महिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'

महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देताना अपर्णा देशमुख.
महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण देताना अपर्णा देशमुख.

संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी दुर्गम भागातील आदिवासी, विधवा, निराधार व प्रगतीच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या महिलांना विविध पूरक उद्योगांचे प्रशिक्षण दिले. गेल्या अठरा वर्षांत निरजा विकास वर्धिनी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून अपर्णा देशमुख यांनी ग्रामीण भागातील मुली तसेच महिलांना आर्थिक प्रगतीची दिशा दाखवली आहे. 

ग्रामीण भागातील महिला तसेच मुलींना गावामध्येच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अपर्णा देशमुख यांनी विविध योजना गावांपर्यंत पोचविल्या आहेत. त्याचा चांगला फायदा मुली, मुले आणि महिलांच्या आर्थिक प्रगतीमध्ये दिसून येत आहे. संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांचे आजोबा कै. के. बी. दादा देशमुख यांचा स्वातंत्र्योत्तर काळात संगमनेर-अकोले तालुक्यातील सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता. त्यांचे वडील वायुसेनेमध्ये कार्यरत होते. सामाजिक विकासाच्या चळवळीत अपर्णाताई लहानाच्या मोठ्या झाल्या. अपर्णाताईंचे शिक्षण फक्त बारावी होते. विवाहानंतर ब्युटीपार्लरचा कोर्स करून १९९२ मध्ये त्यांनी स्वतःचे ब्युटीपार्लर सुरू केले. १९९६ मध्ये कौटुंबिक कारणांमुळे त्या दोन लहान मुलांसोबत आई वडिलांकडे राहायला आल्या. मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी आणि कर्जाचा बोजा यामुळे त्यांना स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहात मोठे केल्याशिवाय गत्यंतर नाही, ही जाणीव झाली. अपूर्ण असलेले शिक्षण पूर्ण करून पात्रता वाढवणे हे पहिले आव्हान होते. त्यानुसार अपर्णाताईंनी बी.ए. पदवी पूर्ण करत कॉम्प्युटर कोर्सही केला. त्या जोरावर एक लहानशी नोकरी मिळाली. मात्र नोकरीतील अल्प उत्पन्न आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांची सांगड बसत नव्हती. शेवटी २००१ मध्ये त्यांनी नोकरी सोडून ब्युटीपार्लर व्यवसाय सुरू केला. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील वडिलोपार्जित शेती आईसोबत पाहत त्यांची व्यवसायिक व सेवाभावी वाटचाल सुरू झाली. निरजा विकास वर्धिनीची सुरवात   अपर्णाताईंनी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र या वेळी त्यांना काहीतरी वेगळे करावेसे वाटत होते. वैयक्तिक व्यवसायाबरोबरच समाजातील गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी २००१ मध्ये निरजा विकास वर्धिनी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ब्युटीपार्लर आणि लहान मुलांचे नर्सरी स्कूल सुरू केले. ब्युटीपार्लर सुरू झाल्यानंतर महिलांकडून ब्युटीपार्लर, शिवणकाम अशा अभ्यासक्रमांची विचारणा होऊ लागली. त्यानुसार त्यांनी शिवण काम आणि ब्युटीपार्लरचे अभ्यासक्रम सुरू केले. संस्थेने सुरू केलेले हे उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाले. महिलांसाठी प्रशिक्षणाची सोय संस्थेकडे वेगवेगळे कोर्स करण्यासाठी येणाऱ्या महिला प्रामुख्याने विधवा, शिक्षण अर्धवट राहिलेल्या, कौटुंबिक व आर्थिक अडचणीग्रस्त असायच्या. त्यांच्याकडे फी भरण्यासाठीही पुरेसे पैसे नसायचे. तरीही कमी फी, सवलत व प्रसंगी मोफत प्रशिक्षण देऊन अपर्णाताईंनी महिलांना उद्योगास प्रवृत्त केले. यातून संगमनेर तालुक्यात महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी राहिली. गरजू महिलांना प्रशिक्षित करत असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाची ब्युटीपार्लर व शिवणकाम या दोन ट्रेडसाठी मान्यता मिळविली. संस्थेच्या खासगी आय.टी.आय. अभ्यासक्रमांची सुरुवात झाली. प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना शासनाचे प्रमाणपत्र मिळाल्याने व्यवसाय कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. कमी वेळात ग्रामीण भागात महिलांचे पूरक व्यवसाय अधिक सक्षमपणे उभे राहण्यास सुरवात झाली.

महिला झाल्या स्वयंपूर्ण

  • महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास महामंडळाचे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडर (व्ही.टी.पी.) २०१६ मध्ये सुरू झाल्याने संस्थेमार्फत अनेक महिलांना शासकीय योजनांचा लाभ देणे शक्य झाले. शासनाच्या नियमांप्रमाणे सर्व व्यवस्था, वस्तू, उपकरणे, जागा असलेली सुसज्ज इन्स्टिट्यूट संगमनेरमध्ये उभी राहिली. या जागेत रोज शेकडो महिला खेड्यापाड्यातून येऊन प्रशिक्षण घेतात. अनेक महिला खेडेगाव, शहरात चांगल्या प्रकारे काम करून कुटुंबाला हातभार लावत आहेत. संस्थेचे सदस्य आदिवासी महिलांना त्यांच्या गावात जाऊन प्रशिक्षण देतात. राजूर, अकोले, कुमशेत, अलितखिंड, धामनवन, रंधा, पाडळणे, पिंपरी अशा गावात आणि आजूबाजूच्या परिसरातील वाडी, पाडे, वस्तीवरील महिलांनी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. संस्थेच्या अठरा वर्षातील उपक्रमांचा ग्रामीण महिलांना चांगला फायदा झाला आहे.
  •  महात्मा फुले महामंडळाकडून स्वच्छता कामगारांच्या वीस मुली, महिलांना ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण. 
  •  शाळाबाह्य विद्यार्थी, विडी कामगारांच्या मुली, आदिवासी महिला, विधवा, शालेय मुली यांना एकात्मिक आदिवासी विभाग, राष्ट्रीय स्थायी विकास संस्था, क्रीडा मंत्रालय, जिल्हा परिषद, संगमनेर नगर परिषद, महिला व बालकल्याण विभाग, कृषी विभागाच्या योजनांचा लाभ महिलांसाठी मिळवून दिला. त्यातून ग्रामीण भागातील महिला, मुली स्वावलंबी झाल्या.
  • आदिवासी महिलांना बांबू कारागिरी, मेणबत्ती, अगरबत्ती, वनउपज, मसाले, पापड, लोणचे प्रशिक्षण, शोभेच्या वस्तू निर्मिती, वारली पेंटिंगचे प्रशिक्षण. उत्पादनांच्या विक्रीला साहाय्य.
  • सुमारे ८५० हून अधिक मुलींना कराटे प्रशिक्षण.
  • शिवणकाम, पार्लर, हॅन्डीक्राप्टस इ. अभ्यासक्रमांतून चार हजाराहून अधिक महिला स्वावलंबी. सुमारे १५०० पेक्षा अधिक महिला यशस्वी उद्योजक.
  • ग्रामीण, आदिवासी, बेरोजगार, विधवा, बिडी कामगार, दुष्काळग्रस्त शेतकरी महिलांचे सबलीकरण.
  • शाळेतील मुलांसाठी संस्कार शिबिरांचे नियोजन. खेळ, गाणी व गोष्टींच्या माध्यमातून चांगले व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर. पणत्या, आकाशदिवे, मातीच्या वस्तू, टोप्या निर्मिती,  हस्तकलांचे प्रशिक्षण. 
  • संस्थेचे भावी नियोजन 

  •   महिलांसाठी संगणक 
  • प्रशिक्षण आणि समुपदेशन केंद्राची उभारणी.
  •   बचत गटांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार.
  •   लहान मुलांसाठी 
  • बालसंस्कार केंद्र.
  •   वाचनालयाची उभारणी.
  • -  अपर्णा देशमुख, ७०२१७७५३३४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com