वाहतूक परवान्यातून बांबू मुक्त : वनमंत्री मुनगंटीवार

बांबू वाहतुक
बांबू वाहतुक

मुंबई : महाराष्ट्रात बांबू वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केल्यानंतर आता देशातही बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त करण्यात आल्याने बांबूची वाहतूक आणि त्यापासूनची उत्पादने या प्रक्रियेला गती येईल. महाराष्ट्राचा हा निर्णय देशपातळीवर स्वीकारला असून, औद्योगिक उत्पादनातील बांबूचा वापर वाढविण्यावर भविष्यात भर देणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.  वनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सह्याद्री अतिथीगृहात बांबू बोर्डाची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह बांबू बोर्डाचे सदस्य व वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वनमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, वन आणि वनेतर जमिनीवर उत्तम दर्जाच्या बांबूची लागवड मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी प्रयत्न केले जावेत. बांबू हे बहुउपयोगी गवत असून यात स्वंयरोजगाराच्या मोठ्या संधी आहेत. बांबू पल्पपासून कागदनिर्मिती, वस्त्रनिर्मिती, बांबू चटई, बांबूपासून हस्तकौशल्याच्या वस्तू, बांबूचे घर, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या गृहाेपयोगी वस्तू आणि इतर औद्योगिक उत्पादने यात प्रचंड रोजगार संधी दडलेल्या आहेत, हे लक्षात घेऊन यासाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान जे सहजतेने लोकांना उपलब्ध होऊ शकेल, त्याचा स्वीकार केला जावा. बांबूपासून ऊर्जा निर्मिती हा एक महत्त्वाचा प्रयोग अलीकडच्या काळात समोर येत आहे. त्यादृष्टीने उत्तम आणि दर्जेदार बांबूची लागवड राज्यात होणे, वन आणि वनेतर जमिनीवर बांबू लागवड वाढणे आवश्यक आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणली जावी, यासाठीही बांबू मंडळाने भरीव प्रयत्न करणे अगत्याचे आहे, असेही ते म्हणाले बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली यांच्या वतीने बैठकीत त्यांच्या कामाचे सादरीकरण करण्यात आले. केंद्रात दाेन वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन बांबू टॅक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून यास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. महिला बचत गटांना बांबूपासून बास्केट बनवणे, कचराकुंडी बनवणे, चटई बनवणे, पंखे, पानदान, लॅम्प, शेड बनवणे याचे प्रशिक्षण या केंद्रातर्फे दिले जात आहे. त्यातून महिला बचत गटातील स्त्रियांची आर्थिक सक्षमता होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वन पर्यटनातून रोजगार संधीचा विकास याच बैठकीत ताडोबा पर्यटन विकास आराखड्यावरही सविस्तर चर्चा झाली. ताडोबामध्ये महिनानिहाय गेल्या वर्षी किती पर्यटक आले, किती गाड्या आत सोडल्या, त्यापासून किती उत्पन्न मिळाले याची माहिती पुढील बैठकीत देण्यात यावी, असे सांगून श्री. मुनगंटीवार यांनी गाईडना प्रशिक्षण देणे, त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या माहितीमध्ये एक समानता असणे यांसारख्या गोष्टीही खूप महत्त्वाच्या आहेत, त्याकडे लक्ष दिले जावे, अशा सूचना या वेळी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com