agriculture news in marathi, sugar industry had comfort due to ethanol rate hiked, Maharashtra | Agrowon

इथेनॉल दरवाढीने साखर उद्योगाला दिलासा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

इथेनॉलच्या किमतीत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे दुहेरी फायदा होणार आहे. एक तर इथेनॉलच्या उत्पादनात वाढ होईल. दुसरं म्हणजे अतिरिक्त साखर काही प्रमाणात कमी होईल. 
- अबिनाश वर्मा, महासंचालक, इंडिनय शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा)

नवी दिल्ली / पुणे ः  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत. जून महिन्यात या इथेनॉलला ४७.४९ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. तसेच १०० टक्के संपृक्त (कॉन्सनट्रेटेड) उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक म्हणजे प्रतिलिटर ५९.१३ रुपये दर समितीने मंजूर केला आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.
 

देशात २०१८-१९ च्या गाळप हंगामात अतिरिक्त साखरेचा प्रश्न जटील होण्याची शक्यता असल्याने कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. साखर कारखाने सध्या सी-हेवी मोलॅसीसपासून इथेनॉल निर्मिती करतात. कारखान्यात उसाचे गाळप करून साखर तयार केल्यानंतर उरलेल्या मळीपासून (सी-हेवी मोलॅसीस) इथेनॉल निर्मिती केली जाते. सी-हेवी मोलॅसीसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या दरात कपात करून ते ४३.७० रुपयांवरून ४३.४६ रुपयांवर आणले आहेत. 

साधारणपणे एक टन सी-हेवी मोलॅसिसपासून २५० लिटर इथेनॉल तयार होते, तर एक टन बी-हेवी मोलॅसिसपासून ३५० लिटर इथेनॉलची निर्मिती होते; परंतु एक टन १०० टक्के संपृक्त (कॉन्सनट्रेटेड) ऊस रसापासून सुमारे ६०० लिटर इथेनॉलचे उत्पादन होते, असे इथेनॉल उद्योगातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले. 

देशात २०१७-१८ च्या हंगामात विक्रमी उत्पादन झाल्याने देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या हंगामातील १०० लाख टन साखर पुढील हंगामात शिल्लक राहत असल्याने आणि २०१८-१९ च्या हंगामात विक्रमी ३५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज असल्याने देशात तब्बल २०० लाख टन अतिरिक्त साखरेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शासनाच्या पातळीवर प्रयत्न सुरू असून, इथेनॉल निर्मितीवर भर देण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे साखर कारखान्यांकडे रोकड उपलब्ध होऊन शेतकऱ्यांची थकीत देणी भागविण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. तसेच पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी इथेनॉलची उपलब्धता वाढेल, असे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. पेट्रोलमध्ये अधिकाधिक इथेनॉल मिश्रणाच्या कार्यक्रमामुळे इंधन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, कृषी क्षेत्राला आधार मिळेल, पर्यावरणस्नेही इंधन उपलब्ध होईल, कमी प्रदूषण आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळेल, असे सरकारचे म्हणणे आहे.

शरद पवार यांच्या पाठपुराव्याला यश
देशाच्या साखर उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना वेळेत एफआरपीचे पेमेंट होण्याकरिता साखर उद्योगाच्या बळकटीकरणाचा आग्रह सातत्याने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडे करत होतो. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी श्री. पवार यांच्याकडून सतत पाठपुरावा सुरू होता. आमचे फेडरेशन व इस्मादेखील त्यासाठी पाठपुरावा करीत होते. अखेर या प्रयत्नाला यश आले आहे. केंद्राने अतिशय चांगला निर्णय घेतल्यामुळे आता इथेनॉलचे उत्पादन वाढेल. परिणामी देशातील साखरेच्या जादा स्टॉकची समस्यादेखील हाताळली जाईल. आवश्यकत तेव्हाच स्टॉक राहिल्यामुळे स्टॉकमधील माल आणि नव्याने तयार होणारा माल यासाठी साखर बाजारात किमतीदेखील चांगल्या मिळतील. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी देण्याची क्षमता आपोआप साखर कारखान्यांना मिळणार आहे, असे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले.
 

प्रतिक्रिया
कोरडवाहू शेतकऱ्यांना वरदान ठरणारा निर्णय ः ठोंबरे 
इथेनॉल हे केवळ उसापासून तयार होत नसून गोड ज्वारीपासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल मिळू शकते. त्यामुळे आता देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या या तंत्राला केंद्र सरकारने दिलेले प्रोत्साहन ऐतिहासिक स्वरूपाचे आहे. केंद्राने इथेनॉलच्या दरात वाढ केल्यामुळे इथेनॉल उत्पादनात साखर कारखान्यांकडून वाढ केली जाईल. यामुळे देशाच्या तेल आयात समस्येला चांगला पर्याय मिळाला आहे. बी हेव्ही इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये; तसेच ज्यूसपासून होणाऱ्या इथेनॉलकरिता ५९ रुपये दर देण्याचा केंद्राचा निर्णय ऐतिहासिक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्तेबांधणीमंत्री नितीन गडकरी आणि पेट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांचे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने अभिनंदन करतो. 
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (विस्मा)

केंद्राने योग्यवेळी योग्य निर्णय घेतला ः नाईकनवरे 
केंद्र सरकारने देशाच्या साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला आहे. पुढील ८-१० वर्षांनंतर इथेनॉल हेच साखर उद्योगाचे भवितव्य असेल. त्यामुळे त्याला चालना देण्यासाठी योग्य निर्णयाची गरज होती. जूनमध्येच केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादन वाढीसाठी चार हजार ४४० कोटी रुपयांची कर्जे देण्याची; तसेच त्यावरील व्यास स्वतः भरण्याची तयारी दाखविली होती. मात्र, इथेनॉलचे दर परवडणारे नसल्यामुळे बॅंकांकडे उद्योगांकडून कमी अर्ज गेले होते. आता थेट उसाच्या रसापासून इथेनॉलसाठी परवानगी दिल्यामुळे यातील गुंतवणूक वाढेल. जागतिक साखर बाजाराचा अंदाज घेऊन ब्राझीलमध्ये उसाचे गाळप करतानाचा साखरेवर भर द्यायचा की इथेनॉल उत्पादन वाढवायचे याचा निर्णय घेतला जातो. आता हेच ब्राझील मॉडेल भारतात वापरण्याचा मार्ग इथेनॉल दरवाढीमुळे मोकळा झाला आहे. मात्र, या निर्णयामुळे सध्या लगेच साखर उद्योगाला फायदा होणार नसून त्यासाठी २-३ वर्षे वाट पाहावी लागेल. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

इतर अॅग्रो विशेष
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...
तहात अडकले ‘ब्रेक्झिट’युरोपीय महासंघातून बाहेर पडायचे अथवा नाही, या...
साखरेच्या कमी दराची शिक्षा ऊस...ऊस दराच्या बाबतीत कधी नव्हे एवढी आर्थिक कोंडी या...
बायोडायनॅमिक पद्धतीने कमी काळात कंपोस्ट...बायोडायनॅमिक तंत्रज्ञान हे मूलत: भारतीय वेदांवर...
पाने कुरतडणाऱ्या मुंग्यांकडूनही होते...उष्ण कटिबंधीय जंगले हे नायट्रस ऑक्साईड या हरितगृह...
पणन सुधारणेतील दुरुस्तीला शेतकरी...मुंबई ः महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व...
ताराराणी महोत्सवातून घडली उद्यमशीलता,...कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत राज विभागाच्या...
कृषी निविष्ठा अनुदानासाठी ‘ऑनलाइन'ची...पुणे : राज्यात कृषी विभागाच्या योजनांमधील विविध...
'आयमा'ची होतेय मुस्कटदाबी; मोठ्या...पुणे : ट्रॅक्टर, हार्वेस्टर, रोटाव्हेटरसारख्या...
विदर्भाच्या काही भागांत थंडीची लाट पुणे : उत्तर भारतात थंडीच्या वाढलेल्या...
संत्रा पिकातील सिट्रीस ग्रिनिंग...नागपूर : जागतिकस्तरावर संत्रा पिकात अतिशय गंभीर...