साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुक

साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुक
साखर निर्यातीसाठी कारखाने अनुत्सुक

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर स्थानिक बाजारापेक्षा सुमारे आठशे ते एक हजार रुपयांनी कमी असल्याने साखर कारखान्यांनी साखर निर्यातीसाठी अद्यापही हालचाली गतिमान केल्या नाहीत. केंद्राने वीस लाख टन निर्यातीचा कोटा ठरवून दिला असला तरी कारखान्यांनी मात्र निर्यातीला थंडा प्रतिसाद दिला आहे.  सप्टेंबरपर्यंत वीस लाख टन साखरेची निर्यात अशक्‍य बनली आहे. राज्य सहकारी साखर संघानेही एक हजार रुपये अनुदान दिल्याशिवाय निर्यात अशक्‍य असल्याचे सांगितल्याने आता साखर निर्यात सक्ती केली असली तरी त्याची तातडीने अंमबजावणी होणे अशक्‍य असल्याचे साखर उद्योगाने सांगितले. राज्यातून अद्याप एक पोतेही साखर निर्यात होऊ शकली नसल्याचे साखर आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले.    

कारखाने स्थानिक ठिकाणीच विक्रीसाठी प्रयत्नशील कारखान्यानुसार निर्यात कोटा शासनाने जाहीर केला असला तरी निर्यात परवडत नसल्याने अनेक कारखान्यांनी सध्या तरी हा विचारच बाजूला ठेवला आहे. थकीत देणी भागविण्यासाठी पहिल्यांदा स्थानिक बाजारातच साखर विक्री करून रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु निविदा उघडल्यानंतर साखर खरेदीदारही ३००० रुपयांपर्यंतही साखर दर देण्यास तयार नाही. यामुळे अनेक कारखान्यांनी साखर विक्रीच थांबविली आहे.   

थकीत देणीमुळे कारखाने दबावात यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच साखरेचे दर कमी कमी झाले. उठाव नसल्याने सुरू हंगामात साखरेची हव्या त्या प्रमाणात विक्री होऊ शकली नाही. यामुळे त्याचा दबाव हंगाम संपला तरी कारखान्यावर दिसून येत आहे. राज्यातील बहुतांशी कारखाने एफआरपी देण्यासाठी तर झगडत आहेतच, याशिवाय पहिला हप्तासद्धा कारखान्यांनी दिला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या रोषास कारखान्यांना बळी पडावे लागत असल्याचे राज्यातील कारखान्यांचे चित्र आहे. सुस्थितीत असणाऱ्या कारखान्यांनी गेल्या दोन दिवसांत धावपळ करीत एफआरपी रक्कम देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र इतर कारखान्यांचे व्यस्थापन मात्र साखर दरामुळे   हतबल झाल्याचे राज्यातील चित्र आहे.  अनुदानासाठी ठोस आश्‍वासनही नाही राष्ट्रीय साखर संघाने मॅरेथॉन बैठका घेत निर्यात अनुदानासाठी प्रयत्न चालविले असले तरी केंद्र स्तरावरून मात्र ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचे चित्र आहे. केवळ बैठकाच सुरू आहेत. वरिष्ठ अधिकारी साखर उद्योगाची कैफियत ऐकून घेत असले तरी ठोस कार्यवाहीबाबत आश्‍वासनही मिळत नसल्याने साखर उद्योगात अस्वस्थता पसरली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com