सुधारित तंत्रातून साधली मिरची उत्पादन वाढ

मिरचीचे उत्पादन दाखविताना प्रणील पाटील
मिरचीचे उत्पादन दाखविताना प्रणील पाटील

धमडाई (ता.जि. नंदुरबार) येथील प्रणील सुभाष पाटील या युवा शेतकऱ्याने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मिरची लागवडीला सुरवात केली. दरवर्षी हिरवी तसेच लाल मिरची उत्पादनाचे त्यांचे नियोजन असते. प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन, सुधारित तंत्राने लागवड, ठिबक सिंचन, एकात्मिक खत व्यवस्थापनावर भर देत दर्जेदार पीक उत्पादन मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मिरची बरोबरीने केळी, पपई लागवडीतूनही त्यांचा उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न आहे.

नंदुरबार शहरापासून नऊ किलोमीटरवर धमडाई हे गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे दोन हजार. या गावातील प्रणील सुभाष पाटील हे प्रयोगशील शेतकरी. बी.ए. पदवी घेतल्यानंतर त्यांनी वडिलांच्या बरोबरीने शेती नियोजनास सुरवात केली. त्यांची पंचवीस एकर शेती आहे. यामध्ये सध्या सात एकरावर मिरची, सहा एकर केळी, दहा एकर पपई आणि दोन एकरावर कापूस लागवड आहे. पूर्वी त्यांची पाच एकर शेती बागायती होती. संपूर्ण शेती बागायती करण्यासाठी त्यांनी २०१३ मध्ये नऊ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तापी नदीवरून पाच इंची पाइपलाइन केली. यासाठी कर्जदेखील काढले. त्यांनी आजपर्यंत कर्जाची परतफेड व्यवस्थित केली आहे. शाश्वत पाणीपुरवठ्याच्या बळावर वर्षभर त्यांना पंचवीस एकर शेतीमध्ये पीक लागवडीचे नियोजन करता आले.  शेतीमधील पीक नियोजन आणि व्यवस्थापनासाठी प्रणील पाटील यांना पत्नी सौ. दुर्गा यांचीदेखील चांगली मदत होते.

समजावून घेतले तंत्रज्ञान परिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेत प्रणील पाटील यांनी मिरची लागवडीमध्ये सातत्य ठेवले. यंदाच्या वर्षी त्यांनी सात एकरावर मिरची लागवड केली आहे. यामध्ये हिरव्या मिरचीसाठीच्या जातीची चार एकरवर आणि लाल मिरचीसाठीच्या जातीची तीन एकरावर लागवड आहे. या लागवडीबाबत प्रणील पाटील म्हणाले, की २००८ पूर्वी आम्ही पारंपरिक पद्धतीने दीड बाय दीट फुटावर मिरची लागवड करायचो. पिकाला पाट पाणी दिले जायचे. तसेच अनियंत्रित पद्धतीने खत मात्रेचा वापर होत होतो. आम्हाला एकरी ४० क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन मिळत नव्हते; परंतु २००८ च्या दरम्यान मला रायपूर (छत्तीसगड) येथे सुधारित तंत्राने मिरची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीवर जाण्याची संधी मिळाली. त्याचबरोबरीने कोळदा (जि. नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ आर. एम. पाटील आणि परिसरातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करता आली. या चर्चेतून आणि प्रत्यक्ष पीक पाहणीतून मला मिरचीच्या सुधारित तंत्राची माहिती मिळाली. त्यानुसार मी लागवडीची पद्धती, जातींची निवड, ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांच्या वापराला प्राधान्य दिले.

अशी आहे लागवड

  •  सात एकरावर लागवड, त्यापैकी चार एकर हिरवी मिरची आणि तीन एकर लाल मिरचीच्या जातीची लागवड.
  •   दोन फूट रुंद आणि दीड फूट उंचीचा गादीवाफा. गादीवाफ्यावर दीड फुटावर रोपांची लागवड. हिरव्या मिरचीच्या दोन ओळीतील अंतर पाच फूट तर लाल मिरचीसाठी सहा फुटांचे अंतर.
  •  एका जातीची लागवड १ जून तर दुसऱ्या जातीची लागवड २१ जून रोजी. लागवडीपूर्वी गादीवाफे तयार करताना मातीपरीक्षणानुसार शेणखत, रासायनिक खत आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा मिसळून दिली. त्यानंतर ठिबक सिंचन अंथरून शिफारशीत अंतरावर रोपांची लागवड.
  •  पीक वाढीच्या टप्प्यानुसार लागवडीनंतर आठव्या दिवसापासून विद्राव्य खत मात्रांचे नियोजन. याचबरोबरीने कीड, रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी दर आठवड्याला हवामान लक्षात घेऊन शिफारशीत कीडनाशकांची फवारणीचे नियोजन. कीड नियंत्रणासाठी चिकट सापळ्यांचा वापर.
  •  वाढीच्या टप्प्यात मिरचीच्या वजनाने झाड वाकू नये, यासाठी प्रत्येक झाडानजीक एक बांबू रोवून मजबूत प्लॅस्टिकच्या दोरीच्या साह्याने आधार.
  •  जूनमध्ये लागवड केलेल्या मिरचीची आॅगस्ट महिन्यापासून तोडणी सुरू होते. हिरव्या मिरचीचा पहिला तोडा १५ क्विंटलचा मिळाला. दर नवव्या दिवशी मिरचीचा तोडा केला जातो. त्यानंतर दर तोड्याला उत्पादन वाढत जाते. फेब्रुवारीपर्यंत हिरव्या मिरचीचे तोडे होतात. एकरी मला २०० क्विंटल उत्पादन मिळते. नंदुरबार बाजारपेठेत विक्री केली जाते. गेल्या वर्षी सरासरी १५ ते २५ रुपये प्रतिकिलो हा दर मिळाला.
  •   लाल मिरचीचीदेखील लागवड जूनमध्ये असते. पहिले दोन तोडे हिरव्या मिरचीचे घेतले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते मार्चपर्यंत लाल मिरचीचे तोडे होतात. दर पंधरा दिवसाला एक तोडा होतो. एकरी १५० क्विंटल लाल मिरचीचे उत्पादन मिळते. गेल्या वर्षी सरासरी २० ते २५ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. हिरव्या आणि लाल मिरचीची नंदुरबार बाजार समितीत विक्री होते, दर टिकून असले तर व्यापारी थेट बांधावर मिरची खरेदीसाठी येतात. त्यामुळे मिरची लागवड आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते आहे.
  • मिरची उत्पादकांचा गट मिरची उत्पादन वाढीसाठी प्रणील पाटील हे प्रयोगशील शेतकऱ्याच्या बरोबरीने चर्चा करतात. याचबरोबरीने कृषी विज्ञान केंद्राच्या कृषक मंडळाचे ते सदस्य आहेत. शेतकरी चर्चेतून परिसरातील गावातील २५ मिरची उत्पादकांचा गट तयार केला आहे. या गटातर्फे लागवडीपासून ते विक्रीपर्यंत चर्चा होते. दर महिन्याला शिवारफेरी केली जाते. यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बराेबरीने चर्चा करून पुढील टप्प्यात नियोजन सुधारण्यासाठी मदत होत आहे. येत्या काळात गट शेतीच्या माध्यमातून मिरची निर्यातीच्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

    शेती नियोजनाची सूत्रे

  •  प्रयोगशील शेतकरी, कृषी तज्ज्ञांचा सल्लाने दर्जेदार पीक उत्पादनावर भर.
  •  पाणी, रासायनिक खतांचा काटेकोर वापर.
  •  जमीन सुपिकतेसाठी सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर.
  •  एकात्मिक पद्धतीने कीड, रोग नियंत्रण.
  •  गट चर्चेतून पीक व्यवस्थापनात सुधारणा.
  • -  प्रणील पाटील, ८९९९४३८९८२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com