नियोजनबद्ध, हंगामनिहाय पीकपद्धतीतून उंचावले अर्थकारण

आम्ही कुटुंबातील सर्व सदस्य शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहतो. शेतमालाचे दर आपल्या हातात नसले तरी उत्पादन हाती असल्याने त्यावर भर देऊन नफा कसा वाढेल हे पाहिले जाते. शेतीत नियोजनबद्ध कामे करण्याला मोठे महत्त्व आहे. कंपनी समजून त्यात राबल्यास आर्थिक प्रगती करणे शक्य होते. कुटुंबातील सर्वांच्या कष्टातून तशी प्रगती करणे शक्‍य झाले आहे. - जयवंत पाटील
जयवंत पाटील यांनी सुधारित पद्धतीने केलेली आले लागवड.
जयवंत पाटील यांनी सुधारित पद्धतीने केलेली आले लागवड.

पाल (जि. सातारा) येथील जयवंत बाळासाहेब पाटील यांनी हंगामनिहाय विविध पिकांचे अत्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केले आहे. आले व ऊस ही नगदी पिके, जोडीला पपईचे वार्षिक फळपीक व कमी कालावधीतील झेंडू, काकडी आदी पिके त्यांना वर्षभर उत्पन्न देत राहतात. त्यातून घरखर्च, शिक्षण, आरोग्य तसेच शेतीतील भांडवली खर्चाची सोय होऊन जाते. शिवाय गुंतवणूक करणेही सोपे होते. स्वतःची २४ एकर व भाडेतत्त्वावरील १४ अशा ३८ एकरांवर राबवलेल्या शिस्तबद्ध व्यवस्थापनातून शेतीचे व घरचे अर्थकारण उंचावणे त्यांना शक्य झाले आहे.

सातारा जिल्ह्यातील पाल हे खंडोबा देवाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले कऱ्हाड तालुक्‍यातील गाव. येथे ऊस, आले यासारख्या नगदी पिकांसह झेंडूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गावातील जयवंत पाटील हे तरुण शेतकरी. या कुटुंबाची संयुक्त २४ एकर जमीन आहे. यात पूर्वी पाच एकर बागायत तर उर्वरित जिरायती होती. वडील आणि चुलत्यांच्या मार्गदर्शनाखाली जयवंत यांनी शेती करण्यास सुरवात केली. सन २००८ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर शेतीची मुख्य जबाबदारी जयवंत यांच्यावरच आली.

शेतीचा विकास बागायत क्षेत्र वाढावे यासाठी जयवंत यांनी २००९ मध्ये तारळी नदीहून आठ हजार फूट पाइपलाइन करून विहिरीपर्यंत पाणी आणले. पूर्वी आल्याची वाफा पद्धतीने शेती केली जायची. पाटपाणी दिले जायचे.

केलेले बदल पूर्वीच्या पद्धतीत बदल करून गादीवाफा पद्धतीचा वापर सुरू केला. सुरवातीला तीन-चार एकर क्षेत्रात मायक्रो स्प्रिंकलर बसवले. हळूहळू ठिबक सिंचनाचा वापर वाढवला. आले पिकात पपईसारखे आंतरपीक घेण्यास सुरवात केली. यात चुलते दिलीपराव, लालासाहेब, चुलतबंधू सचिन यांचीही मोलाची साथ लाभली. पाणी उपलब्ध झाल्याने आले क्षेत्रात वाढ केली.   अर्थकारण सुधारण्यासाठी नगदी पिके    जयवंत यांनी आपले अर्थकारण सुधारताना ऊस व आले या प्रमुख पिकांवर भर दिला. आल्याची १५ मे ते पाच जून या कालवधीत लागवड केली जाते. प्रत्येक वर्षी पाच ते सहा एकर तर यावर्षी दहा एकर क्षेत्रावर लागवड केली आहे. उसाचे १५ एकरांपर्यंत क्षेत्र असते. यंदा तुटणारा १५ एकर व नवीन आडसाली ११ एकर असे त्याचे नियोजन आहे. आडसाली लागवडीवरच भर असतो. खोडवा शक्यतो घेतला जात नाही.

अर्थकारणात सुधारणा पूर्वी आल्याचे एकरी २० ते २२ गाड्या (प्रतिगाडी ५०० किलो) उत्पादन मिळायचे. सुधारित तंत्राच्या वापरातून एकरी ३५ ते ४० गाड्या उत्पादन मिळू लागले आहे. एकूण क्षेत्रात २०० ते २५० गाडी असे उत्पादन मिळते. त्यातून सरासरी १५ ते २० लाख रुपये वार्षिक एकूण उत्पन्न मिळते. अर्थात खर्च वेगळा असतो. उसाचे एकरी ५० ते ६० टन उत्पादन मिळते. एकूण १० ते १२ एकर क्षेत्रावरील ५०० ते ६०० टन उत्पादनापासून सुमारे १३ ते १४ लाख रुपये एकूण उत्पन्न मिळते.

पीक लागवडीचे पद्धतशीर नियोजन

सणांना केंद्रस्थानी ठेवून विविध पिकांची लागवड केली जाते. आले पिकात आंतरपीक म्हणून जुलै, अॅागस्टमध्ये पपई असते. पपईचे उत्पादन डिसेंबरपर्यंत मिळते. पपईचे एकरी ३० टन उत्पादन मिळते. दोन एकरांत सुमारे सहा ते सात लाख रुपये एकूण उत्पन्न मिळते. पपईतील उत्पन्न आले पिकाचा खर्च कमी करते. पपई काढणी झाल्यावर या क्षेत्रात दीड ते दोन एकरांत काकडीची लागवड केली जाते. सुमारे दोन महिने प्लॉट चालतो. एकरी २० ते २२  टन उत्पादन मिळते. मागील वर्षी या पिकातून एकूण पाच लाख रूपये उत्पन्न मिळाले होते.

ठरावीक रक्कम मिळत राहते 

गुढी पाडव्याचे लक्ष्य ठेऊन दर वर्षी चार ते पाच एकरांत झेंडू असतो. एकरी सरासरी सात टनांपर्यत उत्पादन मिळते. त्यातून दीड ते पावणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. अशा एकूण नियोजनातून वर्षाला ठरावीक रक्कम, दोन ते तीन महिन्यांत ठरावीक रक्कम असे उत्पन्न मिळत राहते. एखाद्या नोकरीतील पगारासारखेच हे उत्पन्न असल्याचे जयवंत सांगतात.

आर्थिक प्रगती साधली एकत्रित कुटुंबाची रचना लक्षात घेता पाटील यांनी टुमदार बंगला बांधला आहे. त्याबरोबर चारचाकी वाहनही घेतले आहे. ट्रॅक्टर व औजारेदेखील खरेदी केली आहेत. कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत आपापल्या पद्धतीने राबतात. पाटील कुटूंब घरच्या २४ एकरांसह भाडेतत्त्वावरही १४ एकर शेती करीत आहे. त्यातून उत्पन्न वाढवणे अजून शक्य झाले आहे. गुजरात, मुंबई, पुणे, बेळगाव आदी ठिकाणचे शेतमालांचे दर नियमित घेणे, स्थानिक व्यापाऱ्यांशी चर्चा करून विक्री करणे या प्रयत्नांतून नफा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असतात.

- जयवंत पाटील ९०११८६५०६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com