निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासान

निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासान
निर्यात कोट्यावरून साखर उद्योगात घमासान

पुणे : देशात साखरेचा अफाट साठा तयार होत असताना निर्यातीचा कोटा मंजूर करूनही निर्यात न करणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करा, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. तर, ‘निर्यातीतील अडथळे आधी दूर करा,’ अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे.  देशातील जादा साखरसाठ्यामुळेच साखरेचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे कारखाने अडचणीत आल्याने एफआरपी थकली व शेतकऱ्यांसमोर समस्या तयार झाल्या आहेत. २०१७-१८ मधील २० लाख टन आणि गेल्या हंगामातील ५० लाख टन साखरेची निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. मात्र, निर्यात अवघी १५ लाख टन झाली आहे. ‘निर्यातीमधील अडथळे आधी दूर करा’, अशी एकमुखी मागणी साखर उद्योगाची आहे. त्यात पुन्हा निर्यातीचे कोटे मिळवूनदेखील काही कारखाने निर्यात टाळत आहेत. ‘कोटा असूनही निर्यातीस टाळटाळ करणाऱ्या काही कारखान्यांमुळे देशातील साखरसाठा वाढला. त्याचे परिणाम सर्व उद्योगाला भोगावे लागत आहेत. निर्यात हेतुतः टाळणाऱ्या कारखान्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली आहे,’ अशी माहिती उद्योग सूत्रांनी दिली. ‘गेल्या काही दिवसांचा आढावा घेतला, तर मंजूर असलेल्या ७० लाख टन निर्यात कोट्याच्या तुलनेत कारखान्यांनी फक्त १२-१३ लाखांचे करार केले आहेत. अपुरा दुरावा किंवा व्यक्तिगत कारणांमुळे ७५ टक्के कारखाने निर्यातीसाठी अनुकूल नाहीत. महाराष्ट्रात शिखर बॅंकेने साखर निर्यातीसाठी काढलेला तोडगा इतर भागांमध्येदेखील लागू करून ही समस्या सोडविता येईल. मात्र, दंडात्मक कारवाईची तरतूद नसल्यानेच काही कारखाने निर्यात टाळण्याचे धाडस करतात,’ असेही पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आले आहे. दरम्यान, साखर नियंत्रण आदेश १९६६ मधील कलम अकराचा वापर केल्यास निर्यातीमधील टाळाटाळ कमी होऊ शकते, असे साखर उद्योगाचे म्हणणे आहे. या कलमान्वये सरकारचे आदेश टाळल्यास साखर जप्त करण्याचे अधिकार सरकारला आहेत. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र सरकारला काही दिवसांपूर्वी लिहिलेल्या पत्रात साखर उद्योगाच्या समस्या गंभीरपणे मांडल्या होत्या. शेतकऱ्यांची थकलेली एफआरपी आणि घटलेल्या निर्यातीकडे दुर्लक्ष झाल्यास देशात शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, असा इशाराही श्री. पवार यांनी दिला होता. त्यामुळे आता केंद्र सरकारने माहिती गोळा करण्यास सुरवात केली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com