नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा संशयित सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैशे महंम
अॅग्रो विशेष
गावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण आणि पूरक उद्योगांवर लक्ष देणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन सैनिक टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील ‘कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी` या संस्थेने गावामध्ये विविध उपक्रमांना चालना दिली. राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्य आणि लोक सहभागातून शेती, आरोग्य आणि शिक्षण प्रसारासाठी नव्या संकल्पनांना गती मिळाली आहे.
गावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण आणि पूरक उद्योगांवर लक्ष देणे गरजेचे असते. हे लक्षात घेऊन सैनिक टाकळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील ‘कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी` या संस्थेने गावामध्ये विविध उपक्रमांना चालना दिली. राज्यभरातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्य आणि लोक सहभागातून शेती, आरोग्य आणि शिक्षण प्रसारासाठी नव्या संकल्पनांना गती मिळाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी (ता. शिरोळ) हे सैनिकांचे गाव. या गावातील अनेक जण सैन्य दलात विविध पदांवर कार्यरत आहेत. सन १९९५ मध्ये गावात दारूबंदीसाठी प्रयत्न झाले. सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन लढा उभारला. यामुळे दोन वर्षांत दारू दुकान दुसरीकडे स्थलांरित झाले. शिवाजीराव पाटील हे दारूबंदी, गाव तंटामुक्त करण्यासाठी प्रयत्न करीत होते. २००० साली त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा ज्ञानदेव पाटील आणि सहकाऱ्यांनी एकत्र येत ‘कै. शिवाजीराव पाटील बहुउद्देशीय ग्रामविकास प्रबोधिनी` या नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन केली. संस्थेचे सध्या अकरा जणांचे संचालक मंडळ आणि साठ सभासद आहेत. सुरवातीला संस्थेला फारसे पाठबळ नसल्याने गावामध्ये लहान स्वरूपात ग्राम सुधारणेचे कार्यक्रम सुरू झाले. यानंतर राज्यातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या संस्था, शासनाच्या विविध विभागाशी संपर्क झाल्यानंतर संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढली.
महिलांसाठी प्रशिक्षण
महिलेला शिक्षण दिले तर कुटुंबही सुधारू शकते, हे लक्षात घेत संस्थेने महिला सक्षमीकरण विकास कार्यक्रम हाती घेतला. यासाठी बचतगट संकल्पना, महिला समुपदेश केंद्र, कौटुंबिक हिंसाचार जनजागृती कार्यक्रम, हुंडा बळी, उद्योजिका कार्यक्रम, लेक वाचवा जनजागृती रॅली असे कार्यक्रम राबवून सुमारे सातशे महिलांना न्याय मिळवून दिला. गावातील पंधराशेहून अधिक महिलांना गरजेनुसार प्रशिक्षणांची सोय करण्यात आली.
रोजगारावाढीसाठी प्रयत्न
ऊसतोडणी कामगारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्रीय श्रमिक शिक्षा बोर्डामार्फत संस्थेच्या माध्यमातून जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. युवकांसाठी गाडी प्रशिक्षणाची सोय तसेच महिलांसाठी शिलाई, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालनाबाबत प्रशिक्षणांचे आयोजन केले जाते. आत्तापर्यंत गाव परिसरातील चारशे महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
गलिच्छ वस्ती सुधारणा कार्यक्रम
झोपडपट्टीतील वस्तीमध्ये स्वच्छता नसते. याचा विपरीत परिणाम तेथील नागरिकांच्या आरोग्यावर होतो. यामुळे स्वच्छतेचे महत्त्व रहिवाशांना पटवून देणे गरजेचे असते. संस्थेच्या वतीने जयसिंगपूर झोपडपट्टी, शाहूनगर, कुरुंदवाड झोपडपट्टी या ठिकाणी महिला सुधार योजनेअंतर्गत आरोग्य, पाणी स्वच्छता, कौटुुंबिक स्वास्थ्य, महिला संघटन याविषयी मार्गदर्शन करण्यात येते.
आठ वर्षांत जोडले सहाशे संसार
महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने संस्थेने २०१२ मध्ये शिरोळ तालुक्यातील पहिले महिला समुपदेशन केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून अनेक दुर्बल निराधार महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. व्यसनामुळे दुरावा निर्माण होऊन कुटुंबे उद्ध्वस्त होतात. या अनुषंगाने संस्थेने गेल्या पाच वर्षांत परिसंवाद, चर्चा, समुपदेशनावर भर देत कुटुंबातील लोकांना व्यसनाचे तोटे समजावून सांगितले. संस्थेच्या विविध समुपदेशकांनी संसार जोडण्यासाठी काम केले. यास चांगले यश मिळाले. समाजकल्याण विभागाने महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्काराने संस्थेचा गौरव केला.
राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रयत्न
संस्थेतर्फे राष्ट्रीय एकात्मकता शिबिर, राष्ट्रीय संवर्धन विभाग, राष्ट्रीय ग्राहक दिन, मतदान जागृतीसारखे उपक्रम राबविले जातात. लेक वाचवा अभियानाअंतर्गत स्त्रीभ्रूण हत्या रोखणे, हुंडाबळी परिसंवाद, स्त्रीभ्रूण हत्या कायदे प्रशिक्षण, महिला जागृती शिबिर, याशिवाय साक्षरता वर्गाचे आयोजन केले जाते.
कला, क्रीडा, मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
गाव परिसरातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सव, लोककला सादरीकरण, वक्तृत्व स्पर्धा, लेझीम स्पर्धा यांचे आयोजन केले जाते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शिरोळ तालुक्यात विविध ठिकाणी नैसर्गिक साधन संपत्ती जतन आणि संर्वधनासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात येते.
साखर शाळेचा उपक्रम
शैक्षणिक विकास कार्यक्रमाअंतर्गत संस्थेने शाळा बाह्य मुलांसाठी हंगामी साखर शाळा, सेतू शाळा, हंगामी शिक्षण केंद्र, राष्ट्रीय बालस्वास्थ्य योजना असे उपक्रम राबवून ४५० विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले जाते. या उपक्रमांची दखल घेत कोल्हापूर जिल्हा परिषदेचा आदर्श साखर शाळा पुरस्कार देऊन संस्थेला गौरविले. संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन शाळा बाह्य मुलांच्या जिल्हा समितीच्या अशासकीय सदस्यपदी संस्थेची निवड झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेव पाटील म्हणाले की, संस्था शेती विकासासाठी विविध उपक्रम राबविते. ऊस उत्पादन वाढीविषयी गरजेनुसार विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते. पीक उत्पादन वाढ, ठिबक सिंचनाचा वापर या विषयावर जागृती करून त्यांना विविध प्रकारचे साहित्यही भेट दिले जाते. याशिवाय ऊस रोपवाटिका, सिंचन योजना, भाजीपाला लागवडीबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. संस्थेला महाराष्ट राज्य कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाचेही काम करण्याची संधी मिळाली. करवीर, कागल, भुदरगड तालुक्यातून आत्मा अंतर्गत बारा शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना करण्यामध्ये संस्थेचा सहभाग आहे.
संस्थेचे अन्य उपक्रम
- आई, वडील नसलेल्या दोनशे मुलांना बालसंगोपन योजनेतून मदत.
- शाहूवाडी तालुक्यातील २५ गावांमध्ये रोजगार हमी योजनेचा प्रचार आणि प्रसिद्धी.
- कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पॅनेल मध्ये स्वयंसेवी संस्था म्हणून निवड.
- जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेत प्रथमोपचार पेट्यांचे वाटप.
- महिलांसाठी गारमेंट प्रशिक्षण सुरू करण्याचे नियोजन.
- ज्ञानदेव पाटील, ९४२३२४९७१४
फोटो गॅलरी
- 1 of 287
- ››