसार फवारणी. 
 • यंदा किमान २८ किलो प्रतिघड, अशी रास मिळण्याची अपेक्षा. कंपनीच्या माध्यमातून परदेशात निर्यातीचे नियोजन. निर्यातीच्या केळीला जाहीर होणाऱ्या दरांपेक्षा १५० ते २०० रुपये अधिक दराचा अंदाज.
 • येत्या काळात गावामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी उभारणार.

हळद 

 • सेलम आणि वायगाव जातीची १५ मे दरम्यान लागवड. दीड फुटाचा गादीवाफा. दोन गादीवाफ्यांमधील अंतर पाच फूट. गादीवाफ्यावर दोन ओळीतील अंतर सव्वा फूट.
 • ठिबक सिंचनाने पाणी नियोजन. माती परीक्षणानुसार रासायनिक आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन. पूर्वीपेक्षा उत्पादनात ४० टक्के वाढ. ठिबक सिंचनातून जीवामृताचा वापर.
 • ओल्या हळदीचे एकरी १५० क्विंटल उत्पादन.
 • मुंबईतील ग्राहकांना हळद पावडरीची २५० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विक्री. वैद्यकीय व्यवसायामुळे संपर्कात आलेल्या युरोप, दुबईतील लोकांना दरवर्षी दहा क्विंटल हळद पावडरीची विक्री.
 • हळकुंडांची सांगली बाजारात विक्री. खर्च वजा जाता एकरी दीड लाखांचा नफा.

कापूस 

 • जूनमध्ये ठिबकवर पाच बाय पाच फूट अंतरावर लागवड.
 • माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन. एकात्मिक कीड, रोग नियंत्रणावर भर.
 • एकरी ११ क्विंटल उत्पादन. फरदड घेत नाही.
 • गावातील व्यापाऱ्याला कापसाची विक्री 

 -  डॉ. प्रशांत राजपूत, ९९३०५०७०८२  (रविवारी दुपारी ४ नंतर)

 

 

 

 

फोटो गॅलरी

इतर फळबाग
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
डाळिंबबागेतील मररोगाची लक्षणे कसे ओळखाल...डाळिंबबागेमध्ये मररोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार...
द्राक्षवेल अचानक सुकण्याच्या समस्येवर...सध्याच्या परिस्थितीत द्राक्षबागेतील सर्व भागात...
द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशियम बारबॅटम...द्राक्षाच्या जुन्या बागांमध्ये खोडकिडीच्या...
भुरी नियंत्रणासह अन्नद्रव्य...सध्या बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ होताना दिसत...
संत्रा झाडे वाळण्याची कारणे जाणून करा...विविध संत्रा बागांमध्ये उन्हाळ्यात आणि पावसाळा...
गारपिटीनंतर द्राक्ष बागेची अधिक काळजी...द्राक्ष बागेमध्ये वाढीच्या विविध अवस्थेमध्ये...
कॅनोपीमध्ये वाढू शकतो भुरीचा प्रादुर्भावहवामान अंदाजानुसार येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही...
आंबा पिकावरील फळमाशीचे व्यवस्थापनआंबा पिकावर सुमारे १८५ किडी आढळत असल्या तरी...
द्राक्ष फुटीच्या विरळणीबरोबर कीड...येत्या आठवड्यामध्ये कोणत्याही विभागामध्ये पावसाची...
केसर आंबा व्यवस्थापन या वर्षी केसर आंबा कलमांना मोठ्या प्रमाणावर...
आरोग्यदायी ड्रॅगन फ्रूटशरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी आणि...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
फणस व्यवस्थापनफणसाला नियमित फुले व फळे येतात. फणसामध्ये...
कागदी लिंबू लागवडकागदी लिंबू पिकाला मध्यम काळी, हलकी मुरमाड,...
द्राक्षबागेत नवीन फुटीवर किडींच्या...द्राक्ष बागेमध्ये सध्याच्या वातावरणाचा आढावा...
संत्र्यावर कोळशीचा प्रादुर्भाव, त्वरेने...सद्यस्थितीत अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत...
फळबागांना आच्छादन, संरक्षित पाणी द्यासध्याच्या काळात पाणी कमतरता, सूर्यप्रकाश, गरम...
द्राक्षबागेत खरड छाटणीनंतर सूक्ष्म...द्राक्षबागेत या वेळी फळकाढणीचा हंगाम जोरात सुरू...
द्राक्ष : नवीन वाढ करण्यासाठी आवश्यक...द्राक्षबागेमध्ये मागील हंगामामध्ये कलम केलेल्या...