कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकट

कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकट
कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकट

कोल्हापूर ः गेल्या तीन महिन्यांपासून साखरेच्या दरात क्विंटलमागे ३०० रुपयांनी घसरण झाल्याने यंदा साखर कारखान्यांपुढे शॉर्ट मार्जिनचे संकट आ वासून उभे ठाकले आहे. एकीकडे दररोज घसरणाऱ्या साखरेच्या किमती व दुसरीकडे जाहीर केलेल्या पहिल्या हप्त्याचा दबाव या कचाट्यात कारखाने अडकले आहेत. यातच राज्य बॅंकेने पंधरवड्यात सलग दुसऱ्यांदा साखरेच्या मूल्यांकनात तब्बल २३० रुपयांची घट केली आहे. परिणामी हे संकट अधिकच गडद झाले आहे.  हंगाम सुरू होण्यापूर्वी ३५०० ते ३७०० रुपये इतका दर साखरेला होता. हे दर गृहीत धरून जास्तीत जास्त ऊस आपल्याला मिळावा या उद्देशाने कारखान्यांनी, विशेष करून पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी ३००० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर केला. हे दर तसेच राहिले असते तर जाहीर केलेला पहिला हप्ता देण्यास काही अडचण आली नसती. पण कारखाने सुरू व्हायला आणि दराची पडझड व्हायला एकच गाठ पडली. यामुळे ज्या कारखान्यांनी दर जाहीर केले, त्यांचे परतीचे मार्गही बंद झाले. डिसेंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत ३२०० रुपयापर्यंत साखर घसरली. त्यामुळे दर आणखी घसरण्याच्या चिंतेने साखर कारखानदार आडचणीत आले आहेत.

कारखान्यांनी विक्री थांबविली अनेक कारखान्यांनी सध्या साखर विक्रीच थांबविली आहे. तोट्यात विकण्यापेक्षा काही काळ थांबलेलेच बरे, असे कारखान्यांनी सांगितले. महिन्यापूर्वी ३३०० नी विकलेली साखर आता ३२०० रुपयांनीही कोणी घ्यायला तयार नसल्याची स्थिती आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील मातब्बर कारखान्यांनीच विक्री थांबविल्याने राज्यातील अन्य साखर कारखान्यांची अवस्था यापेक्षाही बिकट होण्याची शक्‍यता निर्माण झाली असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. 

कारखानदार बुचकळ्यात  राज्यातील सुमारे एकशे साठ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला आहे. एकूण परिस्थितीचा अंदाज घेतल्यास प्रचंड प्रमाणात साखर तयार होईल अशी शक्‍यता नसली तरीही दर का खाली येत आहेत, याबाबत कोणालाही अंदाज बांधणे कठीण झाले आहे. यातच बाहेरून साखर आयात होण्याची चर्चा बाजारात असल्याने याचा फटका सध्याच्या साखरेच्या दराला बसत असल्याचे एका कारखानदाराने सांगितले. 

राज्य बॅंकेचा मूल्यांकनाचा कडवटपणा दर घसरणीच्या कचाट्यात असतानाच राज्य बॅंकेनेही यात मिठाचा खडा टाकला. देशांतर्गत बाजारात साखरेचे दर घसरल्याने राज्य बॅंकेने कारखान्यांना साखर पोत्यावर देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये पंधरा दिवसात सलग दुसऱ्यांदा कपात केली आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस ११० रुपये इतकी कपात केली होती. आता नव्याने १२० रुपयांची कपात केली. पंधरवड्यात तब्बल २३० रुपयांनी उचल घटल्याने आता कारखान्यांना पहिल्या हप्त्यासाठ पुन्हा धावपळच करावी लागण्याची चिन्हे आहेत. मूल्यांकन प्रतिक्विंटल तीन हजार २७० पर्यंत कमी केल्याने कारखान्यांना ८५ टक्के म्हणजे दोन हजार ७८० रुपये मिळतील. यातील टॅगिंगची रक्कम वजा जाता प्रत्यक्ष उसाच्या पहिल्या उचलीसाठी प्रतिक्विंटल दोन हजार ३० रुपयेच मिळणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com